How To Keep Salt Dry: हिवाळा आणि पावसाळ्यात अनेकदा स्वयंपाकघरातील भांड्यांमध्ये ओलावा येतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्याच्या दिवसांत हवेतील आर्द्रतेमुळे स्वयंपाकघरातील साठवणीचे पदार्थ बऱ्याचदा काही दिवसांतच खराब होऊ लागतात. खासकरून मसाल्याच्या पदार्थांबाबत ही समस्या उद्भवते. साठवलेल्या मसाल्याच्या पदार्थांना अनेकदा ओलावा येतो. हवेच्या आर्द्रतेमुळे मीठालाही ओलावा येतो आणि मीठ पाणी सोडू लागते. ओले मीठ वापरल्याने तसा काहीच फरक पडत नाही पण त्यामुळे मसाल्याच्या डब्यातील इतर पदार्थांनाही ओलावा येतो. त्यामुळे बुरशीची वाढ होते. यावर काही सोप्या घरगुती उपायांचा फरक पडू शकतो. त्यामुळे मीठ कोरडे आणि ताजे ठेवू शकता.
काचेचं भांडं वापरा
मीठ किंवा इतरही पदार्थ कोणत्या भांड्यात साठवावेत याबाबत सहसा लोकांमध्ये संभ्रम असतो. भारतातील स्वयंपाकघरात बहुतेक स्टीलची भांडी वापरली जातात. मात्र, त्यात मीठाला ओलावा येतो. त्यामुळे मीठ ठेवण्यासाठी प्लास्टिक, स्टील किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्याऐवजी वेगळे काचेचे भांडे वापरा. काच ओलावा रोखण्यासाठी उपयोगी पडते. लहान मातीचं भांडं वापरल्यानेही ओलावा शोषून मीठ कोरडे राहण्यास मदत होते.
तांदळाचा वापर
मीठात तांदळाच्या काही दाण्यांचा वार ही सर्वात जुनी आणि प्रभावी पद्धत आहे. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात तर तिथेसुद्धा टेबलवरील मीठाच्या छोट्या डब्यात तांदळाचे दाणे टाकून ठेवलेले असतात. मीठाच्या भांड्यात काही कच्चे तांदळाचे दाणे टाका. तांदूळ हा नैसर्गिकरित्या ओलावा शोषून घेणारा पदार्थ आहे. जेव्हा तुम्ही मीठाच्या भांड्यात तांदूळ घालता तेव्हा ते हवा अडकवते आणि मीठ सुरक्षित राहते.
लवंगाचा उपाय
मीठाच्या डब्यात चार किंवा पाच लवंग ठेवल्याने मीठ ओले होण्यापासून वाचते. लवंगाचा वास मीठाचे टेक्स्चर बदलण्यात काही परिणाम करत नाही. मात्र, त्याची उष्णता आणि शोषण क्षमता मीठ ओले होण्यापासून रोखते.
हवाबंद डबा वापरा
मीठ, साखर, गूळ किंवा इतर कोणतेही मसाले साठवताना हवा आत जाऊ नये म्हणून नेहमी हवाबंद भांडी वापरा. शिवाय स्वयंपाकात मीठाचा वापर करून झाल्यानंतर लगेच झाकण घट्ट बंद करणे महत्त्वाचे आहे. हाताळताना आपले हात ओले नाहीत याची खात्री करा. शिवाय कोणताही वेगळ्या पदार्थातला चमचा मीठ घेण्यासाठी वापरू नका. तसंच कधीही ओल्या चमच्याचा वापर करू नका. कारण पाण्याचा एक थेंब देखील संपूर्ण भांडं खराब करू शकतो.
