डॉ. आरती सोमण

कडुनिंबाला संस्कृतमध्ये अरिष्ट असं म्हटलं जातं. अरिष्ट म्हणजे कधीही नष्ट न होणारे, संपूर्ण! कडुनिंबाची सर्वाधिक लागवड भारतात केली जात असून त्याचे अनेक गुणकारी आणि आयुर्वेदिक फायदे आहेत. त्यामुळे पूर्वीपासून कडुनिंबाचा आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. कडुनिंबाची फक्त पानेच नव्हे तर या झाडाच्या बिया, मूळे, फुले आणि साल यांच्यामध्येही अनेक महत्त्वाची संयुगे असतात. त्यामुळे हे संपूर्ण झाडं गुणकारी असल्याचं दिसून येतं. कडुनिंबामध्ये १३० वेगवेगळ्या प्रकारची जैवसंयुगे असतात, जी शरीराला व्याधीमुक्त करण्यास मदत करतात तसेच निरोगी जीवन जगण्यास पाठबळ देतात. यात आपल्य आरोग्याच्या प्रत्येक बाजूमध्ये सुधारणा घडवून आणणा-या ई जीवनसत्व आणि फॅटी अॅसिड्सची रेलचेल आढळते. त्यामुळे कडुनिंबाचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. कर्करोगप्रतिकारक –

कडुनिंबामध्ये अनेक गुणकारी फायदे आहेत. या कडुनिंबामध्ये कर्कपेशी नष्ट करण्याची क्षमता असते. प्रत्येकाच्या शरीरामध्ये कर्कपेशी असतात. परंतु, त्याचा आपल्याला कोणताही त्रास होत नाही. मात्र, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पेशींचं संदेशग्रहणक्षमता क्षतीग्रस्त होते. त्यामुळे काही वेळा कर्करोग होण्याची शक्यता असते. परंतु, नियमितपणे रोज कडुनिंबाच्या पानांचं सेवन केलं तर शरीरातील कर्कपेशींची संख्या प्रमाणात राहते.

२. हाडांसाठी उपयुक्त –
कडुनिंबाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम आणि खनिज यांची मात्रा असते. त्यामुळे हाडे बळकट करण्यासाठी कडुनिंबाची पाने उपयुक्त आहेत. तसंच सांधेदुखी, गुडघेदुखी होत असल्यास कडुनिंबाच्या तेलाने नियमितपणे मालिश करावी. कडुनिंबाच्या तेलाने मालिश केल्यास स्नायूंमधील वेदना, सांध्यांतील वेदना, र्हुमॅटिझम, ऑस्टिओआर्थ्ररायटिस आणि पाठीच्या खालच्या भागाचे दुखणे दूर होते.

३.अँटी-व्हायरल क्षमता –
कडुनिंब विषाणूप्रतिबंधक म्हणूनही काम करते. कडुनिंब हे पोलिओ, एचआयव्ही, कोक्सॅकी बी ग्रुप आणि डेंग्यूसारख्या अनेक विषाणूंना त्यांच्या प्रतिकृती निर्माण होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच रोखते, असे गेल्या पन्नास वर्षांमध्ये संशोधकांनी दाखवून दिले आहे. कडुनिंब हे विषाणू संसर्गाच्या दरम्यान शरीराकडून मिळणारा ह्युमोरल आणि सेल मेडिएटेड अशा दोन्ही प्रकारचा प्रतिसाद अधिक तीव्र बनवतो असे दिसून आले आहे. कडुनिंबामध्ये (Azadirachtaindica) अँटीव्हायरल क्षमता असून त्यात विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करणारे औषधी गुणधर्म आहे. कडुनिंब शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविते, पेशींच्या माध्यमातून कार्यरत होणा-या रोगप्रतिकार यंत्रणेला वेग देते. यातील टी सेल्स मायक्रोब्ज आणि विषाणूंमध्ये विषद्रव्ये संक्रमित करून त्यांना नष्ट करते.

४. अँटीफंगल –
कडुनिंबाचे तेल हे अॅथलिट्स फुट, रिंगवर्म व अशा कित्येक प्रकारच्या बुरशीजन्य संसर्गांना पूर्णपणे बरे करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. कडुनिंबामध्ये निंबिडोल (nimbidol)आणि गेडुनिन (gedunin) ही दोन औषधी संयुगे असतात, जी बुरशी नष्ट करण्याच्या कामी अत्यंत परिणामकारक आहेत. कडुनिंबाच्या तेलामध्ये आवश्यक फॅटी अॅसिड्स असतात. ही आम्लेसुद्धा जखम बरी करण्यास व आपली त्वचा निरोगी बनविण्यास मदत करतात. कडुनिंब कोणतेही कुरूप व्रण मागे न सोडता जखमा आणि बुरशीजन्य संसर्ग बरे करते. कडुनिंब सेप्टिक इन्फेक्शन्सनाही प्रतिबंध करते. याखेरीज कडुनिंब हा त्वचेला आर्द्रता पुरविणारा उत्तम स्त्रोत आहे. त्वचेवर कडुनिंबाचे तेल लावल्यास त्यातील फॅटी अॅसिड्स आणि जीवनसत्वे त्वचेला आर्द्रता देतात व तिचे पोषण करतात. यामुळे तुमची त्वचा नितळ, तरुण दिसते व त्यावर बुरशीची वाढ होत नाही. कडुनिंबातील ई जीवनसत्व क्षतीग्रस्त त्वचेला दुरुस्त करते तसेच पर्यावरणीय बदलांच्या परिणामांमुळे त्वचेच्या होणारी हानी नियंत्रणात ठेवते.

६. पचनशक्तीमध्ये सुधारणा व वजन घटविण्यास मदत –
कडुनिंबाची फुले ही अनॉरेक्सिया, मळमळणे, ढेकर येणे आणि पोटातील कृमींवरील उपचारासाठी उपयुक्त मानली जातात. कडुनिंबाची पाने ही पचनासाठी आणि चयापचयासाठी उपयुक्त असून त्यांच्यामुळे शरीरद्रव्ये चांगल्याप्रकारे स्त्रवतात असे आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले आहे. कडुनिंब ही कडू चवीची वनौषधी असल्याने तिची लाळ व शरीरस्त्रावांच्या पाझरण्यास मदत होते आणि चवीच्या संवेदना सक्रिय होतात. कडुनिंबामुळे दातांमधील पोकळ्या स्वच्छ करून चवींची संवेदना सुधारण्यासही मदत होते. परिणामी कॅलरीज जाळण्याची आणि चरबी कमी करण्याची प्रक्रियाही वेगाने होते. तुम्हीही जर नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याचा सुरक्षित आणि चांगला मार्ग शोधत असाल तर कडुनिंबाची ताजी फुले हा त्यासाठीचा सर्वात सुरक्षित उपाय आहे. कडुनिंबाची फुले आणि मध यांचे मिश्रण सकाळी उपाशीपोटी खाणे फायदेशीर मानले जाते. म्हणूनच सकाळी सर्वप्रथम या मिश्रणाचे सेवन करावे.

म्हणूनच कडुनिंबाला ”वन ट्री फार्मसी” मानले जाते व आपल्या अनेक औषधी गुणधर्मांमुळे ते घरगुती औषधांच्या संचातील एक अविभाज्य घटक बनले आहे.
( लेखिका डॉ. आरती सोमण या निसर्ग हर्ब्ज येथे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)