तारुण्यात पदार्पण करताना जवळ-जवळ सर्वच मुलामुलींना तारुण्यपीटीका येतात. किशोरावस्थेतून यौवनात पाऊल ठेवताना शरीरात होणाऱ्या असंख्य बदलांपैकी हा एक असतो. एका दृष्टीने ‘तुम्ही तरुण झालात’ असा इशारा देण्यासाठीच जणू या पुटकुळ्या, मुरुमे, पिंपल्स येतात. या वयामध्ये, ‘मी कसा दिसतो किंवा दिसते?’ याबाबत युवावर्ग जरा जास्तच हळवा असतो. त्यामुळे या आगंतुक पिंपल्स म्हणजे एक मोठी आपत्ती वाटायला लागते.

सतत आरशासमोर उभ राहून, चेहेऱ्याचे बारकाईने निरीक्षण करायचा एक छंदच होऊन बसतो. इतरांशी तुलना होते आणि इतरांपेक्षा आपल्यातला हा दोष जरा जास्तच खुपू लागतो. न्यूनगंड निर्माण होतो, आत्मविश्वास कमी होतो, मित्रमैत्रिणींमध्ये मिसळणे, घराबाहेर पडणे टाळले जाऊ लागते.

पिंपल्सची पीडा टाळण्यासाठी-

१. चेहरा दिवसातून चार ते पाच वेळा साध्या पाण्याने, सौम्य साबण लावून धुवा.

२. मुरुमांचे फोड फोडू नका, त्यात पिवळी लस तयार झाली तरी ती दाबून किंवा पिळून काढू नका. तसेच त्यांच्यावर खाजवू नका. त्यामुळे ती लस आणखी खोल जाते आणि त्वचेवर कायमचे खड्डे किंवा व्रण पडतात.

३. उन्हात फिरणे टाळा. कडक उन्हामुळे त्वचा काळी तर पडतेच, पण मुरुमे जास्त वाढू शकतात.

४. रोजच्या अंघोळीसाठी कोमट पाणी वापरा. जास्त गरम पाणी नको.

५. सैल आणि रोजच्या रोज स्वच्छ धुतलेले कपडे वापरा. घट्ट किंवा मळक्या कपड्यांनी पाठीवरती मुरुमे येऊ शकतात.

६. रोजची ७ ते ८ तास झोप घ्या. जागरणे पूर्णपणे टाळा.

७. चालणे, धावणे, जॉगिंग, सायकलिंग, पोहोणे, जिममधील ट्रेडमिल अशाप्रकारचे एरोबिक व्यायाम करणे गरजेचे असते ज्यामुळे शरीरातील सर्व क्रिया सुरळीत होतात.

८. चेहरा तेलकट होतो, चमकतो अशी सौंदर्यप्रसाधने वापरू नका. अॅण्टिसेप्टिक प्रकारातले साबण, फेसवॉश, स्क्रब वापरू नका.

९. खाण्यामध्ये अतितेलकट, तळलेले पदार्थ, फास्टफूड, जंकफूड टाळा. अतिगोड पदार्थ, कोल्डड्रिंक्स, आईस्क्रीम्स यांचा आस्वाद कमीत कमी वेळा घ्या.

१०. स्वयंपाकामध्ये घरी आयोडाइझ्ड मीठ वापरू नका. त्यामुळे मुरुमे वाढतात.

११. योग्य उपचार करा- मुरमांचा त्रास अंगावर काढू नका. किंवा जाहिरातीतली मलमे. लोशन्स, क्रीम्स, साबण अकारण वापरू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. आवश्यक वाटल्यास तुम्हाला त्वचारोगतज्ञांचा किंवा काही युवतींना स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घ्यायला लागेल.

१२. नव्या लेझर उपचाराने मुरुमांमुळे निर्माण झालेले व्रण घालवता येतात.

मुरुमे ही तारुण्यात सुरुवातीला हार्मोन्स स्थिर होईपर्यंतच येतात. नंतर ती येणे आपोआप बंद होते. त्यामुळे न घाबरता, न्यूनगंड न बाळगता तारुण्यातल्या आनंदी गोष्टींना सामोरे जा.

डॉ. अविनाश भोंडवे