इलेक्ट्रिक उपकरणं बनविणारी आघाडीच्या Huawei कंपनीवर अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रंप प्रशासनाने बंदी घातल्यामुळे कंपनीच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बंदीमुळे कंपनीला आपल्या या आठवड्यात होणाऱ्या एका लॅपटॉपच्या लाँचिंगचा कार्यक्रम देखील रद्द करावा लागल्याचं वृत्त आहे.

शांघाई येथे होऊ घातलेल्या ‘सीईएस एशिया 2019 ट्रेड शो’मध्ये Huawei कंपनी आपला नवीन विंडोज लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत होती. मात्र, अमेरिकेने घातलेल्या बंदीमुळे कंपनीला लाँचिंगचा कार्यक्रम रद्द करणं भाग पडलं आहे. सद्यस्थिती निराशाजनक असून आम्ही संगणक पुरवठा करु शकत नाहीत असं कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं.

अमेरिकेने घातलेल्या बंदीमुळे Huawei कंपनी आपल्या कोणत्याही उपकरणासाठी अमेरिकेत बनलेले पार्ट्स किंवा सर्व्हिसेसचा वापर करु शकत नाही किंवा त्या उपकरणाचा पुरवठा करु शकत नाही. म्हणजेच, मायक्रोसॉफ्टची विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम देखील Huawei वापरु शकत नाही किंवा इंटेलच्या प्रोसेसरचाही ते वापर करु शकत नाहीत. प्रोसेसर आणि ऑपरेटिंग सिस्टिमशिवाय मोठ्या प्रमाणात लॅपटॉपची निर्मिती करताच येऊ शकत नाही. अमेरिकेने कंपनीला काळ्या यादीत टाकलं आहे. परिणामी परवानगीशिवाय Huawei कंपनी अमेरिकेच्या कंपन्यांशी व्यापार करु शकत नाही.