Ice Facial Benefits : सकाळी झोपेतून उठल्यावर चेहऱ्यावर थकवा आणि सुजलेले डोळे दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे. अशा वेळी चेहरा बर्फाच्या पाण्यात बुडवणे म्हणजेच ‘आइस फेशियल’ एखाद्या महागड्या फेशियलपेक्षा कमी नाही, ही सोपी पद्धत तुम्हाला केवळ ताजेतवानेच करत नाही, तर त्वचेच्या अनेक समस्यांपासूनही दूर ठेवते. सकाळी या पद्धतीने तुम्ही काळजी घेतल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि रक्तसंचार (blood circulation) सुधारतो.
जयपूरमधील वरिष्ठ निसर्गोपचार, योग, पोषण व आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना सांगितले की, सकाळी बर्फाच्या पाण्याचा वापर केल्याने अनेक फायदे मिळतात.
सकाळी बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवण्याचे ६ मुख्य फायदे
१. चेहऱ्याची सूज कमी करण्यास मदत:
सकाळी झोप पूर्ण न झाल्यामुळे किंवा उशिरापर्यंत जागल्यामुळे चेहऱ्यावर आणि डोळ्यांच्या आजूबाजूला हलकी सूज येते. बर्फाच्या थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या तात्पुरत्या आकुंचन पावतात, ज्यामुळे चेहऱ्याची सूज कमी होण्यास मदत होते आणि चेहरा अधिक फ्रेश दिसतो.
२. चेहऱ्याला फ्रेश आणि तजेलदार बनवणे:
सकाळच्या वेळी थंड पाण्याने चेहरा धुणे किंवा बुडवणे अत्यंत ताजेपणा देणारे ठरते. हे झोपेतून उठल्यावर चेहऱ्यावर येणारी सुस्ती काही सेकंदांतच दूर करते.
३. डोळ्यांच्या आजूबाजूची सूज कमी करणे:
डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी हे एक उत्तम उपाय आहे. यामुळे डोळ्यांभोवतीचा भाग अधिक आरामदायी आणि फ्रेश दिसू लागतो.
४. त्वचेच्या लालसरपणापासून तात्पुरती सुटका:
थंड पाण्यामुळे त्वचेतील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे काही लोकांच्या त्वचेवरील लालसरपणा कमी होण्यास मदत होते. मात्र, संवेदनशील त्वचा (sensitive skin) किंवा त्वचेचा इतर कोणता त्रास असणाऱ्यांनी जास्त थंड पाणी वापरणे टाळावे.
५. त्वचा अधिक टाईट किंवा घट्ट दिसणे:
बर्फाच्या पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे त्वचा काही वेळासाठी अधिक घट्ट किंवा टवटवीत वाटते.
६. चेहऱ्यावर येते चमक
या प्रक्रियेमुळे त्वचेचा रक्तसंचार सुधारतो आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक व ताजेपणा दिसून येतो.
बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवण्याची योग्य पद्धत
- सर्वांत आधी फेसवॉश किंवा क्लिंजरने चेहरा स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून चेहऱ्यावर मेकअप किंवा धूलिकण राहणार नाहीत.
- एका मोठ्या भांड्यात थंड पाणी घ्या आणि त्यात बर्फाचे ६ ते ८ तुकडे टाका.
- दीर्घ श्वास घ्या आणि १० ते १५ सेकंदांसाठी आपला चेहरा या थंड पाण्यात बुडवा. (सुरुवातीला त्रास होत असल्यास ५ ते १० सेकंदांपासून सुरुवात करा).
- हा प्रयोग एका वेळेस सलग जास्त वेळ करू नका. सर्व मिळून चेहरा १ मिनिटापेक्षा जास्त वेळ पाण्यात राहू नये.
- चेहरा बाहेर काढून मऊ आणि स्वच्छ टॉवेलने हलक्या हाताने पुसून घ्या.
- त्यानंतर त्वचेवर चांगला मॉइश्चरायझर किंवा सीरम नक्की लावा.
