Knee Pain Remedies : वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर उठताना किंवा बसताना तुमच्या गुडघ्यांतून कटकट आवाज येत असेल किंवा पायऱ्या चढणे- उतरणे कठीण जात असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे एक धोकादायक लक्षण आहे. त्यातून तुमच्या सांध्यांना योग्य काळजी आणि पोषणाची गरज असल्याचे सूचित होते. त्यावर आम्ही काही सोपे आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहोत, जे तुमच्या गुडघ्यांच्या वेदना कमी करून, तुमचे गुडघे मजबूत करू शकतात. तेव्हा उपाय काय आहेत ते जाणून घेऊ..
एका वृत्तसंस्थेशी बोलताना आहारतज्ज्ञ व लाइफस्टाईल कन्सल्टंट डॉ. रमिता कौर सांगतात की, गुडघ्यांचे दुखणे, ताठरपणा किंवा कटकट कमी करण्यासाठी दिवसाची सुरुवात योग्य प्रकारे करणे महत्त्वाचे आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ताजे आले, हळद व चिमूटभर काळी मिरी मिसळलेले एक ग्लास कोमट पाणी प्या. हे नैसर्गिक पेय शरीरातील दाह कमी करते. त्यानंतर चार-पाच भिजवलेले बदाम खा, जे आरोग्यदायी चरबी आणि पोषण देतात. हे मिश्रण केवळ सांधेदुखीला आतून आरामच देत नाही, तर रोगप्रतिकार शक्तीही मजबूत करते आणि दिवसभर ऊर्जादेखील देते.
काळ्या तिळाचे फायदे
आयुर्वेदात काळे तीळ हाडे आणि सांध्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि इतर आवश्यक खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. दररोज एक चमचा काळ्या तिळाचे सेवन केल्याने सांध्यांमधील वंगण सुधारते, ज्यामुळे गुडघ्यांमधून येणारा आवाज कमी होऊ शकतो.
तुम्ही ते थेट खाऊ शकता किंवा गुळात मिसळून लाडू बनवूनही शकता. त्याच्या नियमित सेवनाने हाडे मजबूत होतात आणि सांध्यांची लवचिकता वाढते. मात्र, उन्हाळ्यात त्याच्या प्रमाणाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. कारण- त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.
एरंडेल तेल
एरंडेल तेलाने मालिश करणे हा गुडघेदुखी, सूज आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी एक जुना आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. एरंडेल तेलात चिमूटभर जायफळाची पूड मिसळा आणि ते हलकेसे गरम करा. या तेलाने आपल्या गुडघ्यांना १०-१५ मिनिटे हळुवारपणे मालिश करा. त्यानंतर तो भाग एका कापडाने झाका आणि रात्रभर तो तसेच राहू द्या. या उपचारामुळे सांध्यांना खोलवर आराम मिळतो, रक्ताभिसरण सुधारते आणि सूज व वेदना कमी होतात.
रिव्हर्स वॉकिंग
दररोज सुरक्षित ठिकाणी ५-१० मिनिटे उलटे चाला. त्यामुळे तुमच्या गुडघ्यांचे स्नायू मजबूत होतात , तुमचा तोल सुधारतो आणि सांध्यांवरील ताण कमी होतो.
कोलेजनयुक्त पदार्थांचा करा समावेश
तुमच्या गुडघ्यांतील कटकट आवाज कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कोलेजनयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे. त्यामध्ये अंडी, मासे, बदाम, भोपळ्याच्या बिया, जवस आणि सूर्यफुलाच्या बिया यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. हे पदार्थ कार्टिलेज आणि सांध्यांना पोषण देतात.
या लहान बदलांमुळे मोठा फरक पडू शकतो; परंतु कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण- प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असते.
