एसयूव्ही श्रेणीच्या गाड्यांना सध्या ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. आता Hyundai ने आपली लोकप्रिय एसयूव्ही Creta ची नवी आवृत्ती Hyundai Creta Sports Edition लाँच केली आहे. ही कार 1.6-लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन प्रकारात उपलब्ध असेल. अनुक्रमे 12.78 लाख आणि 14.13 लाख रुपये इतकी या कारची एक्स शोरुम किंमत आहे. ही कार लिमिटेड एडिशन मॉडल असून स्टँडर्ड क्रेटाच्या SX व्हेरिअंटवर आधारित आहे. म्हणजे ही कार केवळ एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे.

फँटम ब्लॅक आणि पोलार व्हाइट अशा दोन रंगांमध्ये ही कार उपलब्ध असेल. स्टँडर्ड मॉडलच्या तुलनेत नव्या Sports Edition मध्ये 20 पेक्षा अधिक अपग्रेड्स आहेत. यात कॉस्मेटिक बदल आणि नव्या कम्फर्ट फीचर्सचा समावेश आहे. रिअर व्ह्यू मिरर्स, सिल्वर फिनिश रूफ रेल्स, रिअर स्पॉइलर, नवीन फ्रंट आणि रिअर स्किड प्लेट्स, ड्युअल फॉक्स एग्जॉस्ट आणि स्मोक्ड प्रोजेक्टर हेडलँपमुळे नवी कार दिसण्यास काही प्रमाणात सामान्य क्रेटापेक्षा वेगळी ठरते.

इंटेरिअर –
यातील इंटेरिअरसाठी बहुतांश काळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. या मर्यादित आवृत्तीच्या एसयूव्हीमध्ये ब्लॅक फॅब्रिक सीट्स देण्यात आलेत. त्यावर क्रेटा लिहिण्यात आलं आहे. एसी व्हेंट्स आणि दरवाजांच्या आतील बाजूच्या हँडलवर सिल्व्हर फिनिशिंग आहे.

फीचर्स –
स्टँडर्ड क्रेटाच्या SX व्हेरिअंटवर आधारित असल्याने Sports Edition मध्ये अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, मिरर लिंक आणि नेव्हिगेशनसह 7-इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम आहे. याशिवाय वायरलेस फोन चार्जिंग डॉक, आर्कमिस साउंड मूड सिस्टिम, इलेक्ट्रिक सनरूफ, पुश बटन स्टार्ट, क्रूज कंट्रोल आणि ऑटोमॅटिक यांसारखे फीचर्स आहेत.

पावर –
या एसयूव्हीमध्ये 1.6-लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 121 bhp ऊर्जा आणि 151 Nm टॉर्क निर्माण करतं. डिझेल इंजिन देखील 1.6-लिटर क्षमतेचं आहे. हे इंजिन 126 bhp ऊर्जा आणि 260 Nm टॉर्क निर्माण करतं. या मर्यादित आवृत्तीच्या एसयूव्हीमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.