5 Simple Tips To Pick Sweet Apple : जवळजवळ प्रत्येक घरात सफरचंद खाल्ले जातात. या फळात फायबर, जीवनसत्त्वे, पाणी, नैसर्गिक साखर आणि खनिजे असतात. बाजारात सफरचंद घेताना आपण अनेकदा लाल आणि चमकदार सफरचंद निवडतो. मात्र, घरी आणल्यानंतर ते अपेक्षेइतके गोड नसल्याचे लक्षात येते. अनेकांना लाल सफरचंद म्हणजे जास्त गोड असे वाटते. पण, प्रत्येक वेळी असे असेलच असे नाही.
खरं तर, सफरचंदांच्या अनेक जाती आहेत आणि त्या प्रत्येकाची चव गोड, किंचित आंबट किंवा गोड-आंबट असू शकते. त्यांचे रंग हिरव्या, पिवळ्या, गुलाबी ते गडद लाल रंगापर्यंत असू शकतात. त्यामुळे, सफरचंदाचा गोडवा केवळ त्याच्या रंगावरून ठरवता येत नाही. पण, त्याचा सुगंध, ताजेपणा आणि प्रकारावरून आपल्याला गोड सफरचंद ओळखण्यास मदत होऊ शकते. तर याचबद्दल आपण या बातमीतून जाणून घेऊयात.
सुगंध
सफरचंद खरेदी करताना प्रथम त्याचा सुगंध घ्या. बहुतेक पिकलेल्या, उच्च-गुणवत्तेच्या सफरचंदांमधून एक सौम्य, नैसर्गिकरित्या गोड सुगंध येतो. जर सफरचंदाला अजिबात सुगंध येत नसेल. तर याचा अर्थ ते खराब झाले आहे असा होत नाही.
वजन
तुम्ही सफरचंद त्याच्या वजनावरूनही गोड आहे की, नाही हे ठरवू शकता. एकाच आकाराची दोन सफरचंदं हातात धरा. जे सफरचंद त्याच्या आकाराच्या मानाने जड आणि टणक वाटते ते सफरचंद ताजे आणि रसाळ असते.
प्रेस करून बघणे
एक सफरचंद तळहातावर घ्या आणि त्याचा टणकपणा तपासण्यासाठी ते हळूवारपणे दाबा. चांगले सफरचंद साधारणपणे टणक आणि भरीव वाटते. जर सफरचंद खूप जास्त दाबले जात असेल आणि दाबल्यावर त्यात खळगी पडत असेल, तर ते जास्त पिकलेले किंवा खराब झालेले असू शकते.
रंग
ज्या सफरचंदाच्या खालच्या बाजूला हलका पिवळा किंवा सोनेरी रंग दिसतो, ते सफरचंद झाडावरच चांगले पिकलेले असण्याची शक्यता असते. तसेच, सफरचंदाच्या सालीवर छोटे पांढरे दाण्यासारखे ठिपके स्पष्ट आणि ठळक दिसत असतील, तर ते सफरचंद गोड असण्याची शक्यता अधिक असते.
देठ
जर सफरचंदाच्या देठावर जास्त आकुंचन, ओलावा, बुरशी किंवा खराब झाल्याची चिन्हे दिसत असतील तर असे सफरचंद खाणे टाळावे. जर देठ हिरवा आणि तपकिरी असेल, तर हे त्याच्या ताजेपणाचे लक्षण असू शकते.
फक्त चमकदार सफरचंद निवडू नका
लोकांना बाजारात लाल आणि चमकदार सफरचंद पाहून ते खरेदी करावेसे वाटतात. मात्र, काही सफरचंदांवर ते अधिक चमकदार दिसावेत आणि जास्त काळ ताजे राहावेत यासाठी खाद्य-दर्जाच्या मेणाचा थर लावलेला असू शकतो. त्यामुळे केवळ सफरचंद किती चमकदार आहे, यावरून त्याची गोडी किंवा गुणवत्ता ठरवू नका. सफरचंद घेताना त्याचा ताजेपणा, सुगंध, टणकपणा आणि कोणत्या जातीचे आहे, हेही लक्षात घ्या.
