How To Sharpen Mixer Grinder Blades At Home Naturally : मिक्सरचा वापर चटण्या, स्मूदी आणि बॅटर दळण्यासाठी स्वयंपाक घरात केला जातो. त्यामुळे जास्त वापर झाला की, साहजिकच मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडची धार कमी होऊन जाते. कडक पदार्थ त्यात आपल्याला हवे तसे बारीक करता येत नाहीत. रोजच्या वापरामुळे, मिक्सरच्या जारमधील ब्लेड अनेकदा बोथट होतात. परिणामी अनेकदा पदार्थ नीट दळले जात नाहीत किंवा जाडसर दळतात. यामुळे ब्लेडवर अधिक ताण येतो. त्यामुळे नवीन जार विकत घेण्यापूर्वी किंवा मेकॅनिकला दुरुस्तीसाठी पैसे देण्यापूर्वी, तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. यामुळे तुमच्या मिक्सर ग्राइंडरचे ब्लेड धारदार होऊ शकते.

अंड्याचे साल

अनेक लोक मिक्सरच्या जारमध्ये वाळलेली अंड्याचे साल दळण्याची शिफारस करतात. यामुळे ब्लेडवर चिकटलेले कण निघून जाऊ शकतात. पण, अनेक तज्ज्ञ याचा नियमित वापर करू नका असेही सांगतात. कारण – लहान अंड्याचे साल जारमध्ये अडकू शकतात. अंड्याच्या सालाएवजी बर्फ आणि मीठ वापरणे अधिक सुरक्षित मानले जाते.

बर्फाचे तुकडे

ब्लेड धारदार करण्यासाठी, मिक्सरच्या जारमध्ये ५ ते ६ बर्फाचे तुकडे टाका आणि २० ते ३० सेकंद ढवळा. यामुळे ब्लेड आणि जारच्या कडेला चिकटलेले अन्नाचे कण निघून जाण्यास मदत होऊ शकते. नंतर जार पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे ब्लेड स्वच्छ राहतात आणि दळण्याची कार्यक्षमता सुधारते.

सैंधव मीठ

मिक्सरच्या जारमध्ये एक मोठा चमचा सैंधव मीठ किंवा जाड मीठ टाका आणि १५ ते २० सेकंद ढवळा. मिठाचे कण सौम्य स्क्रबप्रमाणे काम करतात आणि ब्लेडवरील घाण काढण्यास मदत करतात. लक्षात ठेवा की ,या पद्धतीमुळे ब्लेडला धार येणार नाही. पण, स्वच्छ होऊ शकतात आणि अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात.

बेकिंग सोडा

एक छोटा चमचा बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट ब्लेडवर आणि जारच्या आत लावा आणि १० मिनिटे तशीच ठेवा. नंतर मऊ ब्रशने घासून स्वच्छ करा. यामुळे तेल, मसाल्यांचे कण आणि वास निघून जाण्यास मदत होते.

ॲल्युमिनियम फॉइल

ॲल्युमिनियम फॉइलचे लहान तुकडे करा. ते जारमध्ये ठेवा आणि काही सेकंद ढवळा. यामुळे ब्लेडवर साचलेली कोणतीही घाण निघून जाण्यास मदत होते असे म्हटले जाते. फॉइलचे मोठे तुकडे टाकू नका आणि वापरानंतर जार पूर्णपणे धुतला जाईल याची काळजी घ्या.