4 Ways To Keep The Roof Cool During Summers : मार्चपासूनच कडक उन्हाळा सुरू झालाय. अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे नकोसे वाटते; पण उष्णतेमुळे घरात बसणेही अशक्य होते. कारण- उन्हामुळे घराचे छत तापल्याने घरातील तापमानही वाढलेले असते. छतावर एखाद्या आगीच्या भट्टीप्रमाणे उष्णता बाहेर टाकली जाण्यासारखे गरम वाटत असते. जर तुम्ही सर्वांत वरच्या मजल्यावर राहत असाल, तर दिवसा घरात बसणे उकाड्याचा सामना करणे. पंख्यातूनसुद्धा गरम हवा फेकली जाते. अशा वेळी कूलर, एसी काम करणे बंद झाल्यासारखे वाटतात. पण, अशा परिस्थितीत तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही काही सोप्या आणि स्वस्त उपायांनी घराचे छत थंड ठेवू शकता. हे उपाय कोणते ते जाणून घेऊ…
१) ग्रीन नेट
तुम्ही रोपवाटिकांमध्ये किंवा बागांमध्ये ग्रीन नेट लावलेल्या पाहिल्या असतील. तुम्ही त्या तुमच्या छतावरही लावू शकता. त्या छतावर थेट सूर्यप्रकाश पडण्यापासून रोखतात. त्यामुळे थेट सूर्यप्रकाश रोखला जातो आणि छताचे तापमान नियंत्रणात राहते. त्यामुळे छताचा पृष्ठभाग तापत नाही आणि खालच्या खोलीतील उष्णता कमी होते. त्यामुळे कमी गरम वाटते.
२) टेरेस गार्डन
जर तुम्ही वृक्षप्रेमी असाल, तर ही पद्धत उत्तम आहे. छतावर लहान-मोठ्या रोपांच्या कुंड्या ठेवा, त्या रोपांना रोज पाणी घाला. रोपांमधील माती आणि वनस्पतींमुळे छतावर पडणारा थेट सूर्यप्रकाश कमी होतो. जेव्हा तुम्ही रोपांना पाणी घालता, तेव्हा बाष्पीभवनामुळे छत आपोआप थंड होते.
३) गोण्या
ही एक अतिशय सोपी आणि स्वस्त युक्ती आहे. छतावर सुताच्या गोण्या पसरून ठेवा आणि दुपारच्या वेळी त्यावर पाणी ओतून चांगल्या ओल्या करा. त्यामुळे उष्णता कमी होईल आणि दिवसा काय रात्रीही खोली थंड राहील.
४) पाणी शिंपडा
छतावरील उष्णता कमी करण्यासाठी सूर्यास्तानंतर पाणी शिंपडा. दुपारी छताला पाणी देणे टाळा, कारण- त्यामुळे आर्द्रता वाढू शकते; पण संध्याकाळी छतावर पाणी टाकल्याने उष्णता कमी होते.
