How to Grow Plant: घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत सुंदर बाग असावी, सकाळी उठल्यावर डोळ्यांसमोर हिरवीगार रोपं आणि रंगीबेरंगी फुलं दिसावीत, असं अनेकांना वाटतं. यासाठी अनेकजण आवडीने सुंदर रोपं, आकर्षक कुंड्या आणि सजावटीच्या लाईट्स खरेदी करतात.

मात्र, केवळ रोपं लावून बाग सुंदर होत नाही, तर त्यांची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. अनेकदा सुरुवातीला जोमाने वाढणारी रोपं काही दिवसांनी सुकू लागतात. पानांचा तजेला कमी होतो आणि कुंड्यांमधील मातीही खराब होऊ लागते. अशावेळी रोपांच्या निगेकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

रोपांची चांगली वाढ होण्यासाठी वेळोवेळी पाणी देणं, योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळवून देणं, तण काढणं आणि आवश्यक खतांचा वापर करणं महत्त्वाचं असतं. याशिवाय मातीमध्ये बुरशी किंवा हानिकारक बॅक्टेरियांची वाढ होऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागते. विशेषतः तुळस आणि घरच्या घरी भाज्या लावलेल्या कुंड्यांमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर टाळणं फायद्याचं ठरू शकतं. अशावेळी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या हळदीचा वापर करण्याची एक सोपी युक्ती तुम्ही करून पाहू शकता.

मातीसाठी हळदीचा कसा कराल वापर?

घरगुती बागकामाच्या टिप्सनुसार, हळदीचा वापर मातीची काळजी घेण्यासाठी करता येऊ शकतो. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीशी संबंधित समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हळद उपयुक्त ठरू शकते.

यासाठी सर्वप्रथम अर्धा लिटर कोमट पाणी घ्या. त्यामध्ये एक टेबलस्पून हळद मिसळून घ्या. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर कुंडीतील मातीत थोड्या प्रमाणात ओता. मात्र, हळदीचे पाणी थेट रोपांच्या पानांवर किंवा खोडावर टाकण्याऐवजी मातीमध्येच वापरण्याची काळजी घ्या.

महिन्यातून एकदा करा हा उपाय

महिन्यातून किमान एकदा हा उपाय करता येतो. संध्याकाळी साधारण चार वाजण्याच्या सुमारास हळदीचे पाणी मातीत मिसळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत मातीला ओलावा मिळू शकतो.

मात्र, हा घरगुती उपाय सर्व प्रकारच्या रोपांसाठी प्रभावी ठरेलच असं नाही. हळदीच्या पाण्याचा वापर प्रमाणात करा आणि कुंडीतील मातीचा ओलावा लक्षात घेऊनच पाणी द्या. रोपांना योग्य सूर्यप्रकाश, पाणी आणि पोषक घटक मिळणंही तितकंच आवश्यक आहे. नियमित निगा राखल्यास तुमच्या घरातील बाग हिरवीगार आणि टवटवीत ठेवण्यास मदत होऊ शकते.