How to Remove Holi Color: होळीची मजा जरी रंगांनी भरलेली असली, तरी नंतर अंगावर लागलेले पक्के रंग काढणे कधी कधी अवघड जाते. चुकीचे उपाय केल्यास त्वचेला त्रास होऊ शकतो, कोरडी पडू शकते किंवा लाल होऊ शकते. म्हणून रंग काढताना नेहमी सौम्य आणि सुरक्षित उपाय वापरणे गरजेचे आहे. जर तुमच्याही अंगावरील रंग जात नसेल तर हे खालील उपाय करून पाहाच…
१. नारळाच्या तेलाने हलकी मालिश करा
रंग काढण्यापूर्वी अंगावर नारळाचे तेल लावा. तेलामुळे रंग मऊ होतो आणि त्वचेवर बसलेला रंग सैल होतो. १०-१५ मिनिटे हलकी मालिश करून नंतर सौम्य साबणाने आंघोळ करा. तेलामुळे त्वचेला इजा न होता रंग निघण्यास मदत होते.
२. बेसन, दही आणि हळदीचं उटणं
हा पारंपरिक आणि प्रभावी उपाय मानला जातो. २ चमचे बेसन, १ चमचा दही आणि चिमूटभर हळद एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट शरीरावर १०-१२ मिनिटे लावून हलक्या हाताने चोळा. हे उटणं रंग काढण्यास मदत करतं आणि त्वचा मऊही करतं.
३. लिंबू आणि मधाचे मिश्रण
लिंबू नैसर्गिक ब्लीचसारखे काम करते. १ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा मध एकत्र मिसळा. ज्या भागावर डाग आहेत तिथे ५ मिनिटे लावा आणि हलक्या हाताने साफ करा. हे मिश्रण मान, कोपर आणि हातांवर साचलेला रंग काढायला उपयोगी ठरते.
टीप: ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी लिंबू कमी प्रमाणात वापरावे.
४. कोमट पाण्यात मीठ
आंघोळीच्या पाण्यात १ मूठ मीठ टाका आणि त्या पाण्यात थोडावेळ शरीर भिजू द्या. मीठामुळे त्वचेच्या वरच्या थरातील रंग सैल होतो आणि कोरडी त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.
५. मलई आणि गव्हाच्या पिठाचा स्क्रब
१ चमचा ताजी मलई आणि १ चमचा गव्हाचे पीठ एकत्र करून लावा. हलक्या हाताने गोल गोल चोळा. यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि रंग हळूहळू निघायला मदत होते.
६. बेबी ऑइल आणि बेबी साबण
खूप संवेदनशील त्वचा असलेल्या मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी हा उपाय चांगला आहे. सुरुवातीला बेबी ऑइल लावून हलकी मालिश करा. नंतर बेबी साबणाने आंघोळ करा. हे दोन्ही सौम्य असतात आणि त्वचेला इजा करत नाहीत.
या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
- खूप जोरात चोळू नका, नाहीतर त्वचा सोलू शकते.
- केमिकल असलेले स्क्रब किंवा ब्लीच लगेच वापरू नका.
- आंघोळीनंतर मॉइश्चरायझर नक्की लावा.
- जर जळजळ किंवा लाल पुरळ दिसली तर त्वचेला विश्रांती द्या आणि थंड जेल लावा.
होळीचे पक्के रंग काढण्यासाठी सौम्य, नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय वापरणेच उत्तम आहे. तेल, उटणे, दूध, मध आणि हलके स्क्रब असे घरगुती उपाय त्वचेला इजा न करता रंग साफ करतात.
