How To Clean Ear Wax Safely : कानामध्ये साचणारा मळ (इयर वॅक्स) हा शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेचा एक भाग आहे. हा मळ कानाच्या नलिकेचे धूळ, कचरा आणि बाहेरील कणांपासून संरक्षण करण्यास मदत करतो. सहसा कान स्वतःच अतिरिक्त मळ बाहेर ढकलतात. त्यामुळे प्रत्येक वेळी तो वेगळा साफ करण्याची गरज नसते. परंतु, जेव्हा मळ जास्त प्रमाणात साचतो, तेव्हा कान बंद वाटणे, कमी ऐकू येणे किंवा कानात जडपणा जाणवणे अशा समस्या उद्भवू शकतात.

अशा वेळी अनेक जण घरीच स्वतःच्या हाताने कान साफ करू लागतात. हीच चूक अनेकदा कानाला मोठी इजा पोहोचवू शकते. म्हणूनच कानातील मळ काढताना योग्य पद्धत माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हीही घरीच कानातील मळ साफ करण्याचा विचार करीत असाल, तर मळ काढताना काय करावे, काय करू नये आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा हे जाणून घ्या.

कानातील मळ काढण्याची योग्य पद्धत कोणती?

प्रत्येक वेळी मळ काढणे गरजेचे नसते. जर यामुळे कोणताही त्रास होत नसेल, तर तो कानात राहू देणे सामान्यतः योग्य मानले जाते. जर मळ साचल्यामुळे कान बंद वाटत असेल किंवा ऐकायला त्रास होत असेल, तर डॉक्टर किंवा फार्मासिस्टच्या सल्ल्याने मळ मऊ करणार्‍या ‘वॅक्स सॉफ्टनिंग ड्रॉप्स’चा (Ear Drops) वापर केला जाऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये डॉक्टर स्वतः तपासणी करून, सुरक्षित पद्धतीने कानातील मळ बाहेर काढतात.

कान साफ करताना काय करावे?

  • कानाचा बाहेरील भाग मऊ आणि स्वच्छ कपड्याने पुसून साफ करावा.
  • कानात जास्त मळ साचल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • इअर ड्रॉप्स वापरण्यापूर्वी त्यावर दिलेल्या सूचना व्यवस्थित वाचाव्यात.
  • जर आधीपासूनच कानाची काही समस्या असेल, तर स्वतः मळ काढण्याचा प्रयत्न करू नये.
  • कानात वेदना, द्रव येणे किंवा कमी ऐकू येण्याची समस्या असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

कानातील मळ काढताना काय करू नये?

१) कॉटन बड्स (Cotton Buds) कानात टाकू नका :

कॉटन बड्स कानाच्या नळीत घातल्यामुळे मळ अधिक आत ढकलला जातो. त्यामुळे कानाला इजा होण्याचा धोका वाढतो.

२) टोकेरी वस्तूंचा वापर टाळा :

काडीपेटीची काडी, हेअरपिन, किल्ली किंवा कोणत्याही टोकदार वस्तूने कान साफ करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कानाच्या आतील त्वचेला किंवा कानाच्या पडद्याला (Eardrum) मोठी इजा होऊ शकते.

३) कानात पाण्याचा तीव्र मारा करू नका :

योग्य माहितीशिवाय पाण्याच्या तीव्र माऱ्याने मळ काढण्याचा प्रयत्न करू नका. काहींच्या बाबतीत यामुळे कानाचे गंभीर नुकसान होऊ शकते.

४) इअर कॅण्डलिंग (Ear Candling) टाळा:

कानातील मळ काढण्यासाठी इअर कॅण्डलिंगसारख्या पद्धतींचा वापर अजिबात करू नये. त्यामुळे कान भाजण्याचा किंवा कानाला कायमस्वरूपी इजा होण्याचा धोका असतो.

डॉक्टरांशी कधी संपर्क साधाल?

जर कानात तीव्र वेदना होत असतील, अचानक कमी ऐकू येऊ लागले असेल, कानातून रक्त किंवा द्रव पदार्थ येत असेल, चक्कर येत असेल किंवा कान सतत बंद वाटत असेल, तर स्वतः कोणताही उपचार न करता, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.