Monsoon Foot Care Tips : प्रत्येकाला पावसाळा सुखद वाटतो. कारण- उन्हापासून आराम मिळतो; पण त्याचबरोबर पायांना संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. पावसाळ्यात विविध ठिकाणी साठलेल्या घाणेरड्या पाण्यात पाय भिजल्यामुळे पायांना खाज सुटणे, लालसरपणा आणि बुरशीजन्य संसर्ग होणे सामान्य आहे. पायांमधील ओलावा आणि घामामुळे जीवाणू आणि बुरशीची झपाट्याने वाढ होते. ही समस्या अनेकांना सतावते. जर तुम्हालाही पावसाच्या पाण्यामुळे पायांना खाज सुटण्याचा आणि संसर्गाचा त्रास होत असेल, तर औषधांसह काही घरगुती उपाय करून आराम मिळवू शकता.
१) कोमट पाणी आणि मीठ
कामावरून घरी परतल्यानंतर सर्वप्रथम पाय स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर एका टबमध्ये कोमट पाणी भरून, त्यात थोडे सैंधव मीठ टाका. त्या पाण्यात पाय १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवा. मिठातील जीवाणूनाशक गुणधर्मामुळे त्वचेवरील बुरशी नाहीशी होण्यास आणि खाज कमी करण्यास मदत होते.
२) कडुलिंबाचे पाणी किंवा तेल
कडुलिंब बुरशीनाशक आणि जंतुनाशक मानले जाते. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा आणि त्या पाण्याने आपले पाय धुवा. त्याव्यतिरिक्त तुम्ही नारळाच्या तेलात कडुलिंबाचे तेल मिसळून, ते पायांच्या खाज येणाऱ्या किंवा बुरशीजन्य भागावर लावा. त्यामुळे खाज आणि जळजळ होण्यापासून त्वरित आराम मिळेल.
३) टी ट्री ऑईल
बुरशीजन्य संसर्गापासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही टी ट्री ऑईलचाही वापर करू शकता. टी ट्री ऑईलचे दोन-तीन थेंब खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलाच्या काही थेंबांमध्ये मिसळा आणि कापसाच्या बोळ्याने बाधित भागावर लावा. त्यामुळे बुरशीची वाढ रोखली जाते.
४) ॲपल सायडर व्हिनेगर
एका टबमध्ये पाणी घ्या. टबमध्ये समान प्रमाणात पाणी आणि ॲपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि त्यात पाय १५ मिनिटे बुडवून ठेवा. व्हिनेगरचा आम्लधर्मी स्वभाव बुरशीजन्य संसर्ग कमी करण्यास मदत करतो.
संसर्ग टाळण्यासाठी घ्या ‘अशी’ काळजी
१) पाय कोरडे ठेवा: अंघोळ केल्यानंतर किंवा पाय धुतल्यानंतर, पायांच्या बोटांमधील जागा टॉवेलने पूर्णपणे कोरडी करा. ओलावा हे बुरशीजन्य संसर्गाचे प्रमुख कारण आहे.
२) बुरशीनाशक पावडर : पायांमधील ओलावा टाळण्यासाठी दररोज टाल्कम पावडरऐवजी बुरशीनाशक पावडर वापरा.
३) योग्य चप्पल निवडा: पावसाळ्याच्या दिवसांत बूट किंवा ओले मोजे घालणे टाळा. हवा खेळती राहील असे बूट किंवा चपला वापरा.
४) ओले मोजे ताबडतोब बदला: पावसात मोजे ओले झाल्यास, ते ताबडतोब काढून स्वच्छ आणि कोरडे मोजे घाला.
