Is drinking ginger tea good for digestion : पावसाळ्यात पचनाशी संबंधित समस्या अधिक वाढतात. कारण या काळात हवेत आर्द्रता जास्त असल्याने अन्न आणि पाण्यात जिवाणू, विषाणू तसेच बुरशीची वाढ झपाट्याने होते, दूषित अन्न किंवा पाणी प्यायल्याने अन्नातून विषबाधा, अतिसार, पोटाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे या ऋतूत लोकांना अनेकदा गॅस, पोट फुगण्यासारख्या पचनाच्या समस्यांचा त्रास होतो.

अनेकदा दुपारच्या जेवणानंतर त्यांना पोट जड झाल्यासारखे किंवा फुगल्यासारखे वाटते. जर तुम्हाला असा अनुभव येत असेल, तर पचनास मदत करणारा हा खास चहा नक्की प्या. पोटाच्या समस्यांवर कोणतेही एक पेय रामबाण उपाय नसला तरीही आल्याचा चहा पचन सुधारण्यास, पोट फुगणे, गॅस किंवा पोटात जडपणा जाणवणे यांसारखा त्रास कमी करण्यास मदत करू शकतो.

लिसा व्हॅलेंटे या एम.एस., आरडी पदवीधारक नोंदणीकृत आहारतज्ज्ञ आहेत. त्या ‘ईटिंग वेल’च्या माजी वरिष्ठ डिजिटल पोषण संपादक असून त्यांनी मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये आहारशास्त्रातील इंटर्नशिप पूर्ण केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना द इंडियन एक्स्प्रेसने यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, ‘आल्याचा चहा’ म्हणजे दूध घालून बनवलेला नियमित चहा नव्हे. खरा आल्याचा चहा हा पाण्यात ताजे आले उकळून तयार केला जातो. त्यामुळे त्याचे आरोग्यदायी गुणधर्म अधिक प्रभावीपणे मिळतात.

आल्याच्या चहामध्ये अँटीऑक्सिडंट, दाह-विरोधी गुणधर्म असलेले अनेक घटक असतात, जे पचन सुधारतात. जर तुम्हाला दुपारच्या जेवणानंतर वारंवार पोट जड वाटणे, गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होत असेल. तर एक कप आल्याचा चहा मदत करू शकतो. आल्याचा चहा पचनक्रिया सुधारण्यास कशी मदत करतो याबद्दल जाणून घेऊया…

आल्याचा चहा पचनास कशी मदत करतो?

अन्न पचण्यास मदत

आल्यामधील जिंजरॉल्स, शोगॉल्स अन्न पोटातून लहान आतड्यात जाण्याची प्रक्रिया (गॅस्ट्रिक एम्प्टींग) वेगवान करू शकतात. यामुळे अन्न पोटात जास्त वेळ रेंगाळत नाही आणि जडपणा किंवा अपचनाची भावना कमी होऊ शकते. ज्या लोकांना जेवणानंतर जडपणा जाणवतो. त्यांच्यासाठी हा चहा फायदेशीर आहे.

गॅस आणि पोट फुगी

आल्यामध्ये नैसर्गिक वातहारक गुणधर्म असतात, जे आतड्यांच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतात. यामुळे गॅस सहजपणे बाहेर पडण्यास मदत होते आणि पोट फुगणे, पेटके आणि अस्वस्थता कमी होऊ शकते.

मळमळ

जर तुम्हाला जेवणानंतर मळमळ किंवा उलट्या होत असतील, तर तुम्ही आल्याचा चहा पिऊन पाहू शकता. यामुळे आराम मिळू शकतो. गरोदरपणात, शस्त्रक्रियेनंतर आणि केमोथेरपी दरम्यान होणारी मळमळ कमी करण्यासाठी आल्याचा चहा अत्यंत उपयुक्त ठरतो असे अनेक अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहे.

कोणत्या सवयी पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात?

जेवण चावून खा

जर तुमची पचनक्रिया खराब असेल आणि पोट फुगत असेल. तर तुमचे अन्न व्यवस्थित चावून खा. खूप घाईने खाल्ल्याने पोटात जास्त हवा जाऊ शकते, ज्यामुळे गॅस, पोट फुगणे वाढू शकते. त्यामुळे प्रत्येक घास व्यवस्थित चावून खा.

तणावावर नियंत्रण

तणाव सर्व आजारांचे मूळ आहे. तणावाचा संबंध पोटाशी असतो, जो पचनसंस्थेवर परिणाम करतो. तणावामुळे पोट फुगते, पचनक्रिया बिघडते. तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी, दीर्घ श्वासोच्छ्वास, ध्यान आणि पुरेशी विश्रांती घ्या.

या टिप्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकतात…

शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा

जर तुम्हाला चांगली पचनक्रिया हवी असेल. तर तुमचे शरीर सक्रिय ठेवा. जेवणानंतर हलके चालणे, योगा करणे किंवा नियमित व्यायाम केल्याने आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत होऊ शकते.

पुरेसे पाणी

आल्याच्या चहाबरोबरच, दिवसभर भरपूर पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे. डिहायड्रेशनमुळे पचनक्रिया आणि शौचावर परिणाम होऊ शकतो. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि पचनक्रिया सुधारते.

डॉक्टरांचा सल्ला आवश्यक…

जर गॅस, पोट फुगणे, पोटदुखी किंवा अपचन वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे पचनाच्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

पचनक्रिया सुधारण्यासाठी पुढील तीन चहांचे सेवन करा…

आले-लिंबू चहा

१ कप पाणी उकळा.
त्यात १ इंच किसलेले आले घाला आणि ५-७ मिनिटे शिजवा.
गाळून घ्या आणि चवीनुसार थोडे लिंबाचा रस आणि मध घाला.

फ्रोजन लिंबू-आले-हळद शॉट्स

आले, लिंबाचा रस, १/२ चमचा कच्ची हळद आणि थोडे पाणी एकत्र वाटून घ्या.
मिश्रण आईस क्यूब ट्रेमध्ये गोठवा.
गरज वाटल्यास, तुम्ही १-२ क्यूब पाण्यात मिसळून पिऊ शकता.

आल्याचा चहा

१ कप पाण्यात १ इंच आल्याचा किस घालून ५ मिनिटे उकळवा.
गाळून तसेच प्या किंवा आवडीनुसार थोडे मध घाला.