Newborn Baby Massage Tips : घरात बाळाच्या आगमनाने जितका आनंद होतो, तितकीच जबाबदारीही वाढते. यात पहिल्यांदा पालक बनलेल्या जोडप्यांना बाळासाठी काय योग्य काय नाही हे ओळखताना गडबड होते. काळजीपोटी ते बाळासाठी सर्व काही करत असतात, पण अनेकदा चुकीच्या गोष्टी होतात.
बाळाची काळजी घेताना काहीवेळा घरातील वडीलधाऱ्यांनी सांगितलेल्या पद्धती पाळाव्यात की डॉक्टरांचा सल्ला ऐकावा हे समजत नाही. अनेकदा बाळाला लोक चुकीच्या पद्धतीने मालिश करताना दिसतात, यात त्वचा उजळ दिसण्यासाठी बाळाच्या शरीरावर दूध, तूप, चण्याचे पीठ, मलाई लावून मालिश केली जाते; पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. बाळाला चुकीच्या पद्धतीने मालिश केल्याने काय होते आणि मालिश करण्याची योग्य पद्धत काय जाणून घेऊ.
डॉ. माधवी भारद्वाज यांनी ‘बच्चों की डॉक्टर’ या इन्स्टाग्राम सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या एका मुलाच्या चेहऱ्यावरील पुरळाबद्दल विचारपूस करत आहेत. त्यावर एक माणूस उत्तर देतो की, हे कदाचित पंजिरी खाल्ल्यामुळे झाले असावे.
डॉक्टर सांगतात की, पंजिरी केवळ चवीलाच चांगली नसते तर ती नवीन आईच्या शरीरासाठी फायदेशीरही असते. पंजिरी खाल्ल्याने बाळाच्या त्वचेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. पंजिरी बनवण्यासाठी वापरलेले घटक पचनानंतर दुधाद्वारे आवश्यक पोषक तत्त्वांच्या स्वरूपातच बाळापर्यंत पोहोचतात. शिवाय, यामुळे रक्त तयार होण्यास मदत होते आणि शरीर मजबूत होते, तसेच बाळाला भरपूर पोषण मिळते, त्यामुळे पंजिरी खाल्ल्याने बाळाच्या त्वचेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
बाळाच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी?
बाळाची त्वचा खूप नाजूक आणि संवेदनशील असते आणि त्यांच्या तेल ग्रंथी खूप सक्रिय असतात; त्यामुळे जेव्हा दूध, तूप किंवा लोणी यांसारखे पदार्थ त्याच्या चेहऱ्यावर लावले जातात, तेव्हा त्वचेवर त्यांचा थर साचल्याने जीवाणू आणि बुरशीची वाढ होऊ शकते. इतकेच नाही तर या पदार्थांमुळे त्वचेवरील बारीक छिद्रे बंद होऊन जंतुसंसर्ग होऊ शकतो, म्हणूनच बाळाची त्वचा स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यांना मोकळा श्वास घेता येईल.
बाळाच्या मालिशसाठी नारळाचे तेल वापरण्याचे फायदे
डॉक्टरांच्या मते, मालिशसाठी नारळाचे तेल हा सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम पर्याय आहे. ते हायपोअलर्जेनिक आहे, म्हणजेच त्यामुळे ॲलर्जी होण्याची शक्यता खूप कमी असते. नारळाचे तेल हलके असते आणि त्वचेत सहजपणे शोषले जाते. कोणताही ऋतू असो, नारळाच्या तेलाने संपूर्ण शरीराची मालिश करणे तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी आणि नाजूक त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
