How To Stop Constant Burping: विचार करा, तुम्ही छान एखाद्या डेटवर गेला आहात. तुमची स्पेशल व्यक्ती तुमच्यासमोर आहे. अशावेळी नुसतं पाणी प्यायल्यावर सुद्धा तुम्हाला एका मागोमाग एक सतत ढेकर येत आहेत. खरंतर कितीही नैसर्गिक गोष्ट असली तरी अनेकदा चार चौघात मोठ्याने आवाज काढत ढेकर देताना संकोच वाटू शकतो. ढेकर, ज्याला बेल्चिंग किंवा ऍसिड रिफ्लक्स असेही म्हणतात, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये पोटात किंवा अन्ननलिकेमध्ये जमा झालेला वायू तोंडातून बाहेर पडतो. जर तुम्हाला सतत अपचनाचा त्रास होत असेल तर ढेकर देताना दुर्गंधी सुद्धा येऊ शकते. पोषणतज्ञ डॉ मनोज कुटेरी यांनी हेल्थशॉट्सला सांगितल्याप्रमाणे वारंवार ढेकर देणे हे घश्याला वेदनादायी सुद्धा ठरू शकते. तुम्हालाही हा त्रास टाळायचा असल्यास खाली दिलेले सात उपाय नक्की एकदा वाचा. वारंवार ढेकर येत असल्यास करा 'हे' सात उपाय १) सोडा आणि स्पार्कलिंग वॉटर सारख्या कार्बोनेटेड शीतपेयेमध्ये कार्बन डायऑक्साइड वायू असतो, ज्यामुळे ढेकर येऊ शकतात. ढेकर कमी करण्यासाठी, नॉन-कार्बोनेटेड शीतपेये निवडा किंवा कार्बोनेटेड पेये हळूहळू आणि मध्यम प्रमाणात प्या, ज्यामुळे गॅस पोटात जाण्यापूर्वी बाहेर पडू शकेल. २) तुम्ही पटापट जेवत असाल तर अतिरिक्त हवा पोटात जाऊ शकते. डॉ कुटेरी सांगतात की, यासाठी अन्न हळूहळू व चावून खाण्याचा सल्ला दिल जातो, जेणेकरून अन्न लाळेत मिसळून अन्ननलिकेतून सहज पुढे ढकलले जाते. यामुळे ढेकर कमी होण्यासह पचन सुद्धा सुरळीत होण्यास मदत होऊ शकते. ३) कँडीज किंवा च्युइंगम चघळताना हवा गिळू शकता, ज्यामुळे वारंवार पोटात गॅस तयार होऊ शकतो. शक्यतो अशा अतिशर्करायुक्त पदार्थांचे सेवन टाळा. ४) डॉक्टरांच्या मते, काही खाद्यपदार्थ पचनसंस्थेमध्ये वायू निर्माण करतात, ज्यामुळे ढेकरांचे प्रमाण वाढते. बीन्स, मसूर, कोबी, कांदे आणि काही मसाले यांचा यात समावेश असतो. या पदार्थांचे सेवन कमी करा शिवाय बीन्स आणि मसूर शिजवण्यापूर्वी ते भिजवून ठेवल्याने त्यांचे वात तयार करणारे गुणधर्म कमी होण्यास मदत होते. ५) जेवताना पाठ सरळ ठेवा. यामुळे पोटावरील दाब कमी होऊन पोट फुगण्याची शक्यता कमी होण्यास मदत होते. ६) तणाव आणि नकारात्मक भावना पचनात व्यत्यय आणू शकतात. व्यायाम, ध्यान, योग आणि तुमच्या आवडी जपत तुम्ही मन शांत ठेवू शकता जेणेकरून पचन सुद्धा सुरळीत होण्यास मदत होऊ शकते. ७) पोट १०० टक्के भरेपर्यंत जेवल्यास पाचक रसात अन्न मिसळण्यासाठी पोटाला पुरेशी जागाच उरत नाही. परिणामी अपचन व ढेकर येण्याचा त्रास होऊ शकतो. डॉ कुटेरी सांगतात, जास्त खाणे टाळण्यासाठी काही अंतराने थोडं थोडं खायला हवे. हे ही वाचा<< पिरीएड्समध्ये सेक्स केल्यास गर्भधारणा होऊ शकते का? डॉक्टर सांगतात, ओव्ह्युलेशन दिवस कसा ओळखाल? ढेकर कमी करण्यासाठी हे उपाय तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात पण जर तुमचा त्रास तरीही थांबत नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. अन्यथा वारंवार येणारे ढेकर हे अपचनच नव्हे तर पोटाच्या, आतड्यांच्या विकाराचे लक्षण ठरू शकते.