4 Ways to Fight Sugar Cravings : तुम्ही काही वेळा अनुभवलं असेल की, कधी कधी अचानक सातत्याने गोड खाण्याची तीव्र इच्छा होते, एकदा एखादा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तो पुन्हा पुन्हा खावासा वाटतो आणि मग आपण ते पॅकेट संपेपर्यंत खातच राहतो. त्यात जर एखाद्याला मधुमेह असेल, तर परिस्थिती आणखी बिघडते. त्यामुळे गोड खाण्याची अशी इच्छा त्रासदायकच ठरत नाही, तर त्यामुळे इतर अनेक आजारांचाही धोका वाढतो. पण, अचानक इतके गोड खाण्याची इच्छा का होते त्यामागचे कारण जाणून घेऊ…

पोषक तत्त्वांची कमतरता

तुम्हाला वारंवार गोड खाण्याची इच्छा होण्यामागे आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता हे कारण असू शकते. पुरेशा प्रमाणात प्रथिने, चरबी, तंतुमयता, मॅग्नेशियम, क्रोमियम, झिंक व लोह यांसारखी खनिजे किंवा बी जीवनसत्त्वे यांच्या कमतरतेमुळे गोड खाण्याची इच्छा होऊ शकते. त्यावर उपाय म्हणून तुमच्या आहारात प्रथिने आणि तंतुमययुक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच, फळे, सुका मेवा, डार्क चॉकलेट खा आणि भरपूर पाणी प्या.

झोपेचा अभाव आणि थकवा

झोपेची कमतरता आणि थकवा हेदेखील या समस्येचे एक कारण असू शकते. जेव्हा शरीराला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा भूक वाढवणारे घ्रेलिन वाढते आणि भूक शमवणारे लेप्टिन हार्मोन कमी होते. त्याशिवाय थकवा आल्यावर मेंदूला त्वरित ऊर्जेची गरज असते आणि साखर हा ऊर्जेचा सर्वांत सोपा स्रोत आहे.

Award Banner

आतड्यांचे आरोग्य

आपल्या आतड्यांमध्ये लाखो जीवाणू असतात, जे पचनक्रिया सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा आतड्यात हानिकारक जीवाणूंची संख्या चांगल्या जीवाणूंपेक्षा जास्त होते, तेव्हा त्यांना साखरेची गरज भासते, ज्यामुळे साखरेची लालसा वाढते. या प्रक्रियेला ‘डिस्बायोसिस’ म्हणतात.

गोड खाण्याची इच्छा कशी कमी करावी?

१) ही समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या. कधी कधी तहान लागल्यामुळेही असे होऊ शकते.
२) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमच्या आहारात प्रथिने आणि तंतुमयतेचे प्रमाण वाढवा.
३) जेव्हा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल, तेव्हा रिफाईंड साखरेऐवजी फळे किंवा खजूर खा.
४) आपली जीवनशैली सुधारणेदेखील महत्त्वाचे आहे म्हणून दररोज सात-आठ तास झोप घ्या आणि रोज व्यायाम करा, जेणेकरून शरीर सक्रिय राहील.