Tobacco Addiction Easy Ways to Quit Tobacco and Health Benefits: तंबाखू हा शब्द छोटा असला तरी त्याचा परिणाम मात्र अतिशय गंभीर असतो. सिगारेट, विडी किंवा पानाच्या माध्यमातून शरीरात जाणारा तंबाखू हळूहळू आरोग्याला पोखरत राहतो. तंबाखूचे सेवन हे कर्करोगाचे प्रमुख कारण मानले जाते. केवळ सेवन करणाऱ्या व्यक्तीवरच नव्हे, तर त्याच्या कुटुंबावर आणि आसपासच्या व्यक्तींवरही त्याचा परिणाम होतो. मात्र, ही सवय सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर नेमकी सुरुवात कुठून करायची, हा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
अपोलो रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर डॉ. प्रोफेसर एस.व्ही.एस. देव यांच्या मते, तंबाखूची सवय सोडणे अनेकांसाठी आव्हानात्मक असते. मात्र, योग्य नियोजन, इच्छाशक्ती आणि आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शन घेतल्यास ही सवय नक्कीच सोडता येऊ शकते. तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांमुळे जगभरात दरवर्षी सुमारे ८० लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यातील सुमारे १० लाख मृत्यू हे दुसऱ्यांनी सोडलेल्या सिगारेट वा विडीद्वारे सोडलेल्या धुराच्या संपर्कात आल्यामुळे म्हणजेच अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे होतात.
तंबाखूचे प्रकारही बदलले
पूर्वी तंबाखू म्हटलं की प्रामुख्याने विडी, सिगारेट किंवा पान यांचा विचार केला जायचा. मात्र, आता तंबाखूचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. विविध स्वादांचे तंबाखूजन्य पदार्थ यांचा वापरही वाढला आहे.
त्यातील काही पदार्थ तुलनेने कमी घातक असल्याचा गैरसमज अनेकांमध्ये आहे. मात्र, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे एका प्रकारच्या तंबाखूऐवजी दुसरा प्रकार वापरणे हा सवय सोडण्याचा योग्य मार्ग नाही.
मुलांमध्येही वाढतेय व्यसनाची समस्या
तंबाखूचे व्यसन केवळ प्रौढांपुरते मर्यादित राहिलेले नाही. दरवर्षी जगभरातील सुमारे ३.५ कोटी मुले तंबाखूच्या व्यसनाच्या विळख्यात सापडत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे पालकांसाठी ही गंभीर चिंतेची बाब आहे.
मुलांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, त्यांचे दैनंदिन वर्तन कसे आहे, ते कोणत्या वातावरणात वावरतात आणि सामाजिक माध्यमांवर त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा प्रभाव पडतो, याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मुलांशी मोकळेपणाने संवाद साधणे आणि तंबाखूच्या दुष्परिणामांची योग्य माहिती देणे महत्त्वाचे आहे.
तंबाखू सोडताना सुरुवातीचे दिवस ठरतात कठीण
तंबाखूची सवय एका दिवसात सुटत नाही. विशेषतः सुरुवातीचे दोन ते चार आठवडे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतात. त्यातही पहिले तीन दिवस अधिक कठीण असतात. शरीराला निकोटिनची सवय झालेली असल्याने त्याची कमतरता जाणवू लागते. त्यामुळे चिडचिड, अस्वस्थता, डोकेदुखी, बेचैनी किंवा झोप न लागणे यांसारखी लक्षणे जाणवू शकतात.
मात्र, ही लक्षणे आली म्हणून पुन्हा तंबाखूकडे वळणे टाळणे गरजेचे आहे. सुरुवातीचा काळ संयमाने पार केल्यास पुढील प्रवास तुलनेने सोपा होऊ शकतो.
तंबाखू सोडण्यासाठी काय करावे?
तंबाखू सोडण्याचा ठाम निर्णय घेणे ही पहिली पायरी आहे. त्यानंतर कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांना आपला निर्णय सांगावा. त्यांच्या सहकार्यामुळे तंबाखूची इच्छा झाल्यावर स्वतःला आवर घालण्यास मदत होऊ शकते.
डॉक्टरांच्या सल्ल्याने निकोटिन रिप्लेसमेंट थेरपीचा वापरही केला जाऊ शकतो. निकोटिन गम यांसारखे पर्याय काही व्यक्तींना तंबाखू सोडण्याच्या प्रक्रियेत मदत करू शकतात. मात्र, हे पर्याय वैद्यकीय सल्ल्यानेच वापरणे योग्य ठरते.
त्याशिवाय योग, प्राणायाम, नियमित चालणे आणि संतुलित आहार यांमुळेही तंबाखूची तल्लफ हाताळण्यास मदत होऊ शकते. ज्या ठिकाणी किंवा परिस्थितीत तंबाखू घेण्याची इच्छा निर्माण होते, अशा प्रसंगांपासून सुरुवातीच्या काळात दूर राहणेही महत्त्वाचे आहे.
तंबाखू सोडल्यानंतर शरीराला मिळतात अनेक फायदे
तंबाखू सोडल्याचा फायदा शरीराला लवकरच जाणवू लागतो. काही काळानंतर रक्तदाब आणि श्वसनक्रियेत सुधारणा होऊ शकते. पुढील काळात हृदयविकार, पक्षाघात आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. तसेच चव आणि वास घेण्याची क्षमता सुधारू शकते आणि त्वचेतही सकारात्मक बदल जाणवू शकतात.
डॉ. देव यांच्या मते, तंबाखूची सवय सोडणे कठीण असले तरी अशक्य नाही. योग्य माहिती, ठाम निर्णय, कुटुंबीयांचे सहकार्य आणि गरजेनुसार डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतल्यास या व्यसनातून बाहेर पडता येते. त्यामुळे तंबाखू सोडण्याचा विचार करणाऱ्यांनी सुरुवातीच्या काही दिवसांच्या अडचणींना घाबरून न जाता प्रयत्न सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे.
