Liver Cirrhosis: लिव्हर सिरोसिसचे निदान होणे ही कोणत्याही रुग्णासाठी मानसिकदृष्ट्या खचवून टाकणारी बाब असू शकते. अतिमद्यपान, हिपॅटायटीस बी किंवा सी, फॅटी लिव्हर आणि ऑटोइम्युन विकार यांसारख्या दीर्घकालीन कारणांमुळे हा आजार उद्भवतो. नुकतेच एका नवीन निदान झालेल्या रुग्णाने ‘कोरा’ (Quora) या प्लॅटफॉर्मवर विचारले की, “मला सिरोसिसचे निदान झाले आहे, हा आजार पुन्हा बरा होऊ शकतो का?” अनेक रुग्णांच्या मनात हाच प्रश्न कायम आहे.

तज्ज्ञांच्या मते, हा आजार बरा होणे हे मोठ्या प्रमाणावर तो कोणत्या टप्प्यावर आहे, यावर अवलंबून असते. परळमधील ग्लेनेगल्स हॉस्पिटलचे हेपॅटोलॉजी संचालक डॉ. अमित मांडोत यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “एकदा का लिव्हरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यातही पुढच्या टप्प्यात (Advanced stage), की लिव्हरवर कायमस्वरूपी व्रण (Scarring) तयार होतात. अशा स्थितीत सिरोसिस पूर्णपणे बरा होणे कठीण असते.”

आजाराचे स्वरूप बदलणे शक्य आहे का?

जर या आजाराचे निदान सुरुवातीच्या टप्प्यावर झाले, तर आशेचा किरण नक्कीच असतो. डॉ. मांडोत सांगतात की, “सुरुवातीच्या काळात योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे लिव्हरचे झालेले नुकसान काही अंशतः भरून काढता येऊ शकते. मात्र, जर जखमा किंवा डाग (Scarring) वाढले असतील, तर ते कायमस्वरूपी असतात. अशा वेळी आजार अधिक वाढू नये, यावर लक्ष केंद्रित केले जाते.”

उपचारांमुळे लिव्हरची कार्यक्षमता सुधारते का?

हो, नक्कीच. प्रामुख्याने सुरुवातीच्या टप्प्यात उपचार आणि जीवनशैलीत बदल केल्यास लिव्हरचे कार्य सुधारू शकते. आजाराच्या मूळ कारणावर म्हणजे मद्यपान, संसर्ग किंवा चुकीचा आहार यावर काम केल्यास मोठा फरक पडतो. “कारण शोधून त्यावर नियंत्रण मिळवल्यास, जसे की दारू पूर्णपणे बंद करणे किंवा संसर्गावर उपचार करणे, आजाराचा वेग मंदावतो आणि लिव्हरला काही प्रमाणात बरे होण्यास मदत होते,” असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

जीवनशैलीत कोणते बदल आवश्यक आहेत?

सिरोसिसच्या व्यवस्थापनात दैनंदिन सवयी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.

  • मद्यपान पूर्णपणे बंद करणे.
  • मीठ कमी असलेला संतुलित आहार घेणे.
  • वजन नियंत्रित ठेवणे.
  • नियमित वैद्यकीय तपासणी करणे.
  • स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळावे, जेणेकरून लिव्हरवर अतिरिक्त ताण येणार नाही.

यकृत प्रत्यारोपणाची (Liver Transplant) गरज कधी भासते?

जेव्हा आजार गंभीर रूप धारण करतो आणि लिव्हर निकामी होऊ लागते, तेव्हा ‘लिव्हर ट्रान्सप्लांट’ हा एकमेव पर्याय उरतो. सकारात्मक बाब अशी की, प्रत्यारोपणानंतरचे निकाल चांगले आहेत. योग्य काळजी आणि फॉलो-अप घेतल्यास अनेक रुग्ण प्रत्यारोपणानंतर १० ते २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ उत्तम आयुष्य जगू शकतात.

सिरोसिस, प्रामुख्याने शेवटच्या टप्प्यात, पूर्णपणे बरा होत नसला तरी, वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास परिस्थिती नक्कीच सुधारू शकते. जीवनशैलीतील बदल आणि नियमित वैद्यकीय उपचार रुग्णाचे आयुष्य सुखकर करण्यास मदत करतात.