How To Quit Alcohol Addiction At Home : अनेकदा ऑफिस पार्ट्यांमध्ये किंवा मित्रांबरोबर लोक दारू पितात; पण काही लोकांना रोज दारू पिण्याचे व्यसन असते. त्यांना एक दिवसही दारू प्यायल्याशिवाय जमत नाही. असे म्हटले जाते की, दारूचे व्यसन एकदा लागले की, ते सहजासहजी सुटत नाही. या व्यसनामुळे केवळ त्यांचे कुटुंबीयच नाही, तर ते स्वतःही कंटाळतात. पण, त्यांची इच्छा असूनही ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. जर तुम्हाला दारूचे व्यसन सोडायचे असेल; पण तुम्ही तसे करू शकत नसाल, तर यावर होलिस्टिक हेल्थ अँड हीलिंग हॉस्पिटल्समधील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भवनीत कौर यांनी काही टिप्स दिल्या आहेत, ज्या तुम्हाला दारूचे व्यसन सोडवण्यासाठी मदत करू शकतात.

मद्यपानामुळे वाढू शकतो मधुमेहाचा धोका

दारू पिणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे, हे माहीत असूनही लोक दारूचे सेवन करतच राहतात. दररोज दारूचे सेवन केल्याचा यकृतावर थेट दुष्परिणाम होतो. त्याशिवाय मधुमेहासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.

१) एकदाच काय तो निर्णय घ्या

दारू सोडण्यासाठी स्वत:हून एक ठाम निर्णय घ्या. लोक अनेकदा दारूचे व्यसन सोडताना एक चूक करतात आणि ती म्हणजे मी आज दारू पिणार; पण उद्यापासून बंद… तुम्हाला आणि मला हे चांगलंच माहीत आहे की, उद्या कधीच येत नाही. जर तुम्हीही ‘मी उद्या सोडेन’, असं म्हणत राहिलात, तर तुम्ही तुमच्या दारूच्या व्यसनातून मुक्त होऊ शकणार नाही. दारूपासून दूर राहण्याचा एक पक्का निर्णय घ्या… तुमच्या रोजच्या आयुष्यात ते वचन पाळा… जे तुम्ही उद्या करू शकता, ते आज करा आणि जे तुम्ही आज करू शकता, ते आता करा… तरच तुम्ही ही सवय सोडू शकाल.

Award Banner

२) कारण शोधा

तुम्हाला दारू सोडायची आहे, हे का ठरवले याचे कारण आधी ठरवणे आवश्यक आहे. दारू सोडण्यामागे आरोग्य, कुटुंब, प्रेम किंवा मुले ही कारणे असू शकतात.

३) निर्णय कसा घ्यावा?

दारू सोडण्याचा नुसता विचार करणे हीच एक मोठी गोष्ट आहे. एकदा का तुम्हाला कारण सापडले की, सोडण्यासाठी एक तारीख निश्चित करा. मग, ही तारीख तुमच्या कुटुंबाला, ऑफिसला आणि मित्रांना सांगा. या काळात तुमच्या घरातून, गाडीतून आणि तुम्ही ज्या ठिकाणी ती ठेवता, तेथून दारूच्या बाटल्या काढून टाका. तसेच, तुम्ही ज्यांच्याबरोबर जाऊन दारू पिता, त्या मित्रांनाही सांगा की, तुम्ही दारू सोडली आहे. त्यामुळे ते तुम्हाला वारंवार कॉल करणार नाहीत आणि या निर्णयास तुम्हाला पाठिंबा देऊ शकतील.

४) स्वतःला कामात किंवा कुटुंबात व्यग्र ठेवा

दारू सोडण्याचे पहिले काही दिवस खूप चिंताजनक असू शकतात. दारू पिण्याचा विचार मनात वारंवार येतो. ‘आज पिऊया किंवा घेऊया…’ असे विचार मनात येतात. ३० मिलीने काहीही होणार नाही. तुम्हाला या विचारांवर मात करावी लागेल. हे विचार दूर ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःला व्यग्र ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही संगीत ऐकू शकता आणि तुमच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवू शकता. कालांतराने तुमचे दारूचे व्यसन आपोआप सुटेल.

५) कुटुंबाकडून मदत घ्या

दारूच्या व्यसनावर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराची आणि कुटुंबाची मदत घेऊ शकता. दारू सोडणे सोपे नसते. त्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या मदतीने, स्वतःवर अधिक प्रेम करण्यावर लक्ष केंद्रित करा, जेणेकरून ही सवय कालांतराने पूर्णपणे बंद होऊ शकेल.

६) योग आणि ध्यान करा

दारूच्या व्यसनावर मात करण्यासाठी तुम्ही दररोज योग आणि ध्यान करू शकता. ध्यान आणि योगामुळे तुम्हाला मनावर लक्षणीयरीत्या नियंत्रण मिळवता येते. दररोजचे ध्यान आणि योग या क्रिया तुम्हाला या घातक व्यसनावर मात करण्यास मदत करू शकतात.