High Blood Pressure in Young Age: रक्तदाबाचा त्रास म्हणजे फक्त वाढत्या वयातील लोकांची समस्या, असा लोकांचा समज असतो; मात्र बदललेली जीवनशैली, वाढता ताणतणाव, असंतुलित आहार व अपुरी झोप यांमुळे ही समस्या आता तरुणांनाही भेडसावत आहे. अवघ्या विशी-बाविशीतच काही तरुणांचा रक्तदाब धोकादायक पातळीवर जात असल्याचे चित्र समोर येत आहे. अलीकडेच एका २३ वर्षांच्या तरुणाने ऑनलाइन विचारलेला प्रश्न अनेकांच्या चिंतेचा विषय ठरला आहे. “२३व्या वर्षी जर रक्तदाब १७०/११० इतका असेल, तर तो किती धोकादायक मानला जातो?” या प्रश्नाचे उत्तर ऐकून कुणालाही धक्का बसू शकतो.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, निरोगी व्यक्तीचा सामान्य रक्तदाब साधारणतः १२०/८० इतका असतो. त्यापेक्षा रक्तदाब कमी झाल्यास त्याला कमी रक्तदाब,असे म्हटले जाते आणि त्यापेक्षा रक्तदाब जास्त असल्यास त्याला उच्च रक्तदाब ही स्थिती मानली जाते. मात्र, १७०/११० इतका रक्तदाब हा अत्यंत गंभीर आणि धोकादायक श्रेणीत मोडतो.

डॉक्टर काय सांगतात?

ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिन विभागाचे संचालक डॉ. अमित सराफ सांगतात, “२३व्या वर्षी १७०/११० इतका रक्तदाब हा केवळ ताणामुळे आलेली तात्पुरती वाढ नाही. इतक्या कमी वयात असा रक्तदाब आढळल्यास हृदय, मूत्रपिंड, मेंदू आणि रक्तवाहिन्यांवर प्रचंड ताण येतो.”

Award Banner

त्यांच्या मते, इतक्या तरुण वयात उच्च रक्तदाब आढळल्यास तत्काळ सखोल तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते. कारण- अनेकदा त्यामागे फक्त जीवनशैली नव्हे, तर एखादा आतील आजार कारणीभूत असू शकतो.

एवढ्या कमी वयात रक्तदाब इतका वाढण्याची कारणे काय?

तज्ज्ञांच्या मते, ३० वर्षांखालील व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब हा बहुतांश वेळा दुय्यम उच्च रक्तदाब असतो. म्हणजेच एखाद्या आजारामुळे रक्तदाब वाढलेला असतो. संभाव्य कारणे अशी-

  • थायरॉईड ग्रंथीचे असंतुलन
  • मूत्रपिंडाशी संबंधित आजार
  • हार्मोन्सचे असंतुलन (कॉर्टिसोल किंवा एल्डोस्टेरॉन वाढणे)
  • झोपेत श्वासोच्छ्वास थांबण्याची समस्या (स्लीप अॅप्निया)
  • काही औषधे, सप्लिमेंट्स किंवा जिमशी संबंधित पदार्थ
  • अतिताण, झोपेची कमतरता आणि जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन

ही लक्षणे दिसताच तत्काळ डॉक्टरांकडे धाव घ्या.

जर १७०/११० इतक्या रक्तदाबासोबत खालील लक्षणे जाणवत असतील, तर विलंब न करता वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे-

  • तीव्र किंवा सतत डोकेदुखी
  • छातीत जडपणा किंवा वेदना
  • हृदयाचे ठोके वेगाने वाढणे
  • श्वास घेण्यास त्रास
  • डोळ्यांसमोर धूसर दिसणे
  • अचानक अशक्तपणा किंवा चक्कर येणे
  • कोणत्या तपासण्या कराव्या लागतात?

तरुण वयात गंभीर उच्च रक्तदाब आढळल्यास डॉक्टर पुढील तपासण्या सुचवू शकतात-

  • मूत्रपिंड कार्य चाचणी
  • थायरॉईड तपासणी
  • ईसीजी व इकोकार्डिओग्राम
  • लघवी तपासणी
  • मूत्रपिंडाचे अल्ट्रासाऊंड
  • गरज असल्यास हार्मोन्सच्या चाचण्या
  • चोवीस तासांचा रक्तदाब मोजण्याचा विशेष तपास

फक्त जीवनशैलीतील बदल पुरेसे आहेत का?

डॉ. सराफ यांच्या मते, १७०/११० इतक्या उच्च रक्तदाबावर केवळ आहार आणि सवयी बदलून नियंत्रण मिळवणे शक्य नसते. अवयवांचे नुकसान टाळण्यासाठी तत्काळ औषधोपचार सुरू करणे आवश्यक असते. त्यासोबतच-

  • मिठाचे सेवन कमी करणे
  • एनर्जी ड्रिंक्स आणि जादा कॅफिन टाळणे
  • दररोज किमान ३०-४५ मिनिटे व्यायाम
  • वजन नियंत्रणात ठेवणे
  • पुरेशी व दर्जेदार झोप
  • योग, प्राणायाम व ताणतणाव कमी करणाऱ्या सवयी

हे उपाय दीर्घकालीन दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतात.

थोडक्यात सांगायचे झाले, तर तरुण वयात वाढलेला रक्तदाब हा इशारा आहे, तो दुर्लक्षित केल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. वेळेत तपासणी आणि योग्य उपचार हाच सुरक्षित मार्ग आहे.