Bathroom Cleaning Tips : पावसाळा उन्हाळ्याच्या तीव्र त्रासापासून दिलासा देत असला, तरी या ऋतूत दमटपणा, आर्द्रता आणि दुर्गंधी यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात. यामुळे बाथरुममधून मोठ्याप्रमाणात दुर्गंधी येऊ लागते. पावसाळ्यात ड्रेनेज लाईन आणि सांडपाण्याच्या पाईपमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे घरातील वातावरण खराब होते. हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे बाथरूममध्ये जिवाणू (Bacteria) आणि बुरशीची (Fungus) वाढ झपाट्याने होते, ज्यामुळे तिथे स्वच्छता राखणे कठीण जाते. जर तुम्हीही पावसाळ्यात बाथरूममधील दुर्गंधीमुळे त्रस्त असाल, तर घरातील काही सोप्या गोष्टींचा वापर करून अवघ्या काही मिनिटांत बाथरूम ताजेतवाने करू शकता आणि जिवाणूंचा प्रादुर्भावही कमी करू शकता.
बाथरूममधील दुर्गंधी कशी दूर करावी?
पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे बाथरूममध्ये येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी एका बादलीत किंवा मोठ्या भांड्यात पाणी घ्या. त्यात बेकिंग सोडा, व्हाईट व्हिनेगर (White Vinegar), लिंबाचा रस आणि थोडे मीठ टाका. हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून त्याचे द्रावण तयार करा. हे तयार द्रावण हळूहळू बाथरूमच्या ड्रेनमध्ये (गटाराच्या पाईपमध्ये) ओता. तसेच उरलेले मिश्रण बाथरूमच्या फरशीवर आणि कोपऱ्यांमध्ये व्यवस्थित पसरवून घ्या. हे द्रावण काही मिनिटे फरशीवर तसेच राहू द्या आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने बाथरूम धुवून घ्या.
या घरगुती उपायाचे फायदे काय आहेत?
या मिश्रणातील बेकिंग सोडा दुर्गंधी शोषून घेण्याचे काम करतो. व्हिनेगर पाईप आणि फरशीवर साचलेली घाण सैल करण्यास मदत करतो. लिंबाचा रस नैसर्गिक क्लिनर म्हणून काम करतो आणि बाथरूमला ताजेपणा देतो, तर मीठ जमिनीवरील जंतू आणि घाण काढून टाकण्यास मदत करते. या चार गोष्टींच्या एकत्र वापरामुळे तुमचे बाथरूम दीर्घकाळ स्वच्छ आणि सुगंधी राहू शकते.
पावसाळ्यात बाथरूमचा वास का वाढतो?
पावसाळ्यात हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. बाथरूममध्ये वारंवार पाण्याचा वापर होत असल्याने तिथे ओलावा टिकून राहतो. या दमट वातावरणामुळे जिवाणू आणि बुरशी वेगाने वाढतात, जे दुर्गंधीचे मुख्य कारण ठरतात.
या समस्येपासून दूर राहण्यासाठी घरगुती
उपायांसोबतच पुढील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे:
- बाथरूमला हवा लागण्यासाठी खिडकी काही वेळ उघडी ठेवा.
- फरशीवर कुठेही पाणी साचू देऊ नका.
- आठवड्यातून किमान एकदा ड्रेन पाईप स्वच्छ करा.
- बाथरूममधील दमट हवा बाहेर टाकण्यासाठी एक्झॉस्ट फॅनचा (Exhaust Fan) नियमित वापर करा.
