बालकांमधील अतिचंचलता

सहसा अतिचंचलतेच्या लक्षणांची सुरुवात वयाच्या १० ते १२ वर्षांच्या आतच होते.

मनोमनी : डॉ.अमोल देशमुख
अतिचंचलता म्हणजेच ADHD (ATTENSION DEFICIT HYPERACTIVITY DISORDER) ही बालपणातील सर्वात सामान्यपणे आढळणारा मेंदूची वाढ होतानाचा (न्यूरो डेव्हलपमेंटल) वर्तनाशी निगडित विकार आहे. अतिचंचलता असलेल्या मुलांना लक्ष केंद्रित करण्यास, आचरणांवर नियंत्रण ठेवण्यास अडचण येत असते. याचे निदान सामान्यत: बालपणात केले जाते, पण ही समस्या प्रौढांमध्येही दिसून येते.

मुलांमध्ये लक्ष केंद्रित न करता येणे (INATTENSION) ,अतिक्रियाशीलता (HYPERACTIVITY) आणि आवेग (IMPULSIVITY) सहसा दिसून येतो जी बहुतांश प्रमाणात सामान्य बाब आहे. पण जेव्हा ही लक्षणे तीव्र असतात, सातत्याने राहतात आणि मुलाच्या सर्वागीण आयुष्यावर म्हणजेच घरात, कुटुंबाबाहेर तसेच शालेय जीवनात अडथळा आणतात तेव्हा त्यास अतिचंचलता म्हणतात. साधारणत: ३ ते ५ टक्के मुलांमध्ये अतिचंचलता आढळून येते.

अतिसक्रियतेच्या लक्षणांमध्ये सतत हालचाल सुरू असणे, एका ठिकाणी न बसणे, शारीरिक अस्वस्थता, स्थिरता नसणे, जास्त बोलणे इत्यादी आवेगाच्या लक्षणांमध्ये वारंवार कामात व्यत्यय आणणे, धोक्याची कल्पना नसणे, अपघात, शारीरिक इजा होणे, त्यामुळे रांगेत आपला क्रमांक येईपर्यंत न थांबणे. प्रश्न संपण्याआधी उत्तर देण्याचा प्रयत्न करणे, तसेच स्वत:ला एकाग्र न करता येणे, लक्ष केंद्रित न होणे, लवकर विसरून जाणे या लक्षणांचा संच अतिचंचलतामध्ये दिसून येतो. या लक्षणामुळे मुलांच्या सर्वागीण विकासावर परिणाम होऊ शकतो. त्यांना घरी, शाळेत नवीन गोष्टी शिकण्यास अडचणी येतात.

अतिचंचलतेच्या कारणांचा अभ्यास करताना एक असे कारण सांगता येणार नाही पण संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की आनुवंशिकता, गरोदरपणात अल्कोहोलचा वापर, मेंदूला इजा होणे तसेच जन्माच्या वेळी वजन कमी असणे इत्यादी कारणे असू शकतात.

लहान मुले नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. लहान मुलांची एकाग्रता ही वयाप्रमाणे वाढत जाते. या मुलांचा बुद्धय़ांक म्हणजेच बुद्धिमता चांगली असते हे आढळून आले आहे. सातत्याने अशा प्रकारची लक्षणे सुरू राहिल्यास घरी आणि शाळेत नेहमी शिक्षकांकडून शिक्षा केली जाते. पालकही या लक्षणांचा सामना करून त्रस्त होतात. अतिचलतेच्या समस्येची लक्षणे असल्यामुळे ते शाळेत इतर मुलांच्या मागे पडतात आणि परिणामी काही मुलांमध्ये भावनिक समस्या म्हणजेच उदासीनता, चिडचिडेपणा दिसून येतो.

सहसा अतिचंचलतेच्या लक्षणांची सुरुवात वयाच्या १० ते १२ वर्षांच्या आतच होते. ही लक्षणे आढळल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. मानसोपचारतज्ज्ञांच्या आणि समुपदेशकांच्या मदतीचे वर्तनाचा अभ्यास करून निदान केल्यास आपण मुलांच्या सर्वागीण विकासात हातभार लावू शकतो.

अऊऌऊ निदान झाल्यानंतर औषधोपचाराने बऱ्याच अंशी नियंत्रण आणता येते, औषधे मेंदूमधील रासायनिक असमतोल संतुलित करून वर्तणुकीवर ताबा मिळवण्यास मदत करतात. वर्तनोपचार (बिहेवीअर थेरपी) वर्तनातील बदल घडवून आणण्यास मदत करते. बिहेवीअर थेरपीमध्ये कुटुंबीयांशी आणि शिक्षकांशी संवाद साधून एकत्रीतरीत्या मुलाच्या वर्तन बदलावर शास्त्रीय मार्गाने उपचार केले जातात. अंतिचंचलतेची वर्तन समस्या लवकर ओळखल्यास आणि त्यावर तातडीने उपचार केल्यास आपण मुलांना योग्य ती मदत  करू शकतो. कारण ही मुले इतर मुलांप्रमाणे सर्वच स्तरावर प्रगती करू शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hyperactivity in children ssh