पाठदुखीचा त्रास फक्त वयस्कर लोकांनाच नाही, तर तरुणांनाही होतो. पाठदुखीमागे अनेक कारणे असू शकतात. ऑफिसमध्ये जास्त वेळ बैठे काम किंवा शारीरिक हालचालींचा अभाव यांमुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. पाठदुखीचा हा त्रास आजकाल फारच सामान्य होत चालला आहे. लहान वयातच अनेकांना पाठीचे दुखणे सतावू लागले आहे, जे पूर्वी वृद्धापकाळाशी संबंधित समजले जायचे. बसण्याची चुकीची पद्धत, तासन् तास मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करणे, शरीराची हालचाल कमी होणे, पोषणमूल्यांची कमतरता व तणावपूर्ण जीवनशैली ही पाठदुखीमागची मुख्य कारणे आहेत. अनेकदा हे दुखणे औषधांनी थांबत नाही आणि मग माणूस हताश होतो.

आराम मिळविण्यासाठी लोक विविध औषधांचा अवलंब करतात. परंतु, अशा परिस्थितीत औषधांपेक्षा घरगुती उपचार अधिक फायदेशीर ठरतात. त्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत आणि ते पाठदुखीमुळे होणाऱ्या अस्वस्थतेपासूनदेखील आराम देऊ शकतात. चला तर मग पाठदुखीवरील घरगुती उपचारांचा शोध घेऊया.

मेथीचे तेल: हे तयार करण्यासाठी मोहरीच्या तेलात मेथीचे दाणे घाला आणि ते काळे होईपर्यंत तळा. तेल ओतल्यानंतर ते गाळून घ्या. दररोज या तेलाने तुमच्या पाठीला मालिश केल्याने पाठदुखी कमी होईल आणि तुमचे स्नायू व हाडे मजबूत होतील.

तीळ तेल : पाठदुखी कमी करण्यासाठी तिळाचे तेल वापरणे फायदेशीर आहे. तिळाचे तेल थोडेसे गरम करा आणि नंतर त्या तेलाने तुमच्या पाठीला मालिश करा. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा तिळाच्या तेलाने मालिश करा. त्यामुळे लवकर आराम मिळेल.

आले : पाठदुखी कमी करण्यासाठी आले हादेखील एक उत्तम पर्याय आहे. आले गरम पाण्यात कमीत कमी १५ मिनिटे उकळवा आणि नंतर ते पाणी गाळून घ्या. ते पाणी थोडे थंड झाल्यावर त्यात मध टाकून प्या. हे पेय दिवसातून दोनदा प्या. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. त्याशिवाय आल्याच्या तेलाने मालिश केल्यानेही पाठदुखीपासून आराम मिळू शकतो. आले या गरम मसाल्यातील पदार्थाचे शरीराला असंख्य फायदे आहेत.

तुळशीची पाने: तुळशीची पाने गरम पाण्यात १० मिनिटे उकळवा. तुळशीचा हा चहा थोडा कोमट झाल्यावर चवीसाठी त्यात मध घालून प्या. हा चहा तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा पिऊ शकता.तुम्ही तुमच्या कंबरेला तुळशीचे तेलदेखील लावू शकता. दिवसातून एक किंवा दोनदा तुळशीचे तेल लावा.

बर्फाचा पॅक : तुमच्या पाठीखालील वेदनादायक भागावर बर्फाचा पॅक लावा आणि १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. दिवसातून एकदा किंवा दोनदा असे करा. ​​त्यामुळे आराम मिळेल आणि वेदना हळूहळू कमी होतील.

मका : मक्यामध्ये बी जीवनसत्त्व आणि खनिजे, तसेच फायबर असते. मक्याचे मध्यम प्रमाणात सेवन केल्यास एकूण आरोग्यासाठी हे घटक चांगले असू शकतात. संपूर्ण मक्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सदेखील असतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दाहकविरोधी आहारामुळे पाठदुखी कमी होण्यास मदत होते. भरपूर फळे आणि भाज्या खाणे आवश्यक आहे. कारण- त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात.