Weak Eyesight Symptoms: डोळ्यांसमोर वारंवार धूसर दिसतंय? वाचताना डोके दुखतंय किंवा दूरच्या वस्तू पाहताना डोळे बारीक करून पाहावे लागतात? मग या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. अनेकदा आपण ही लक्षणं मोबाईलचा अतिवापर, कामाचा ताण किंवा थकव्यामुळे जाणवत असल्याचं समजतो. मात्र, काही वेळा ही नजर कमजोर होत असल्याची संकेतही असू शकतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये होणारे छोटे-मोठे बदल वेळीच ओळखणं महत्त्वाचं आहे. डॉ. रिचा शर्मा यांच्या माहितीनुसार, दैनंदिन जीवनात जाणवणाऱ्या काही सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वेळेवर डोळ्यांची तपासणी केल्यास दृष्टीशी संबंधित समस्यांचं निदान करण्यास मदत होऊ शकते. नजर कमजोर होत असल्याचे संकेत देणारी ५ सामान्य लक्षणं जाणून घेऊया…

१. वारंवार धूसर दिसणे

कधी कधी थकवा किंवा दीर्घकाळ स्क्रीन पाहिल्यानंतर डोळ्यांसमोर धूसर दिसू शकतं. मात्र, वारंवार असा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

  • पुस्तक किंवा मोबाईलवरील मजकूर वाचताना अडचण येणे.
  • दूरच्या वस्तू किंवा रस्त्यावरील फलक स्पष्ट न दिसणे.
  • मजकूर वाचण्यासाठी मोबाईल किंवा पुस्तक डोळ्यांच्या जवळ आणणे.
  • वस्तू स्पष्ट दिसण्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागणे.
    ही लक्षणं वारंवार जाणवत असतील, तर डोळ्यांची तपासणी करून घेणं योग्य ठरेल.

२. वाचल्यानंतर डोकेदुखीचा त्रास होणे

वाचन केल्यानंतर किंवा संगणकावर बराच वेळ काम केल्यानंतर डोके दुखत असेल, तर त्यामागे डोळ्यांवर येणारा ताण हेही एक कारण असू शकतं. विशेषतः डोकेदुखीसोबत डोळ्यांमध्ये ताण जाणवत असेल, तर या लक्षणाकडे लक्ष द्या.

  • वाचताना वारंवार डोके दुखणे.
  • काही वेळ वाचन केल्यानंतर डोळ्यांना विश्रांती द्यावीशी वाटणे.
  • संगणक किंवा मोबाईल वापरल्यानंतर डोळ्यांमध्ये ताण जाणवणे.
  • एखाद्या गोष्टीवर बराच वेळ लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे.
    मात्र, डोकेदुखीची कारणं अनेक असू शकतात. त्यामुळे वारंवार त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

३. डोळ्यांमध्ये कोरडेपणा आणि थकवा जाणवणे

दिवसभर मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा आणि थकवा जाणवू शकतो. स्क्रीन पाहताना आपण अनेकदा कमी वेळा पापण्यांची उघडझाप करतो. त्यामुळे डोळ्यांच्या पृष्ठभागावरील ओलावा कमी होण्याची शक्यता असते. डोळ्यांमध्ये जळजळ होणे, काहीतरी टोचल्यासारखं वाटणे, डोळे जड होणे किंवा स्क्रीन बंद केल्यानंतरही बराच वेळ अस्वस्थता जाणवणे, ही लक्षणं दुर्लक्षित करू नका. स्क्रीन वापरताना नियमित विश्रांती घेणं आणि डोळ्यांचा त्रास कायम राहिल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

४. वस्तू स्पष्ट पाहण्यासाठी डोळे बारीक करणे

दूरच्या वस्तू पाहताना तुम्हाला वारंवार डोळे बारीक करावे लागतात का? टीव्ही पाहताना, रस्त्यावरील फलक वाचताना किंवा ऑफिसमधील स्क्रीन पाहताना डोळ्यांवर जोर द्यावा लागत असेल, तर दृष्टीमध्ये बदल झाल्याची शक्यता असू शकते.
याशिवाय, पुस्तक वाचण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रकाशाची गरज भासणे किंवा मजकूर स्पष्ट दिसण्यासाठी वारंवार अंतर बदलावे लागणे, हीदेखील लक्ष देण्यासारखी लक्षणं आहेत. अशा वेळी स्वतःहून चष्म्याचा नंबर ठरवण्याऐवजी डोळ्यांची तपासणी करून घ्या.

५. रात्री किंवा कमी प्रकाशात स्पष्ट दिसत नसणे

समोरून येणाऱ्या वाहनांच्या दिव्यांचा जास्त त्रास होणे, डोळ्यांसमोर चमकणारे प्रकाशबिंदू दिसणे किंवा उजेडातून अंधारात गेल्यानंतर स्पष्ट दिसण्यासाठी अधिक वेळ लागणे, अशा तक्रारींची विविध कारणं असू शकतात. रात्री ड्याव्हिंग करताना स्पष्ट दिसत नसेल, तर तपासणी होईपर्यंत वाहन चालवणं टाळणं सुरक्षित ठरेल. डोळ्यांसमोर अचानक चमकणारे प्रकाशबिंदू, नवीन काळे ठिपके किंवा पडद्यासारखी सावली दिसल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञांची मदत घ्या.

केवळ चष्म्याचा नंबर तपासण्यासाठीच नव्हे

डोळ्यांची तपासणी म्हणजे केवळ चष्म्याचा नंबर वाढला आहे की नाही, हे जाणून घेणं नव्हे. डोळ्यांचं एकूण आरोग्य तपासण्यासाठीही नियमित तपासणी महत्त्वाची असते. काही नेत्रविकार सुरुवातीला स्पष्ट लक्षणं न दाखवताही विकसित होऊ शकतात.
त्यामुळे वरीलपैकी कोणतंही लक्षण वारंवार जाणवत असेल, तर स्वतःहून त्याचं कारण ठरवण्याऐवजी नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. सध्या कोणताही त्रास नसला, तरी वय, आरोग्य आणि जोखमीच्या घटकांनुसार नियमित डोळ्यांची तपासणी करून घेणं फायदेशीर ठरू शकतं. धूसर दिसणं, डोकेदुखी किंवा डोळ्यांमधील कोरडेपणा ही लक्षणं केवळ नजर कमजोर झाल्यामुळेच होतात असं नाही. योग्य कारण समजून घेण्यासाठी तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणं आवश्यक आहे.