Sonali Bendre Cancer : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी आपल्या कॅन्सरविषयीचा अनुभव पुन्हा एकदा उघडपणे सांगितला आहे २०१८ मध्ये त्यांना मेटास्टॅटिक कॅन्सरचे निदान झाले होते आणि तो स्टेज-४पर्यंत पोहोचलेला होता. या कठीण काळात न्यूयॉर्कमध्ये त्यांनी कीमोथेरपी आणि शस्त्रक्रिया यांसारखे उपचार घेतले. दीर्घ उपचार आणि मानसिक संघर्षानंतर त्यांनी या आजारावर मात केली. त्यांच्या मते, “जर कॅन्सरचे निदान अधिक लवकर झाले असते तर तो स्टेज-४पर्यंत गेला नसता.”
डॉक्टरांच्या मत,”कॅन्सरबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेत निदान”. लाजपत नगर येथील मॅक्स इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर केअरचे सीनियर डायरेक्टर डॉ. पी.के. जुलका यांच्या मते, “कॅन्सरचे जितक्या निदान केले जाते तितका उपचार यशस्वी होण्याचा दर जास्त असतो. शरीरातील कोणतेही असामान्य बदल दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते.”
मेटास्टॅटिक कॅन्सर म्हणजे काय (Metastatic Cancer Explained)
मेटास्टॅटिक कॅन्सर (Metastatic cancer) ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये मूळ ठिकाणावरील कॅन्सर पेशी रक्त किंवा लिम्फ सिस्टिमच्या माध्यमातून शरीरातील इतर अवयवांपर्यंत पोहोचतात. (लिम्फ सिस्टिम म्हणजे शरीरातील अतिरिक्त द्रव, विषारी घटक बाहेर काढणारी आणि लिम्फ ग्रंथींच्या माध्यमातून संसर्ग गाळून काढून रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणारी नैसर्गिक निचरा प्रणाली.) यामध्ये लिव्हर, फुफ्फुस, हाडे किंवा मेंदू यांसारखे अवयव प्रभावित होऊ शकतात. या प्रक्रियेला “मेटास्टेसिस” म्हटले जाते. ही अवस्था कॅन्सरची सर्वात प्रगत पायरी मानली जाते कारण तो केवळ एका जागी मर्यादित राहत नाही.
कॅन्सर मेटास्टेसिसची प्रमुख कारणे (Causes of Metastatic Cancer)
डॉक्टरांच्या मते, कॅन्सर उशिरा लक्षात येणे हे सर्वात मोठे कारण आहे. त्याशिवाय काही ट्यूमर वेगाने वाढणारे (aggressive) असू शकतात. कॅन्सर पेशी रक्तवाहिन्या आणि लिम्फ सिस्टिममधून शरीरभर पसरू शकतात. काही प्रकरणांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असणे आणि अनुवांशिक कारणे देखील भूमिका बजावतात.
लक्षणे ज्याकडे दुर्लक्ष करू नये (Warning Symptoms)
मेटास्टॅटिक कॅन्सरची लक्षणे शरीरात कुठे कॅन्सर पसरला आहे यावर अवलंबून असतात. तरीही काही सामान्य संकेत दिसू शकतात. सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, अनावश्यक वजन कमी होणे, दीर्घकाळ वेदना विशेषतः हाडांमध्ये, श्वास घेण्यास त्रास होणे, सतत खोकला किंवा कफ, तसेच डोकेदुखी, चक्कर किंवा झटके ही मेंदूपर्यंत कॅन्सर पसरल्याची चिन्हे असू शकतात. काही प्रकरणांमध्ये त्वचा किंवा डोळे पिवळे पडणेही दिसू शकते.
कॅन्सरचे टप्पे (Stages of Cancer)
कॅन्सर सामान्यतः चार टप्प्यांमध्ये विभागला जातो. पहिल्या टप्प्यात तो एका जागी मर्यादित असतो. दुसऱ्या टप्प्यात तो वाढतो पण जवळच्या ऊतींपर्यंतच मर्यादित राहतो. तिसऱ्या टप्प्यात तो लसीका ग्रंथींपर्यंत (lymph nodes) पोहोचतो. चौथा टप्पा म्हणजे सर्वात गंभीर अवस्था जिथे कॅन्सर शरीरभर पसरलेला असतो आणि त्याला मेटास्टॅटिक कॅन्सर म्हटले जाते.
उपचार शक्य आहेत का (Treatment Possibilities)
जरी मेटास्टॅटिक कॅन्सर हा कठीण टप्पा मानला जातो, तरी तो पूर्णपणे असाध्य (पूर्णपणे बरा होणार नाही असा आजार) नाही. कीमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया यांच्या मदतीने कॅन्सर नियंत्रित केला जाऊ शकतो. योग्य उपचारांमुळे रुग्णाचे आयुष्य आणि जीवनमान सुधारू शकते.
प्रतिबंध आणि जागरूकता (Prevention and Awareness)
नियमित आरोग्य तपासणी करणे, शरीरातील बदलांकडे लक्ष देणे, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे तसेच संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैली ठेवणे हे कॅन्सरपासून बचावासाठी महत्त्वाचे आहे. वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात.
या संपूर्ण प्रवासातून सोनाली बेंद्रे यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की कॅन्सरबाबत भीती नव्हे तर जागरूकता आणि वेळेत तपासणी हीच खरी ताकद आहे.
