Electricity Bill Saving Tips : विजेचे बिल हातात आल्यावर बहुतांश लोकांचे लक्ष सर्वांत आधी एसी, पंखे आणि लाईट्सकडे जाते. परंतु, घरात अशा अनेक वस्तू असतात, ज्यांचा वापर आपण रोजच्या कामात मोठ्या प्रमाणात करतो; पण त्यांच्या विजेच्या वापराकडे आपले सहसा लक्ष जात नाही. विशेष म्हणजे कोणत्याही उपकरणाचा विजेचा वापर हा फक्त त्याच्या नावावरून ठरत नाही; तर त्याची क्षमता (कॅपॅसिटी), वापरण्याची वेळ आणि ते किती वेळा चालू केले जाते, या सर्व गोष्टींचा परिणाम बिलावर होतो. जर तुम्हीही दरमहा वाढणाऱ्या विजेच्या बिलामुळे त्रस्त असाल, तर घरातील या उपकरणांवर एकदा नक्की नजर टाका. चला तर मग जाणून घेऊया.

१. एसी (Air Conditioner)

घरात सर्वांत जास्त वीज वापरणाऱ्या उपकरणांमध्ये एअर कंडिशनर अव्वल स्थानावर असू शकतो, विशेषतः जेव्हा तो जास्त वेळ चालवला जातो. रूमचे तापमान, एसीची क्षमता, स्टार रेटिंग आणि तो वापरण्याची पद्धत या गोष्टी विजेच्या वापरावर थेट परिणाम करतात.

२. गिझर (Geyser)

हिवाळ्यात गिझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. पाणी गरम करण्यासाठी त्यातील ‘हीटिंग एलिमेंट’ खूप जास्त वीज खेचते. गरजेपेक्षा जास्त वेळ गिझर चालू ठेवल्यास विजेचा वापर विनाकारण वाढतो.

३. फ्रिज (Refrigerator)

फ्रिज २४ तास चालू असतो. त्यामुळे त्याचा विजेचा वापर सतत सुरू असतो. नवीन तंत्रज्ञानाचे आणि चांगले स्टार रेटिंग असलेले फ्रिज जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत कमी वीज वापरतात. फ्रिजचे दार वारंवार उघडणे आणि दाराचे रबर (सीलिंग) खराब असणे यांमुळेही वीज जास्त खर्च होते.

४. वॉशिंग मशीन (Washing Machine)

वॉशिंग मशीनचा विजेचा वापर हा ती किती वेळ वापरली जाते, पाणी गरम करण्याची सुविधा आणि आपण कोणता ‘मोड’ निवडतो यावर अवलंबून असतो. गरम पाण्यात कपडे धुण्याच्या सायकलमध्ये थंड पाण्याच्या तुलनेत जास्त ऊर्जा खर्च होते.

५. इस्त्री (Electric Iron)

इस्त्री कमी वेळेसाठी वापरली जात असली तरी त्यातील हीटिंग एलिमेंट खूप जास्त वीज वापरते. कपड्यांना इस्त्री करताना ती गरजेपेक्षा जास्त वेळ चालू ठेवल्याने विनाकारण वीज वाया जाते.

६. मायक्रोवेव्ह ओव्हन (Microwave Oven)

मायक्रोवेव्हचा वापर अन्न गरम करण्यासाठी आणि शिजवण्यासाठी केला जातो. त्याचा होणारा विजेचा वापर हा त्याच्या वापराची वेळ आणि ‘पॉवर सेटिंग’ यांवर अवलंबून असतो. रोज जास्त वेळेसाठी याचा वापर केल्यास बिलावर स्पष्ट फरक दिसून येतो.

७. पाण्याचा पंप (Water Motor/Pump)

घरातील पाण्याची टाकी भरण्यासाठी वापरला जाणारा पंपही चांगलीच वीज वापरतो. मोटर गरजेपेक्षा जास्त वेळ चालवणे किंवा टाकी भरल्यानंतरही पंप बंद न करणे यांमुळे मोठ्या प्रमाणात वीज वाया जाते. म्हणूनच विजेचे बिल कमी करण्यासाठी फक्त एसी बंद करणे पुरेसे नाही, तर घरातील कोणते उपकरण किती वेळ चालते, याच्या वापरावर लक्ष ठेवणेही तितकेच गरजेचे आहे.