Why You Feel Like Falling While Sleeping: झोप लागता लागता अचानक शरीराला जोराचा झटका बसतो, पाय हलतो आणि आपण एखाद्या उंच ठिकाणाहून खाली पडत असल्यासारखे वाटते… एवढेच नाही, तर त्या भासामुळे अनेकदा अचानक झोपही मोडते. हा अनुभव अनेकांना कधी ना कधी आलेला असतो; पण झोपेत असताना असे का होते? त्यामागे काही गंभीर कारण असते का?

वैद्यकीय भाषेत या घटनेला हायपनिक जर्क किंवा हिप्नॅगॉजिक जर्क, असे म्हटले जाते. त्याला स्लीप स्टार्ट किंवा नाईट स्टार्ट, असेही म्हणतात. झोप आणि जागेपणाच्या अवस्थेत बदल होत असताना स्नायूंमध्ये अचानक आणि अनैच्छिक हालचाल होणे, अशी त्याची साधी व्याख्या करता येते. अनेकदा या झटक्यासोबत खाली पडल्यासारखे, शरीराला कुणीतरी ढकलल्यासारखे किंवा पाय घसरल्यासारखे जाणवू शकते.

खाली पडल्यासारखं का वाटतं?

याचे नेमके कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, याबाबत काही शास्त्रीय शक्यता मांडल्या गेल्या आहेत.

झोपण्याच्या सुरुवातीला आपल्या शरीरातील स्नायू हळूहळू सैल होऊ लागतात. त्याच वेळी मेंदूही जागेपणातून झोपेच्या अवस्थेकडे जात असतो. या संक्रमणाच्या काळात मेंदू आणि शरीरातील संदेशवहनात अचानक बदल होऊ शकतो. काही वेळा मेंदूकडून स्नायूंना अचानक संदेश जातो आणि त्यातून शरीराला झटका बसू शकतो.

हे अगदी सोप्या उदाहरणातून समजून घ्या. तुम्ही एखाद्या ठिकाणी उभे असताना अचानक तुमचा तोल जातो, तर शरीर स्वतःला सावरण्यासाठी क्षणात स्नायू ताणते. झोप लागण्याच्या वेळीही शरीर सैल होत असताना मेंदू त्या बदलाचा वेगळ्या पद्धतीने अर्थ लावू शकतो. त्यामुळे काही क्षणांसाठी हालचाल किंवा पडण्यासारखी जाणीव निर्माण होऊन स्नायूंमध्ये झटका येऊ शकतो. मात्र, ही केवळ एक संभाव्य अवस्था आहे; परंतु हायपनिक जर्कचे निश्चित कारण म्हणून ती सिद्ध झालेली नाही.

मेंदूतील संदेशवहनाचाही संबंध?

हायपनिक जर्कचा संबंध मज्जासंस्थेतील अचानक होणाऱ्या हालचालींशी असू शकतो. Sleep Foundation नुसार, झोप लागत असताना मेंदूच्या रेटिक्युलर ब्रेनस्टेममधील नसांमध्ये संदेशवहनाचा एखादा क्षणिक ‘मिसफायर’ होण्याची शक्यता मांडली जाते. त्यामुळे स्नायूंमध्ये अचानक हालचाल होऊन शरीराला झटका जाणवू शकतो.

त्यामुळेच काही जणांना फक्त हात किंवा पाय हलल्यासारखे वाटते; तर काही जणांना संपूर्ण शरीराला झटका बसल्यासारखे जाणवते. काही वेळा या अनुभवासोबत पडण्याचा भास किंवा एखादे स्वप्नवत दृश्यही जाणवू शकते.

ताण, थकवा आणि कॅफिनही कारणीभूत?

झोपेची कमतरता, मानसिक ताण, चिंता, अधिक प्रमाणात कॅफिनचे सेवन आणि झोपेच्या वेळेतील अनियमितता यांमुळे अशा झटक्यांची शक्यता वाढू शकते. रात्री उशिरापर्यंत जागणे किंवा शरीराला पुरेशी विश्रांती न मिळणे यांमुळेही झोपेची नैसर्गिक प्रक्रिया बिघडू शकते.

रात्री उशिरा अतिशय जोरदार व्यायाम करणे, कॅफिनयुक्त पेये घेणे किंवा सतत तणावात राहणे यांमुळेही काही लोकांना हा अनुभव अधिक प्रमाणात जाणवू शकतो. त्यामुळे नियमित झोप, तणाव कमी करण्याचा प्रयत्न आणि रात्री कॅफिनचे प्रमाण मर्यादित ठेवणे उपयुक्त ठरू शकते.

ही समस्या गंभीर आहे का?

बहुतेक वेळा अधूनमधून होणारे हायपनिक जर्क सामान्य आणि निरुपद्रवी मानले जातात. त्यामुळे झोप लागता लागता एक-दोनदा शरीराला झटका बसला किंवा खाली पडल्यासारखे वाटले, तर लगेच घाबरण्याचे काही कारण नसते.

मात्र, झटके वारंवार होत असतील, त्यामुळे झोप सतत मोडत असेल, दिवसा जागेपणीही स्नायूंमध्ये वारंवार अनैच्छिक आकुंचन होत असेल किंवा या हालचालींमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. कारण- प्रत्येक प्रकारचा स्नायूंचा झटका हायपनिक जर्कच असेल, असे नाही. झोपेशी संबंधित इतर काही विकार किंवा मज्जासंस्थेशी संबंधित कारणांमुळेही अशा हालचाली होऊ शकतात.

त्यामुळे पुढच्या वेळी झोप लागता लागता अचानक तुम्हाला खाली पडल्यासारखे वाटले आणि त्याच क्षणी शरीराला झटका बसला, तर घाबरून जाण्याची गरज नाही. अनेकदा हा अनुभव जागेपणातून झोपेकडे जाताना शरीरात घडणाऱ्या नैसर्गिक बदलांचाच एक भाग असू शकतो.