Causes of Smelly Feet and Tips To Get Rid Of It : आपल्यातील बरेच जण हिल्स तर अनेक जण बूट घालण्याला प्राधान्य देतात. कोणाला फॅशन म्हणून तर कोणाला सोयीस्कर म्हणून प्रत्येक जण आपल्या चपलांची निवड करत असतात. अशातच अनेकदा बूट दिवसभर घातल्यावर, केव्हाही ते पायातून काढले. तर खूप वास म्हणा किंवा नाक बंद करावा लागेल इतकी दुर्गंधी येते. मग अशावेळी काय करावं, ही दुर्गंधी कशी थांबवायची असा प्रश्न आपल्या समोर येऊन उभा राहतो.

बूट घातल्यानंतर सर्वात मोठी समस्या म्हणजे पायांना दुर्गंधी येऊ लागणे. मग ही समस्या खरं तर उत्तम दर्जाचे बूट न घालणे किंवा तळव्यांमधील दोषांमुळे येते. लोक अनेकदा बुटांचा योग्य आकार किंवा क्वालिटीकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे पायांमध्ये घाम साचतो, दुर्गंधी येते (पायांच्या दुर्गंधीला ‘ब्रोमिडोसिस’ म्हणतात). याशिवाय, उत्तम क्वालिटीचे मोजे न घातल्याने देखील या समस्येत आणखीन वाढ होऊ शकते. कारण – सिंथेटिक किंवा पातळ मोजे घाम प्रभावीपणे शोषून घेत नाही.

याव्यतिरिक्त, बदलत्या हवामानातील उष्णता, आर्द्रता हे देखील पायांच्या दुर्गंधीचे एक प्रमुख कारण असू शकतात. उष्ण हवामानामुळे घाम वाढतो, जर पायांना पुरेशी हवा मिळत नसेल किंवा जास्त वेळ बूट घातले जात असतील, तर जिवाणू आणि बुरशी वाढू शकतात, ज्यामुळे पायांना दुर्गंधी येते. जर तुम्हालाही या समस्येचा त्रास होत असेल. तर पायांच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी पुढील काही सोपे उपाय तुम्ही करून पाहू शकता…

मीठ आणि व्हिनेगर

पाय स्वच्छ करण्यासाठी आणि पायांची दुर्गंधी घालवण्यासाठी, अर्धी बादली कोमट पाण्यात २ ते ३ चमचे मीठ, अर्धा कप व्हिनेगर मिसळा. आता तुमचे पाय या मिश्रणात १५ ते २० मिनिटे ठेवून द्या. व्हिनेगरमध्ये आम्लधर्मी गुणधर्म असतात जे जीवाणू नष्ट करण्यास मदत करतात. मीठ-व्हिनेगरच्या पाण्यात पाय भिजवल्याने केवळ दुर्गंधीच नाहीशी होत नाही, तर पायांचा थकवा देखील कमी होतो. यामुळे मृत त्वचा काढून टाकण्यासही मदत होते.

बुटांची दुर्गंधी कशी घालवावी?

ज्या बुटांना दुर्गंधी येत आहे ते कमीतकमी २४ तास उन्हात किंवा हवेत ठेवा. याव्यतिरिक्त, ओलावा आणि दुर्गंधी शोषून घेण्यासाठी बुटांमध्ये बेकिंग सोडा शिंपडा किंवा चहाची पाने असणाऱ्या काही जुन्या पिशव्या ठेवा. चहाची पाने ओलावा शोषून घेतात, ज्यामुळे बूट ताजेतवाने राहतात.

लॅव्हेंडर तेल आणि तुरटी

पायांच्या दुर्गंधीवर हा एक प्रभावी नैसर्गिक उपाय असू शकतो. अंघोळीनंतर, आपल्या पायांच्या तळव्यांना २ ते ३ मिनिटे तुरटी चोळा. हे एक नैसर्गिक जंतुनाशक आहे जे घाम कमी करण्यास मदत करू शकते. पुढे, लॅव्हेंडर किंवा टी ट्री तेलाचे काही थेंब लावून आपल्या पायांची मालिश करा. या तेलांमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात, जे तुमच्या पायांना संसर्गापासून, ओलावा कमी होण्यास तर दुर्गंधी टाळण्यास मदत करतात.

(टीप : या लेखात दिलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. कोणत्याही समस्या किंवा प्रश्नांसाठी तज्ञांचा सल्ला घ्या)