आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे केस. ते जर कुरळे असतील तर त्यांच्या वेगवेगळ्या स्टाइल्स करता येतात; पण कुरळ्या केसांची नीट निगा राखणंही तितकंच गरजेचं असतं.काही वर्षांपूर्वी यांना काही तरी वेगळेच आहेत म्हणून हिणवलं जायचं. त्यांची कटकटच नको म्हणून सर्रास त्यांच्यावर इस्त्री फिरवली जायची आणि मग इस्त्रीचे चटके सोसत सोसत ते अगदी सरळ होऊन जायचे. हे म्हणजे तेच आपले मिस्टर कुरळे. म्हणजेच कुरळे केस. काही वर्षे आधी सरळ केस आदर्श मानले जात होते; परंतु सध्या कुरळे केस म्हणजे स्टाइल स्टेटमेंट मानलं जातं. त्याबद्दलचा हा लेख.
कंगना राणावत बॉलीवूडमध्ये तिच्या कामामुळे जशी प्रसिद्ध झाली तसेच तिच्या कुरळ्या केसांमुळेही ती लोकप्रिय झाली. आपल्या मराठी कप साँगमुळे प्रसिद्ध झालेली मिथिला पालकरसुद्धा तिच्या कुरळ्या केसांमुळेही बऱ्याच जणांना आवडते. कुरळ्या केसांची सध्या चलती असली तरीही अनेक मुलींना आपले कुरळे केस कसे मेंटेन करायचे याबद्दल खूप शंका असतात आणि त्यामुळे काही जणींना ते आवडेनासेच होतात. पावसाळ्यात तर कुरळे केस हा अनेकींच्या कटकटीचा विषय ठरतो; पण वेगवेगळ्या सोप्या हेअर स्टाइल्स करून तुम्ही पावसाळ्यातही आपल्या कुरळ्या केसांचा स्वॅग (तोरा) दाखवू शकता. कुरळ्या केसांची तुम्ही जशी स्टाइल कराल तसे ते मस्त स्टाइल होतात.




सध्या हाफ बन, मेसी बन, केसांच्या वेण्या या हेअर स्टाइल्स खूप इन ट्रेण्ड आहेत आणि पावसाळ्यात तर अगदी कम्फर्टेबल आणि पटकन करता येतील अशा या हेअर स्टाइल्स आहेत. या सगळ्याबरोबर हल्ली तुम्ही केस मोकळे सोडूनही तुमचे कर्ल्स फ्लॉन्ट करू शकता. कोणत्याही आऊटफिटवर ते खूपच छान दिसतात.
कुरळ्या केसांच्या कुरळेपणाचेही वेगवेगळे प्रकार असतात. वेवी हेअर, मोठे कर्ल, मध्यम कर्ल व लहान कर्ल आणि त्यानुसार त्यांची निगा राखली गेली पाहिजे. कुरळ्या केसांसाठी सल्फेट-फ्री शाम्पू वापरावा आणि मग त्याला कंडिशिनग करावं. कंडिशनर वापरताना स्काल्पवर ते लावलं जाणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या वेळी तुम्ही हेअर वॉश घेणार आहात तेव्हाच बाथरूममध्ये केसांचा गुंता काढून घ्या किंवा एक दिवस आधी व्यवस्थित तेल लावून गुंता काढा. त्यासाठी मोठय़ा दाताचा कंगवा वापरा.
केस वाळवताना ड्रायर किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर न करता त्यांना आपोआप वाळू द्यावं. आपला जुना कॉटन किंवा होजिअरी टीशर्ट केस पुसण्यासाठी खूपच उत्तम. केस पुसताना खालून वर टॉवेलमध्ये घेऊन कोरडे करून घ्यावेत. त्यामुळे केसांचा कुरळेपणा जाणार नाही आणि वाळल्यावर ते पिंजारलेले दिसणार नाहीत. मुळातच कुरळे केस सरळ केसांच्या तुलनेत रूक्ष असतात. त्यामुळे खूप स्ट्रेटिनग किंवा आयिनग करून केस स्टाइल करू नयेत त्यांना उष्णतेपासून जास्तीत जास्त लांब ठेवावं. कुरळे केस रंगीत बिट्स तसंच वेगवेगळ्या क्लिप्स, बो किंवा फुलं वापरून मस्त स्टाइल करता येतात. कुरळ्या केसांना कलर स्ट्रिक्स खूपच छान दिसतात. प्रसंगानुसार तुम्ही तुम्हाला हव्या त्या पद्धतीने ते स्टाइल करू शकता.
आपले कुरळे केस योग्य पद्धतीने हाताळले तर त्यांची कटकट न वाटता त्यांचं सौंदर्य तुम्हाला नक्कीच जाणवेल आणि तुम्ही पुन्हा एकदा मिस्टर कुरळेंच्या प्रेमात पडाल.
कुरळ्या केसांच्या काही हेयर स्टाइल्स
मेसी बन :
ही हेअरस्टाइल दिसायला अतिशय छान आणि करायला खूप सोप्पी असते. सगळे केस एकत्रित करून रबरबॅण्डने बन बांधून घ्या. यू पिन्स लावून बन सिक्युअर करून घ्या. मेसी बन घालणार आहात, त्यामुळे बन व्यवस्थित नसेल तरीही चालेल. ही पावसाळ्यासाठी अगदी आयडियल हेअरस्टाइल आहे. कानामागून काही केस बाहेर काढा त्यामुळे खूप छान लुक मिळेल.
हाफ बन :
डोक्याच्या क्राऊन एरियातील केस व मागच्या बाजूचे केस यांची विभागणी करावी. क्राऊन एरियातील केस एकत्रित बांधून घ्यावे. (बन तयार करून घ्यावा) व उरलेले केस मोकळे सोडून द्यावे. अशा पद्धतीने हाफ बन तयार होईल. एखादा हेअर बॅण्ड किंवा क्लिप्स वापरून तुम्हाला छान लुक मिळू शकेल.
केसांच्या वेण्या :
फिश टेल, सागर वेणी, मिल्कमेड ब्रेड असे वेण्यांचे प्रकार तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मिल्कमेड ब्रेड करताना सुरुवातीला मध्ये भांग पडून घ्यावा व त्यानंतर सुरुवातीचे काही केस घेऊन त्याच्या दोन्ही बाजूला सागर वेण्या घालून त्या मागे पिन अप करून घ्याव्या. उरलेल्या केसांचा बन घालू शकता किंवा मोकळे सोडू शकता.
कुरळ्या केसांसाठी या हेअर स्टाइल्स करताना शक्यतो कंगवा वापरू नये. त्यामुळे केस फ्रिझी होऊ शकतात व हेअरस्टाइलचा लुक जाऊ शकतो.
प्राची परांजपे
सौजन्य – लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com