How To Use Pregnancy Test Kit : जर तुमची मासिक पाळी चुकली असेल आणि तुम्हाला गर्भधारणेची शंका असेल, तर अशा वेळी तुम्ही घरीच प्रेग्नन्सी टेस्ट किटचा वापर करून तपासणी करू शकता. हे किट मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळते आणि काही मिनिटांतच तुम्हाला रिझल्ट समजतो; पण अनेक महिला पहिल्यांदा वापर करताना योग्य पद्धत न माहीत असल्याने चुका करतात, ज्यामुळे चुकीचे किंवा गोंधळात टाकणारे परिणाम मिळू शकतात.

योग्य वेळी चाचणी करणे, सूचनांचे तंतोतंत पालन करणे आणि रिझल्टचा अचूक अर्थ लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे लक्षात ठेवा की, घरी केलेली टेस्ट तुम्हाला केवळ प्राथमिक माहिती देते. जर निकाल सकारात्मक (Positive) किंवा अस्पष्ट असेल, तर पुढील तपासणीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या बातमीत आपण घरी प्रेग्नन्सी टेस्ट किट वापरण्याची योग्य पद्धत, टेस्ट करण्याची अचूक वेळ आणि रिझल्ट कसा समजून घ्यायचा, याबाबत सविस्तर जाणून घेऊया…

प्रेग्नन्सी टेस्ट किटचा वापर कसा करावा?

१. टेस्ट करण्याची योग्य वेळ:

सर्वांत अचूक परिणामांसाठी, मासिक पाळी चुकल्यानंतरच चाचणी करा. सकाळच्या पहिल्या लघवीमध्ये एचसीजी (hCG) हार्मोनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे याच वेळी टेस्ट करणे सर्वांत उत्तम ठरते.

२. किटवरील सूचना काळजीपूर्वक वाचा:

प्रत्येक कंपनीच्या प्रेग्नेंसी टेस्ट किटच्या वापराच्या सूचना थोड्या वेगळ्या असू शकतात. त्यामुळे टेस्ट सुरू करण्यापूर्वी पॅकेटवरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.

३. लघवीचे सँपल (Sample):

किटसोबत दिलेल्या ड्रॉपरचा वापर करून, टेस्ट विंडोमध्ये (किटवर असलेल्या गोल छोट्या छिद्रात) लघवीचे दोन ते तीन थेंब टाका.

४. काही मिनिटे थांबा:

लघवीचे थेंब टाकल्यानंतर साधारण तीन ते पाच मिनिटे थांबा. खूप लवकर किंवा खूप उशिरा रिझल्ट तपासल्यास निकाल चुकीचा दिसू शकतो.

५. रिझल्टचा योग्य अर्थ समजून घ्या:

  • दोन रेषा (Two Lines): रिझल्ट पॉझिटिव्ह आहे म्हणजेच गर्भधारणा झाली असण्याची शक्यता आहे.
  • एक रेषा (Single Line): रिझल्ट निगेटिव्ह आहे.
  • एकही रेषा न दिसणे: टेस्ट चुकीची झाली आहे, नवीन किट वापरून पुन्हा टेस्ट करा.

६. रिझल्ट पॉझिटिव्ह आल्यास काय करावे?

जर टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर लगेच डॉक्टरांची अपॉईंटमेंट घ्या. डॉक्टर रक्त तपासणी (Blood Test) किंवा अल्ट्रासाऊंडद्वारे गर्भधारणेची पुष्टी करतील. जर चाचणी निगेटिव्ह आली असेल, तरीही काही दिवसांनंतर पाळी आली नाही, तर ४८ ते ७२ तासांनंतर पुन्हा टेस्ट करा किंवा स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.