Tulsi Plant Care And Tips : तुळशीचे रोप केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे नाही तर ते आरोग्य आणि पर्यावरणासाठी देखील अत्यंत फायदेशीर मानले जाते. मांगल्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या तुळशीचे रोप आपल्या दारात, खिडकीत सुद्धा छान वाढावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकजण यासाठी कुंडी, माती, खत, पाणी सगळी सोय करतात, अधिकाधिक ऊन लागेल अशा ठिकाणी या तुळशीच्या कुंडीला जागा देतात. तुळस ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि वातावरण शुद्ध होते. पण, हिवाळा सुरु होताच तुळशीचे झाड सुकू लागते. थंड वारा, दव यांच्यामुळे त्यांची पाने पिवळी पडतात आणि झाड कमकुवत होते.

त्यामुळे पुढील काही सोप्या टिप्स फॉलो करून, तुम्ही हिवाळ्यातही तुळशीची पाने हिरवीगार राहू शकतात…

हिवाळ्यात तुळशीचे रोप कुठे ठेवावे?

हिवाळ्यात तुळशीच्या झाडाचे थंड वारा आणि दव यांच्यापासून संरक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून, तुळशीची कुंडी उघड्या बाल्कनी किंवा अंगणात ठेवू नका. अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला हलका सूर्यप्रकाश मिळेल आणि थंड हवेचा थेट संपर्क येणार नाही.

सगळ्यात मोठी चूक म्हणजे कुंडी दिवसभर उन्हात ठेवणे, याने तुळशीची पाने सुकून जातात. खरं सांगायचं तर तुळशीच्या रोपाला सकाळचं ताजं कोवळं ऊन पुरेसं ठरतं. सकाळचा सूर्यप्रकाश तुळशीसाठी सर्वात फायदेशीर असतो. अगदी दुपारी १२- १ वाजता कडक उन्हात तुळशीची कुंडी कधीच ठेवू नये.

जास्त पाणी घालू नका

आता हिवाळ्यात तुळशीला ऊन कमी लागतं म्हटल्यावर भरपूर पाणी देणे हे आपल्याला जरी फायदेशीर वाटत असलं तरी त्याचा परिणाम उलटाच होत असतो. हिवाळ्यात रोपांना थोडसंच पाणी द्या. जास्त पाणी दिल्यास झाडाच्या मुळांना नुकसान होऊ शकते. माती पूर्णपणे कोरडी असतानाच रोपाला पाणी द्या. या हंगामात तुम्ही आठवड्यातून दोनदा पाणी देऊ शकता. तसेच, वेळोवेळी मातीत कंपोस्ट किंवा गांडूळखत घाला. यामुळे रोपाला पुरेसे पोषण सुद्धा मिळते.

वेळोवेळी फवारणी करा

हिवाळ्यात पाने पिवळी पडू लागली तर त्यावर कडुलिंबाचे पाणी किंवा सेलेरीची हलकी फवारणी करा. यामुळे कीटक झाडावर हल्ला करत नाहीत. त्यामुळे नियमितपणे वाळलेली पाने काढून टाका. यामुळे नवीन पाने दिसण्यास प्रोत्साहन मिळेल.