How To Wash Hair without Using Shampoo : दिवसभर शाळा, कॉलेज किंवा अगदी कामानिमित्त बाहेर राहिल्यामुळे स्त्रियांचे केस चिकट, तेलकट होतात. पण, चिकट, तेलकट झालेले केस दररोज धुणे शक्य नसते. त्यामुळे आपण आठवड्यातून अगदी १-२ वेळा केस धुतो. याचउलट पुरुषांना मात्र दररोज केस धुण्याची संधी मिळते. काही जण केस धुण्यासाठी शॅम्पू, तर काही जण साबणसुद्धा वापरतात. पण, शॅम्पूमध्ये अनेक रसायने असतात, ज्यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात. त्यामुळे केस गळणे ही समस्यासुद्धा वाढू शकते. इतकेच नाही, तर शॅम्पू खूप महागही असतात, ज्यामुळे दररोज शॅम्पू लावून केस धुतल्यास तुमच्या खिशाला कात्री बसेल एवढे तर नक्की…
पण, तुम्ही शॅम्पू न वापरता, अगदी शून्य रुपयात घरी उपलब्ध असलेल्या पदार्थांपासूनसुद्धा तुमचे केस धुऊ शकता… (How To Wash Hair Without Shampoo)
बेसन (Gram flour)
जर तुम्हाला तुमचे केस शॅम्पूने धुवायचे नसतील, तर बेसन हा एक घरगुती आणि उत्तम उपाय ठरू शकतो. बेसनामुळे केस पूर्णपणे स्वच्छ होतात. बेसन केवळ त्वचेसाठीच नाही, तर केसांसाठीही फायदेशीर आहे. तुम्ही दररोज सकाळी बेसनाने तुमचे केस धुऊ शकता. त्यासाठी बेसनाचे द्रावण केसांना आणि टाळूला व्यवस्थित लावून घ्या. अर्ध्या तासानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवा. त्यामुळे केसांवर साचलेली घाण, तेल निघून जाईल आणि केस मऊ, चमकदार दिसू लागतील.
कोरफड (Aloe vera )
केस धुण्यासाठी कोरफड हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. त्यासाठी अॅलोव्हेरा जेल तुमच्या केसांना आणि टाळूला लावा. एक तासानंतर केस पाण्याने स्वच्छ करा. कोरफडीमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे केसांना ओलावा देतात. कोरफड केसांना मऊ, गुळगुळीत व चमकदार बनवते. तुम्ही आठवड्यातून दोन-तीन वेळा कोरफडीने तुमचे केस धुऊ शकता. त्यामुळे तुमच्या केसात कोंडाही होणार नाही.
नारळाचे दूध (Coconut milk)
जर तुमचे केस कोरडे असतील, तर तुम्ही नारळाच्या दुधाने केस धुऊ शकता. नारळाचे दूध केसांना मॉइश्चराइझ करते, पोषण देते व मजबूतसुद्धा करते. तसेच नारळाचे दूध घरीसुद्धा बनवता येते. एका भांड्यात नारळाचे दूध घ्या आणि ते केसांना लावा. एक तासानंतर पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. तुम्ही नारळाचे दूध लावून आठवड्यातून दोनदा केस धुऊ शकता.
दही (Curd)
तुम्ही केस धुण्यासाठी दह्याचाही वापर करू शकता. त्यासाठी एक वाटी दही केसांना आणि टाळूला लावा. एक तास ते तसेच राहू द्या. नंतर पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. दह्यामुळे केसांना ओलावा मिळतो आणि केसांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. त्याचबरोबर टाळू निरोगी राहण्यास आणि कोंड्यापासूनही मुक्तता मिळते. तुम्ही आठवड्यातून दोन-तीन वेळा दह्याद्वारे तुमचे केस धुऊ शकता.
आवळा पावडर (Amla powder)
आवळा पावडर केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळा पावडरमुळे केसांशी संबंधित समस्या दूर राहतात. जर तुम्ही रोज आवळा पावडर केसांना लावलीत, तर तुमचे केस मजबूत होतील. आवळा पावडर केसांना निरोगी बनवते आणि केसांची गळतीसुद्धा थांबवते. त्यासाठी एका भांड्यात दोन-तीन चमचे आवळा पावडर घ्या. त्यात पाणी किंवा गुलाबपाणी घाला. आता ही पेस्ट केसांना लावा आणि अर्ध्या तासाने धुऊन घ्या. त्यामुळे केस मऊ होतील आणि केसांवर साचलेली घाण निघून जाईल.