methods for perfect thick homemade dahi : उन्हाळा जसजसा जवळ येतो तेव्हा शरीराला थंडावा मिळावा यासाठी आपण आपसूकच थंडगार पदार्थांकडे वळतो. उसाचा रस, कोकम सरबत, लिंबू पाणी, ताक किंवा अगदी साखर घातलेलं वाटीभर दही. उन्हाळ्यात ताज्या व घट्ट दह्यासारखा दुसरा कोणताच उत्तम उपाय नाही. त्याचबरोबर आरोग्यतज्ज्ञसुद्धा दह्याचा दैनंदिन आहारात समावेश करण्यास प्रोत्साहन देत असतात. मात्र, दररोज दुकानातून विकत घेतलेले दही कालांतराने महाग पडू शकते.

याउलट घरी बनवलेले दही कोणत्याही प्रिझर्व्हेटिव्ह्ज (जास्त दिवस टिकवण्यासाठी टाकलेले पदार्थ) आणि अतिरिक्त रसायनांपासून (चव, रंग वाढवण्यासाठी टाकलेले पदार्थ) मुक्त असते, ज्यांचा दीर्घकाळाने आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. डिजिटल क्रिएटर शशांक असली (Shashank Asli) यांनी नुकतेच सोशल मीडियावर घरीच दही बनवण्याच्या ३ सोप्या पद्धती शेअर केल्या आहेत, त्याचबद्दल आपण जाणून घेऊयात…

एक लिटर दुधाचे तीन वाट्यांमध्ये विभाजन करा

१. लिंबाचा रस

सगळ्यात पहिल्या दूध ठेवलेल्या वाटीत अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. लिंबामुळे दुधात आम्लता (acidity) निर्माण होते, ज्यामुळे घट्ट, किंचित आंबट आणि उत्तम पोत असलेले दही तयार होते.

Award Banner

२. हिरवी मिरची

दुसऱ्या दूध ठेवलेल्या वाटीत एक अख्खी मिरची किंवा ज्याचे वरचे टोक कापलेले आहे अशी एक मिरची यात घाला. मिरच्यांच्या पृष्ठभागावर नैसर्गिकरित्या ‘लॅक्टोबॅसिलस’ (Lactobacillus) जीवाणू असतात, जे दही लावण्यास मदत करतात. यात मिरचीची तिखट चव येत नाही. पण, लिंबू वापरून लावलेल्या दह्यापेक्षा हे थोडेसे पातळ असते.

३. दही

आधीपासून उपलब्ध असलेल्या दह्याचा एक चमचा यात घाला, कारण यात आधीच दह्याचे सक्रिय जीवाणू (active culture) उपस्थित असतात, यामुळे दह्याचा पोत (texture) अगदी उत्तम जमतो आणि चवही नेहमीच्या बाहेरून विकत आणलेल्या दह्यासारखी असते. ही विश्वासू पद्धत म्हणून ओळखली जाते.

फायदे

द इंडियन एक्स्प्रेसने जिंदाल नॅचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ सुषमा पी. एस. यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, घरी बनवलेले दही ‘प्रोबायोटिक्स’ने समृद्ध असते, यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते, पचनास मदत होते आणि ‘लॅक्टोज इनटॉलरन्स’ची (लॅक्टोज न पचण्याची समस्या) लक्षणे कमी करण्यासही उपयुक्त ठरते. याव्यतिरिक्त दही पोषकतत्त्वांनी परिपूर्ण असते; त्यातून शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि ‘ब’ जीवनसत्त्वे मिळतात.

जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल आणि तुम्हाला दही अगदी घट्ट व व्यवस्थित लागावे असे वाटत असेल तर या तज्ज्ञांनी दिलेल्या खालील सूचनांचे नक्की पालन करा…

  • दूध उकळून घ्या आणि त्यानंतर ते घट्ट होईपर्यंत मंद आचेवर गरम करून घ्या.
  • मग दूध अगदी थोड्या प्रमाणात थंड होऊ द्या. (पूर्ण थंड होऊ देऊ नका)
  • आता दूध छान फेसाळ करा. हे करण्यासाठी दूध एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात चार–पाच वेळा ओतत राहा. त्यानंतर त्या दुधात थोडं दही घाला आणि एक-दोन वेळा हलक्या हाताने ढवळा.
  • एका जाड भांड्यात, कॅसरोलमध्ये किंवा मातीच्या भांड्यात दही लावण्यासाठी एखाद्या उबदार ठिकाणी ५ ते ८ तास (किंवा हवामानानुसार रात्रभर) ठेवून द्या.
  • भांड्यावर झाकण ठेवल्याची खात्री करा.
  • दही तयार झालं की लगेचच फ्रिजमध्ये ठेवा.

दही लावताना करायच्या आणि टाळायच्या गोष्टी पुढीलप्रमाणे…

१. घट्ट दही बनवण्यासाठी पूर्ण फॅट असलेले दूध (whole milk) वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दूध सुमारे १० मिनिटे मंद आचेवर उकळल्याने दही छान घट्ट बनते, मात्र दूध करपणार नाही याची काळजी घ्या.

२. दही लावण्यासाठी ताजे आणि उत्तम दर्जाचे दही वापरा आणि दुधात घालण्यापूर्वी ते खोलीच्या तापमानावर (room temperature) आहे का याचीदेखील खात्री करा. तुम्ही एक मोठा चमचा दही वापरू शकता. त्याचबरोबर दही घट्ट होण्यासाठी दुधाला फेस आणणे अत्यंत आवश्यक आहे.

३. आंबट विरजण वापरू नका अन्यथा तुमचे दही आंबट होईल. विरजण दुधात एकसमान मिसळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चमच्याने किंवा ‘व्हिस्कर’ने ते व्यवस्थित घुसळून घ्या. उत्तम दर्जाचे दही लावण्यासाठी मातीची भांडी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.

४. थंड हवामानात राहणाऱ्यांसाठी दही लागायला थोडा जास्त वेळ लागू शकतो. अशावेळी दही ओव्हनमध्ये ठेवणे किंवा ते उबदार राहील अशा जुन्या स्वेटरने झाकून ठेवणे योग्य ठरते.

५. शेवटी, दह्याचा घट्टपणा हा वापरलेल्या दुधाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो, त्यामुळे प्रत्येक वेळी दही सारखं होईलच असं नाही. तसेच जर तुम्ही दही पहिल्यांदाच घरी लावत असाल तर ते किमान दोन वेळा लावण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठी योग्य पद्धत कोणती ते समजायला मदत होईल.