Kunal Kapur tips for crispy makyachi bhaji : पावसाळ्यात संध्याकाळी, खिडकीकडे पाऊस बघत, हातात चहाचा कप आणि कुरकुरीत भजी खाण्यासारखा दुसरा आनंद तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. जर तुम्हाला पावसाळ्यातील हा नाश्ता थोड्याश्या वेगळ्या पद्धतीने बनवायचा असेल, तर प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी ‘मक्याची भजी’ बनवण्याची एक मस्त रेसिपी शेअर केली आहे. ज्यामुळे तुमची भजी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ बनते आणि घरी बनवलेल्या क्रीमी चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही अगदी आनंदात खाऊ देखील शकता.

साहित्य

मक्याच्या मिश्रणासाठी

  • ३ कप मक्याचे दाणे (किसलेले आणि जाडसर वाटलेले)
  • १½ मोठे चमचे तूप
  • ½ छोटा चमचा हिंग
  • २ छोटे चमचे मोहरी
  • १ छोटा चमचा जिरे
  • मुठभर कढीपत्ता
  • २ छोटे चमचे बारीक चिरलेले आले
  • २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • ½ छोटा चमचा हळद पावडर
  • १ छोटा चमचा लाल तिखट
  • ½ कप दूध
  • चवीनुसार मीठ

भजीसाठी बॅटर

  • १ कप बेसन
  • चवीनुसार मीठ
  • १ छोटा चमचा लाल तिखट
  • ½ छोटा चमचा हळद पावडर
  • ½ छोटा चमचा कसुरी मेथी पावडर
  • मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ¾ कप पाणी

डिपसाठी

  • २ चीज स्लाईस
  • २ छोटे चमचे चिली फ्लेक्स
  • ६ कुटलेले काळे मिरे
  • १/४ छोटा चमचा बारीक चिरलेला लसूण
  • १/२ कप हंग कर्ड (घट्ट दही)
  • १/४ कप दूध (आवडीनुसार)
  • चिमुटभर काळे जिरे

कृती

  • पहिली पायरी म्हणजे मका किसून घेणे आणि तो जाडसर वाटून घेणे.
  • एका पॅनमध्ये तूप गरम करा.
  • त्यात हिंग, मोहरी, जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेले आले, हिरव्या मिरच्या घाला आणि छान सुगंध येईपर्यंत परता.
  • त्यानंतर हळद, लाल तिखट आणि मीठ घाला.
  • किसलेल्या मक्याचे मिश्रण त्यात घालून चांगले परता. दूध घाला आणि सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत परता.
  • दरम्यान, बेसन, मीठ, हळद, लाल तिखट, कसुरी मेथी, चिरलेली कोथिंबीर आणि पाणी एकत्र फेटून गुठळ्या नसलेले गुळगुळीत पीठ (बॅटर) तयार करा.
  • डिपसाठी, चीज स्लाईस, चिली फ्लेक्स, कुटलेले मिरे, चिरलेला लसूण, घट्ट दही, दूध (आवडीनुसार), काळे जिरे एकत्र करा. मिश्रण क्रीमी होईपर्यंत फेटा.
  • मक्याचे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे गोळे तयार करा. प्रत्येक गोळा बेसनाच्या पिठात बुडवा आणि मध्यम आचेवर कुरकुरीत व सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या आणि गरमागरम आणि क्रीमी डिपसोबत सर्व्ह करा.

शेफच्या खास टिप्स…

  • उत्तम पोत (टेक्श्चर) मिळवण्यासाठी कॉर्न (मका) बारीक किसून घ्या.
  • मिश्रण तयार करण्यापूर्वी त्यातील जास्तीचे पाणी काढून टाका.
  • अतिरिक्त पाणी घालू नका, कारण कॉर्नमध्ये भरपूर ओलावा असतो.
  • तळण्यापूर्वी हे मिश्रण ५ ते १० मिनिटे तसेच (मुरण्यासाठी) ठेवा.
  • मध्यम आचेवर तळा, जेणेकरून पकोडे व्यवस्थित शिजतील आणि त्यांना छान सोनेरी-तपकिरी रंग येईल.
  • एकाच वेळी कढईत खूप पकोडे घालू नका; त्याऐवजी थोडे-थोडे करून तळा.
  • अधिक चव येण्यासाठी सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर चाट मसाला टाका.
  • असे कुरकुरीत कॉर्न पकोडे पावसाळ्यातील नाश्त्यासाठी उत्तम आहेत आणि गरमागरम मसाला चहाबरोबर अतिशय छान लागतात.

शेफनी त्यांच्या @chefkunal या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही रेसिपी शेअर केली आहे; जी तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा…