How to Keep Curry Leaves Fresh: भारतीय स्वयंपाकघरात कढीपत्त्याला विशेष महत्त्व आहे. फोडणीची डाळ असो, भाजी असो, सांबार असो किंवा चटणी, कढीपत्त्याचा सुवास आणि चवीमुळे पदार्थाला एक वेगळीच लज्जत मिळते. अनेक गृहिणी बाजारातून ताजा कढीपत्ता आणतात; पण दुसऱ्याच दिवशी त्याची पाने काळी पडलेली किंवा सुकलेली दिसतात. त्यामुळे अनेकदा तो वापरण्याआधीच कचरापेटीत टाकावा लागतो.

पण, कढीपत्ता इतक्या लवकर खराब होण्यामागचं खरं कारण काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? आणि एक अशी सोपी युक्ती आहे, ज्यामुळे कढीपत्ता अनेक दिवस ताजा राहू शकतो. ही युक्ती जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

कढीपत्ता खराब होण्यामागचं सर्वांत मोठं कारण म्हणजे त्यामधील ओलावा. अनेक जण कढीपत्ता धुतल्यानंतर तो पूर्णपणे कोरडा न करता, थेट फ्रिजमध्ये ठेवतात. पानांमध्ये राहिलेला ओलावा हळूहळू काळे डाग निर्माण करतो आणि त्यामुळे पाने कुजण्यास सुरुवात होते. त्याशिवाय वारंवार बदलणारे तापमानही त्याचा ताजेपणा कमी करतो. त्यामुळे कढीपत्ता साठवण्यापूर्वी त्यातील अतिरिक्त ओलावा पूर्णपणे काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे.

कढीपत्ता दीर्घकाळ ताजा ठेवण्याची सोपी युक्ती

सर्वप्रथम कढीपत्ता स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर स्वच्छ कापड किंवा किचन टॉवेलच्या मदतीने तो पूर्णपणे कोरडा करा. पानांवर ओलावा राहणार नाही हे पाहा.

त्यानंतर एअर फ्रायर, मायक्रोवेव्ह किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये कढीपत्ता एक ते दोन मिनिटे हलका गरम करा; मात्र पाने जळणार नाहीत याची काळजी घ्या. फक्त ती किंचित कुरकुरीत होईपर्यंतच गरम करावीत. त्यानंतर कढीपत्ता पूर्णपणे थंड होऊ द्या आणि हवाबंद डब्यात भरून ठेवा.

या पद्धतीमुळे पानांतील अतिरिक्त ओलावा कमी होतो आणि कढीपत्ता बराच काळ ताजा राहतो. अनेकांना ही साधी युक्ती माहीत नसल्यामुळे त्यांचा कढीपत्ता काही दिवसांतच खराब होतो.

महिनोन महिने साठवून ठेवायचा असेल तर हा उपाय करा

जर तुम्हाला कढीपत्ता अनेक आठवडे किंवा महिने वापरायचा असेल, तर फ्रीजरचा वापर करू शकता. कढीपत्ता धुऊन पूर्णपणे कोरडा करा. त्यानंतर पाने देठापासून वेगळी करा.

आता बर्फाच्या ट्रेमधील प्रत्येक कप्प्यात काही पाने ठेवा आणि त्यात पाणी भरा. ट्रे फ्रीजरमध्ये ठेवून बर्फ तयार होऊ द्या. बर्फाचे तुकडे तयार झाल्यानंतर ते झिप-लॉक पिशवीत भरून पुन्हा फ्रीजरमध्ये साठवून ठेवा.

जेव्हा कढीपत्ता वापरायचा असेल, तेव्हा एक बर्फाचा तुकडा बाहेर काढा, थोडा वितळू द्या आणि थेट स्वयंपाकात वापरा. त्यामुळे कढीपत्त्याचा सुगंध आणि चव बराच काळ टिकून राहते.

या गोष्टी विसरू नका

कढीपत्ता साठवण्यापूर्वी तो नेहमी पूर्णपणे कोरडा असावा. तसेच हवाबंद डब्याचा वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे फ्रिजमधील इतर पदार्थांचा वास त्यात मिसळत नाही आणि कढीपत्ता अधिक काळ ताजा राहतो.

आता बाजारातून आणलेला कढीपत्ता दोनच दिवसांत खराब होईल, अशी चिंता करण्याची गरज नाही. फक्त या सोप्या युक्त्या वापरा आणि तुमच्या स्वयंपाकघरातील कढीपत्ता अनेक दिवस ताजा, सुगंधी आणि वापरण्यायोग्य ठेवा.