How to Lower Bad Cholesterol Naturally: चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, सततचे बाहेरचे खाणे आणि बदललेली जीवनशैली यामुळे आजकाल शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येते. कोलेस्ट्रॉल वाढले की त्याचा थेट परिणाम हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो, त्यामुळे वेळेत आहाराकडे लक्ष देणे आणि जीवनशैलीत आवश्यक बदल करणे महत्त्वाचे आहे.
कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय?
कोलेस्ट्रॉल हा शरीरासाठी आवश्यक असलेला मेणासारखा पदार्थ आहे. शरीरातील पेशी तयार करण्यापासून काही महत्त्वाची हार्मोन्स तयार करण्यापर्यंत विविध कामांसाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. मात्र, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढले तर ते रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जमा होऊ शकते. यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होण्याचा धोका वाढतो.
कोलेस्ट्रॉलचे किती प्रकार असतात?
कोलेस्ट्रॉल प्रामुख्याने LDL आणि HDL या दोन प्रकारांशी संबंधित असते. LDL म्हणजेच लो-डेन्सिटी लिपोप्रोटीनला सामान्यतः ‘खराब कोलेस्ट्रॉल’ म्हटले जाते. याचे प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होण्याचा धोका वाढू शकतो. दुसरीकडे HDL म्हणजेच हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीनला ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ म्हटले जाते, त्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते. यासाठी औषधोपचारांसोबतच संतुलित आहार आणि नियमित शारीरिक हालचाल यांचीही भूमिका महत्त्वाची असते.
मात्र, आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यानेही कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. याच संदर्भात २०१५ मध्ये अमेरिकन सोसायटी फॉर न्यूट्रिशनने केलेल्या एका अभ्यासात एका विशिष्ट बियांच्या सेवनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली होती.
अभ्यासात काय आढळलं?
अभ्यासानुसार, आहारात या बियांचा समावेश केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. या संशोधनाच्या सुरुवातीस, पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) असलेल्या रुग्णांमध्ये या बियांच्या सेवनामुळे खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे आढळले.
पेरिफेरल आर्टरी डिसीज असलेल्या लोकांमध्ये या बियांचे सेवन केल्यास खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांसोबत याचे सेवन केल्यास अतिरिक्त फायदा होऊ शकतो. याशिवाय रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होऊ शकते.
रक्ताभिसरणाशी काय संबंध?
पेरिफेरल आर्टरी डिसीज (Peripheral Artery Disease – PAD) याला मराठीत परिधीय धमनी रोग असे म्हणतात. ही रक्ताभिसरणाशी संबंधित स्थिती आहे. यामध्ये हात आणि विशेषतः पायांच्या धमन्या अरुंद होतात. परिणामी शरीराच्या या भागांना पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने चालताना पाय दुखणे किंवा थकवा जाणवणे यांसारख्या समस्या होऊ शकतात. चालताना पाय दुखण्याला क्लॉडिकेशन (Claudication) असे म्हणतात.
या बियांमध्ये असतात ‘हे’ पोषक घटक
प्राचीन काळापासून या बियांचा आहारात वापर केला जात आहे. ग्रीक, रोमन, इजिप्शियन, चिनी आणि भारतीय संस्कृतींमध्येही त्यांचा वापर होत असल्याचे सांगितले जाते. या बियांपासून तेलदेखील तयार केले जाते.
या बियांमध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी अॅसिड, विरघळणारे फायबर आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक आढळतात. यातील फायबर आणि इतर पोषक घटक हृदयाच्या आरोग्यासाठी तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
रोज किती प्रमाणात खावे?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारात साधारण एक चमचा या बियांचा समावेश करता येऊ शकतो. मात्र, कोणताही पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळावे. या बिया भाजून, बारीक करून स्मूदी, हलवा, लापशी, लाडू किंवा दह्यामध्ये मिसळूनही खाता येतात.
या बिया इतर ड्रायफ्रूट्स किंवा विविध बियांसोबत भाजूनही खाता येतात. मात्र, कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहारात त्यांचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
तुम्ही कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट घेत असाल, तर या बियांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
शेवटी जाणून घ्या, ‘या’ बिया कोणत्या?
तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात समाविष्ट करता येणाऱ्या या बिया म्हणजे जवसाच्या बिया (Flax Seeds). जवसाचा संतुलित प्रमाणात आहारात समावेश केल्यास त्यातील फायबर आणि इतर पोषक घटकांमुळे आरोग्याला फायदा होऊ शकतो.
