Precautions when making tadka without oil : भारतीय जेवणात फोडणीला विशेष महत्त्व आहे. डाळ, भाजी अशा अनेक पदार्थांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी फोडणी दिली जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का, तेल न वापरताही फोडणी देता येते? ही पद्धत नेमकी कशी वापरायची, कोणत्या पदार्थांसाठी ती योग्य आहे आणि यामुळे पदार्थांच्या पौष्टिकतेवर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने सल्लागार आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह शिक्षक कनिका मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तेलाशिवाय फोडणी देण्याची पद्धत आणि त्यावेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली आहे.
तेलाशिवाय फोडणी कशी द्यावी?
या पद्धतीत मसाल्यांना कोरडे भाजणे आणि पाण्याचा वापर करणे यांचा समावेश होतो.
सर्वात आधी, स्टील किंवा कास्ट-आयरनच्या पॅनला मंद ते मध्यम आचेवर गरम करा. त्यात मोहरी टाकून ती तडतडेपर्यंत झाकून ठेवा. त्यानंतर जिरे, मेथी दाणे आणि सुकी मिरची घाला. सर्व मसाले थोडे भाजून घ्या आणि जळण्याआधीच गॅस बंद करून मसाले एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
यानंतर, त्याच पॅनमध्ये दोन ते तीन चमचे पाणी (एका वेळी एक चमचा याप्रमाणे) घाला. त्यात ठेचलेला लसूण, आले, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून एक-दोन मिनिटे शिजवा. पाणी आटत असताना या घटकांचा सुगंध बाहेर पडू लागेल.
शेवटी, हळद, तिखट किंवा धणे पूड थोड्या पाण्यात मिसळून त्याची पेस्ट (slurry) तयार करा आणि ती पॅनमध्ये घाला. हिंग कोमट पाण्यात विरघळवून त्यात टाका. सर्व मसाले आणि सुगंधी घटक एकत्र करा आणि ही फोडणी डाळीवर घाला.
या पद्धतीत पाण्याचा वापर केल्यामुळे पावडर मसाले जळण्याची शक्यता कमी होते. तसेच, मसाले कोरडे भाजल्यामुळे तेलात दिलेल्या फोडणीप्रमाणेच पदार्थाला भाजलेल्या मसाल्यांचा स्वाद आणि सुगंध मिळतो.
तेलाशिवाय फोडणी केल्याने चव आणि पौष्टिक मूल्यात काही बदल होतो का?
पाण्याचा वापर केल्यामुळे केवळ कॅलरीच कमी होत नाहीत, तर पदार्थाचे स्वरूपही बदलते. अख्खे मसाले आधी कोरडे भाजल्यास, त्यातील सुगंध पुन्हा मिळवण्यास मदत होते. जर तुम्हाला कढीपत्त्याचा कुरकुरीतपणा हवा असेल, तर तो अगदी शेवटी कोरड्या पॅनमध्ये टाका; कारण पाण्यात शिजवल्यास कढीपत्ता मऊ पडतो.
पाण्याचा वापर केल्यामुळे कॅलरी कमी होणे हा देखील एक फायदा आहे. एका चमचा तेलातून सुमारे ४५ कॅलरी मिळतात, त्यामुळे तेलाचा वापर टाळल्यास जेवणातील एकूण ऊर्जा (कॅलरी) कमी होऊ शकते. अर्थात तुम्ही किती तेल वापरता यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.
मात्र या पद्धतीचा एक तोटाही आहे. काही पोषक घटक, जसे की कॅरोटीनॉइड्स आणि कर्क्युमिन, हे चरबीत विरघळणारे असतात. त्यामुळे शरीराला त्यांचे योग्य प्रमाणात शोषण करता यावे, यासाठी आहारात तेल किंवा इतर चरबीयुक्त पदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन ए, ई आणि के च्या उत्तम शोषणासाठी आहारात चरबीयुक्त घटकांची (फॅट्स) आवश्यकता असते. तज्ज्ञांच्या मते, निरोगी आहारासाठी प्रत्येक पदार्थातून तेल पूर्णपणे काढून टाकणे आवश्यक नाही. त्याऐवजी, जेवणातील इतर घटकांमध्ये जसे की, दूध, दही, सुका मेवा किंवा पोळीबरोबर थोडे तूप, चरबीचा स्रोत समाविष्ट करणे अधिक योग्य ठरणार आहे.
कोणत्या पदार्थांसाठी तेल न घालता फोडणी देणे बेस्ट राहील?
डाळ, सांबार, रसम, कढी, पोहे, उपमा, कोशिंबीर, ताक आणि दुधी भोपळा किंवा कोबीसारख्या सुक्या भाज्यांच्या तयारीसाठी ही पद्धत (तेलमुक्त तडका) चांगली आहे. मात्र, काही पदार्थांची खास चव आणि पोत टिकून राहण्यासाठी त्यात तेल किंवा तुपासारख्या चरबीयुक्त घटकांची आवश्यकता असते. त्यामुळे अशा पदार्थांमध्ये तेलाशिवाय फोडणी दिल्यास चव आणि पोतामध्ये फरक जाणवू शकतो.
उदाहरणार्थ – दाल मखनी, मोहरीच्या किंवा नारळाच्या तेलात बनवलेले पदार्थ आणि बिर्याणी यांसारख्या पदार्थांमध्ये तेल न वापरल्यास अपेक्षित चव मिळणार नाही. अशा पदार्थांच्या बाबतीत, तेल पूर्णपणे काढून टाकण्याऐवजी, त्याचा अल्प प्रमाणात वापर करा.
तेल न वापरता तडका देताना कोणती काळजी घ्यावी?
- गरम कढईत पाणी टाकताना काळजी घ्या. पाणी उडू शकते, त्यामुळे ते थोडे-थोडे आणि जपून टाका.
- पाण्याचा वापर जास्त करू नका. अन्यथा फोडणीला पेस्टसारखे स्वरूप येऊ शकते.
- पदार्थ तयार होण्यापूर्वी फोडणीतील पाणी पूर्णपणे आटवून घ्या.
- सुके मसाले भाजताना लक्ष ठेवा. त्यांचा सुगंध येऊ लागताच ते लगेच काढून घ्या, कारण मसाले लवकर जळू शकतात.
- लोखंडी कढई वापरत असल्यास ती वापरल्यानंतर पूर्णपणे कोरडी करून ठेवा. यामुळे कढईचा संरक्षक थर (सीझनिंग) टिकून राहण्यास मदत होते.
- नॉन-स्टिक पॅन खूप गरम असताना त्यात एकदम थंड पाणी टाकू नका. तापमानातील अचानक बदलामुळे पॅन खराब होऊ शकतो किंवा त्याचा आकार बदलू शकतो.
