भारतासारख्या प्रगतशील देशामध्ये मानसिक तणावाची समस्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. देशात तणावाखाली असणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय आहे. भारतामधील काम करणाऱ्या महिलांबरोबरच गृहिणींनाही मानसिक तणावाची समस्या जाणवताना दिसत आहे. लग्नाआधी नोकरी आणि लग्नासंदर्भातील विचारांमुळे येणार ताण तर लग्नानंतर नोकरी संभाळतच घरातील जबाबदाऱ्या, मुले यांमुळे महिलांना ताणवा येतो. नुकत्याच भारतीय महिलांमध्ये अढळून येणाऱ्या मानसिक तणावासंदर्भात करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये घरगुती कारणांमुळे महिलांना सर्वाधिक त्रास होतो आणि घरातील तणावाचे मुख्य कारण असतो पती.

‘टुडे टॉड कॉम’ या वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणामध्ये घरामध्ये पतीमुळे येणारा मानसिक ताण हा मुलांच्या ताणाइतका किंवा अधिक असल्याचे मत भारतीय महिलांनी नोंदवले आहे. लग्न झालेल्या महिलांना मानसिक ताण अधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पतीमुळे येणारा तणाव हा त्याच्या वाईट वागणुकीमुळे किंवा इतर कारणांमुळे नसून पती घरातील जबाबदारी नाकारत असल्याने येतो असं मत हजारो महिलांनी नोंदवले आहे.

या सर्वेक्षणामध्ये ७ हजार महिलांनी आपले मत नोंदवले. या महिलांना घरातील समस्यांसंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. घरातील कोणत्या गोष्टींचा सर्वाधिक ताण येतो आणि यासाठी घरातील कोणती व्यक्ती जबाबदार असते असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ४६ टक्के महिलांनी घरातील लहान मुले आणि इतर नातेवाईंऐवजी पतीच्या वर्तवणुकीमुळे अधिक मानसिक ताण येतो असं मत नोंदवले आहे. यापैकी बहुतांश महिलांनी आपला पती लहान मुलांप्रमाणे हट्ट करतात असंही या सर्वेक्षणात सांगितले आहे.

‘अनेकदा पुरुष घरातील कामांसंदर्भातील जबाबदाऱ्या झटकताना दिसतात. केवळ पैसे कमवून घरी आणून देणे हेच आपले काम असल्याचे अनेक पुरुषांना वाटत असल्याने ते घरातील इतर जबाबदाऱ्यांकडे दूर्लक्ष करतात’, असं मत सर्वेक्षणातील महिलांनी नोंदवले आहे. पतीने मुलांची देखभाल करणे, वृद्धांची काळजी घेणे आणि घरातील गरजेच्या वस्तू विकत आणण्यासारखी कामे करावी अशी अपेक्षा महिलांना असते मात्र पती या जबाबदाऱ्या नाकारतात अशी नाराजी सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केली आहे. वयाच्या ३०-३५ वर्षीही पती लहान मुलांसारखे वागतात असा आरोपही महिलांनी केला आहे. पती अनेकदा लहान मुलांप्रमाणे वागतात, हट्ट करतात यामुळे खूप त्रास होतो असं या महिलांनी सांगितले.

अनेकदा पुरुष घरातील जबाबदाऱ्या टाळतात त्यामुळे घरातील सर्व कामाची जाबाबदारी महिलांच्या खांद्यावर पडतात. त्यामुळेच गृहिणी असो किंवा नोकरदार महिलांचा घरातील बराचसा वेळ घरातील कामांमध्ये जातो. यामुळेच महिलांना घरातील कामाचाही ताण येतो. मुलांना संभाळण्यासंदर्भातही पतीची सोबत मिळत नाही असं सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या ४ ते ५ टक्के महिलांनी म्हटले आहे. घरातील कामे आणि मुलांची काळजी घेण्याच्या कमामुळे अनेकदा स्वत:कडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याचे महिलांनी सांगितले. इतके करुनही अनेकदा कुटुंबातील इतर सदस्यांकडून महिलांच्या कमाचे साधे कौतुकही केले जात नाही याचा अधिक त्रास होतो असं या महिला म्हणाल्या.

घरामधील लहान सहान कामाध्ये ढवळाढवळ करणाऱ्या सासूमुळेही मानसिक ताण येतो असं या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले. ८५ टक्के महिलांनी सासूमुळे मानसिक तणाव येत असल्याचे म्हटले आहे. सासूचे टोमणे आणि बोलण्यामुळे महिलांना एकटेपणा वाटू लागतो त्यातूनच त्यांना मानसिक ताण येतो असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.