scorecardresearch

घर सजवण्यासाठी बोल्ड रंगांचा कसा कराल वापर? ‘या’ आहेत टिप्स

बोल्ड आणि कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन्स ही लगेच आपल्या नजरेत भरतात आणि अत्यंत आकर्षक असतात.

How to use bold colors to decorate the house Here are some tips gst 97
तुमच्या घरातील रंगांच्या या खेळात फर्निचर आणि शो पीस देखील मोठी भूमिका बजावू शकतात. (Photo : Pixabay)

‘कलर ब्लॉकिंग’ ही विशेषतः फॅशनच्या जगातली एक स्पेशल आणि आकर्षक संकल्पना आहे. थोड्यक्यात सांगायचं झालं तर कलर ब्लॉकिंग म्हणजे अनेकपेक्षा जास्त कॉन्ट्रास्ट असलेले परंतु अत्यंत आकर्षक आणि गडद रंग कल्पकतेने योग्य प्रमाणात एकत्रितरित्या वापरून बनवलेलं डिझाईन. आता ही संकल्पना मुळातच सुरु झाली फॅशन रॅम्प-व्हेवरून. परंतु, होम डेकोरेशनच्या दुनियेत देखील तुम्ही या कलर ब्लॉकिंगच्या या ट्रेंडचा अगदी सुंदररित्या वापर करू शकता. तुम्हाला तुमचं घर सजवण्यासाठी या ट्रेंडचा प्रयोग करायचा असेल तर आज आम्ही यासाठीच काही टिप्स सांगणार आहोत. क्विर्क स्टुडिओच्या मुख्य डिझायनर आणि सह-संस्थापक असलेल्या दिशा भावसार आणि शिवानी अजमेरा यांनी सुचवल्याप्रमाणे ‘कलर ब्लॉकिंग’चा होम डेकोरेशनसाठी कसा वापर केला जाऊ शकतो? आणि यावेळी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात? पाहूया.

कलर-व्हील

‘कलर ब्लॉकिंग’साठी जेव्हा तुम्ही रंग निवडाल तेव्हा कलर व्हीलकडे विशेष लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या खोलीत कोणता मूड किंवा कोणती ऊर्जा कायम हवी आहे यानुसार रंग निवडा. पिवळा आणि कोरल यांसारखे रंग (वॉर्म कलर्स) तुमच्या खोलीला एक उत्साही, सकारात्मक आणि स्वागतार्ह भावना देतात. खरंतर एखाद्या मनोरंजक जागेसाठी हे रंग अत्यंत उत्तम ठरतात. शिवाय या रंगांचा वापर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात देखील करू शकता. तर दुसरीकडे निळा आणि हिरवा हे दोन डोळ्यांना एक प्रकारचा थंडावा देणारे रंग एखाद्या शांतता अपेक्षित असलेल्या ठिकाणांसाठी उठून दिसतात. लक्षात घ्या कि, अशा पद्धतीची बोल्ड आणि कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन लगेच कुणाचंही लक्ष वेधून घेतात आणि आकर्षित करतात.

ऑड नंबर रुल

विविध रंग हे जसे एखाद्याला जागेला आकर्षक बनवू शकतात तसेच अतिरिक्त प्रमाणात केलेला अनेक रंग हे या सगळ्याचा नाश देखील करू शकतो. त्यामुळे अत्यंत आकर्षक परंतु तितक्याच बॅलन्स्ड डिझाईन्ससाठी ऑड नंबर कलर रुल पद्धतीचा वापर करणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे हे रंग निवडताना तुमची खोलीच्या जागेचा विचार करायला हवा. कारण, एका अगदीच लहानशा खोलीत खूप वेगवेगळ्या रंगांचा वापर योग्य दिसत नाही. त्यामुळे, एका जागेसाठी किंवा खोलीसाठी केवळ ३ वेगळ्या रंगांची निवड करणं योग्य ठरेल. या रंगांचा वापर ६०-३०-१० या नियमानुसार किंवा प्रमाणात करावा.

६०-३०-१० नियम

जेव्हा डिझाइन्सचा विचार होतो तेव्हा ६०-३०-१० हा रंगांच्या वापराच्या प्रमाणासंदर्भातला नियम असतो. आपण निवडलेल्या ३ रंगांपैकी एक रंग ६० टक्के प्रमाणात भिंत आणि खोलीतील सजावटीसाठी वापरता येतो. तर या रंगाला कॉन्ट्रास्ट असलेला दुसरा रंग हा ३० टक्के प्रमाणात खोली उठावदार करण्यासाठी वापरता येतो. त्याचसोबत दोन्ही रंगांना साजेशा असा तिसरा रंग १० टक्के प्रमाणात वापरायचा असतो. १० टक्के प्रमाणात वापरण्यासाठीचा रंग ‘अक्सेंट कलर्स’ या प्रकारात मोडतो. इतर २ रंगांपेक्षा तुलनेत तो अगदी कमी प्रमाणात असला तरीही तो खोलीला एक युनिक लुक देतो. हे ६०-३०-१० कलर कॉम्बिनेशन तुमच्या खोलीला एक बॅलन्स्ड आणि तुम्हाला अपेक्षित असं आकर्षक रूप निश्चित देईल.

न्यूट्रल कलर पॅलेट

होम डेकोरेशनसाठी कलर ब्लॉकिंग ट्रेंड वापरताना अगदी गडद रंगांसोबतच न्यूट्रल कलर पॅलेटमधल्या बीज आणि ग्रे शेड्समध्ये येणाऱ्या रंगांचा वापर अत्यंत मोठी भूमिका बजवतो. ६०-३०-१० च्या रंगांच्या प्रमाणात हे न्यूट्रल रंग प्रभावी ठरून तुमच्या खोलीचा ६० टक्के म्हणजेच सर्वात मोठा भाग बनू शकतात. तुमच्या खोलीची आकर्षकता वाढवण्यासोबचत एक प्रकारचा बॅलन्स ठेवण्याचं खरं काम हेच रंग करतात. न्यूट्रल पॅलेटमध्ये असणाऱ्या या रंगांच्या ६० टक्के वापरासह आपण अन्य २ रंगामध्ये विविध प्रयोग करू शकतो.

खोलीतील प्रकाशयोजना

खोलीची प्रकाशयोजना सर्वात महत्त्वाची आहे. आपल्या खोलीचा रंग निवडण्यापूर्वी तिथे कोणत्या प्रकारची प्रकाशयोजना असेल हे लक्षात घ्या. खोलीत येणाऱ्या नैसर्गिक प्रकाशामुळे खोलीचा खरा रंग दिसतो, प्रखर दिवे खोलीला एक वॉर्म टोन देतात तर फ्लोरोसेंट दिवे हे निळे टोन्स हायलाइट करतात.

फर्निचर आणि शो पीस

तुमच्या घरातील रंगांच्या या खेळात फर्निचर आणि शो पीस देखील मोठी भूमिका बजावू शकतात. खोलीच्या भिंतींसाठी अँक्सेंट रंगांचा वापर करण्याऐवजी एखादं उत्तम दणकट फर्निचर आणि सुंदर शोपीस यांचा समावेश अधिक योग्य ठरेल. ह्यात अगदी एखाद्या निळ्या शेडमधील सोफा, भौमितिक आकृतीतला गालिचा किंवा लहानसं सजावटीचं सुंदर रोपटं या काही पर्यायांचा निश्चितच वापर होऊ शकतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-08-2021 at 12:04 IST