FSSAI License Number Explained : आपण बाजारातून एखादी वस्तू खरेदी करून, त्यापासून पदार्थ बनवतो. मात्र, ती वस्तू खरेदी करताना पॅकेटवर नेमके काय लिहिले आहे, त्याची निर्मिती कुठे झाली आहे किंवा त्यासंबंधीची इतर माहिती काय आहे, याकडे अनेकदा आपले लक्ष जात नाही. याच पार्श्वभूमीवर एफएसएसएआयने (FSSAI)ने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये खाद्यपदार्थांच्या पॅकेजवर असलेला १४ अंकी FSSAI क्रमांक नेमका काय दर्शवतो, याची माहिती देण्यात आली आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया’ (FSSAI) ही भारतातील अन्नसुरक्षेचे नियमन करणारी प्रमुख संस्था आहे. खाद्य व्यवसायांना एफएसएसएआयकडून १४ अंकी परवाना किंवा नोंदणी क्रमांक दिला जातो. हा क्रमांक पॅकेज्ड फूडच्या लेबलवर नमूद करणे आवश्यक असते. या क्रमांकाच्या माध्यमातून संबंधित खाद्य व्यवसायाची माहिती तपासता येते. अलीकडील FSSAI च्या पोस्टमध्ये या १४ अंकी क्रमांकाचा अर्थ आणि तो कसा समजून घ्यावा, याबाबत माहिती देण्यात आली आहे. तर हा १४ अंकी क्रमांक तुमच्या खरेदीच्या अन्नपदार्थाबाबत काय सांगतो याबद्दल बातमीतून सविस्तर जाणून घेऊया…

पहिला अंक – मंजुरीचा प्रकार

अंक १ असेल, तर त्याचा अर्थ तो क्रमांक परवाना दर्शविणारा आहे आणि अंक २ असेल, तर त्याचा अर्थ नोंदणीसंबंधीचा आहे.

दुसरा व तिसरा अंक – राज्य/केंद्रशासित प्रदेशाचा कोड

या दोन अंकांवरून संबंधित खाद्य व्यवसाय कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात नोंदणीकृत आहे याबद्दलची माहिती मिळते.

चौथा व पाचवा अंक – जारी करण्याचे वर्ष

हे दोन अंक FSSAI क्रमांक कोणत्या वर्षी जारी करण्यात आला याबद्दल सांगतात.

पुढील तीन अंक – प्राधिकरणाचा कोड

हे अंक परवाना किंवा नोंदणी कोणत्या प्राधिकरणाशी संबंधित आहे, हे दर्शवितात.

शेवटचे सहा अंक – युनिक लायसन्सधारक क्रमांक

हे सहा अंक संबंधित खाद्य व्यवसायाला दिलेली विशिष्ट ओळख (Unique ID) दर्शवितात.

याबद्दल दी इंडियन एक्स्प्रेसने बंगळुरू येथील ॲस्टर सीएमआय (Aster CMI) हॉस्पिटलमधील ‘क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स’ विभागाच्या प्रमुख एडविना राज यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितले की, तुमच्या खाद्यपदार्थाच्या पॅकेटवरील १४ अंकी FSSAI क्रमांक हा केवळ एक क्रमांक नाही, तर तो उत्पादनासाठी जबाबदार असलेल्या अन्न व्यवसायाची ओळख पटविण्यास मदत करतो.

पॅकबंद केलेले अन्न खरेदी करण्यापूर्वी त्यातील घटक, पोषणविषयक माहिती, एक्स्पायरी डेट आणि साठवणुकीच्या सूचना यांसोबतच FSSAI क्रमांक तपासण्याची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे. मात्र, FSSAI क्रमांक पाहून उत्पादन आरोग्यदायी किंवा पौष्टिक असल्याचा समज करून घेऊ नका.

पॅकेटवर हा क्रमांक नसेल तर?

पॅक असणाऱ्या पदार्थांवर FSSAI नोंदणी किंवा परवाना असणे आवश्यक आहे, त्यावर जर योग्य क्रमांक दिसत नसेल, तर सावधगिरी बाळगण्याचा इशारा आहे. अयोग्यरीत्या हाताळलेले किंवा दूषित अन्न खाल्ल्याने तुम्ही हानिकारक जीवाणू, विषाणू, विषारी पदार्थ, रसायने किंवा न नमूद केलेले ॲलर्जी निर्माण करणारे घटक यांच्या संपर्कात येऊ शकतात. त्यामुळे अन्नातून विषबाधा, पोटाचे संसर्ग, उलट्या, जुलाब, पोटदुखी, ताप, शरीरातील पाणी कमी होणे यांसारखे त्रास होऊ शकतात. लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले लोक यांच्यामध्ये हा धोका अधिक असतो, असेही त्या नमूद करतात. केवळ FSSAI क्रमांक नसणे म्हणजे अन्न दूषित आहेच, असे सिद्ध होत नाही तरीही त्या क्रमांकाच्या अभावामुळे उत्पादनाबद्दल शंका घेणे आणि योग्य लेबलिंग असलेला पर्याय निवडणे योग्य ठरेल.

दुसरीकडे ‘अन्न सुरक्षा’ आणि ‘सकस आहार’ यांमधील फरक समजून घेतला पाहिजे. कारण- एखाद्या उत्पादनाकडे वैध FSSAI क्रमांक असूनही त्यात साखर, मीठ, अस्वास्थ्यकर चरबी किंवा उष्मांकाचे प्रमाण जास्त असू शकते. त्यामुळे नेहमी ‘न्यूट्रिशन लेबल’ (पोषणविषयक माहितीचे लेबल) पाहा आणि तुमच्या आहाराच्या गरजांनुसार योग्य अन्नपदार्थ निवडा. खराब झालेले किंवा छेडछाड केलेले पॅकेजिंग, अपूर्ण माहिती किंवा संशयास्पदरीत्या बदललेल्या तारखा असलेली उत्पादने खरेदी करणे टाळा.

तुमचा FSSAI परवाना क्रमांक ऑनलाइन कसा तपासावा?

FSSAI क्रमांक पडताळण्याचा एकमेव योग्य मार्ग म्हणजे अधिकृत FoSCoS (Food Safety Compliance System) पोर्टलचा वापर करणे.

१. पॅकेटवर FSSAI चा लोगो शोधा आणि त्या शेजारी छापलेला १४ अंकी क्रमांक लिहून घ्या.

२. ब्राऊजर उघडा आणि foscos.fssai.gov.in या पोर्टलवर जा. (तपासणीसाठी केवळ याच पोर्टलचा वापर केला पाहिजे).

३. होम पेजवर ‘FBO Search’ वर क्लिक करा आणि १४ अंकी परवाना क्रमांक व स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड लिहा.

४. त्यानंतर ‘Submit’ बटण दाबा.

जर क्रमांक खरा असेल, तर पोर्टलवर ‘फूड बिझनेस ऑपरेटर’चे (अन्न व्यावसायिकाचे) नाव, जागेचा पत्ता, परवान्याचा प्रकार (राज्य किंवा केंद्रीय), वैधतेची मुदत आणि त्या परवान्यांतर्गत नोंदणीकृत उत्पादनांची यादी दिसेल आणि जर क्रमांक बनावट किंवा चुकीचा असेल किंवा डेटाबेसमध्ये अस्तित्वात नसेल, तर साईटवर ‘No records found’ (कोणतीही नोंद सापडली नाही) असा संदेश तुम्हाला स्क्रीनवर दिसून येईल.