Why Red Chilies Avoid: आजकाल लाल मिरच्यांचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो, विशेषतः स्नॅक्स जंक फूड आणि अगदी घरगुती जेवणातही. पण, चवीच्या नादात तुम्ही तुमच्या आरोग्याशी तडजोड करीत आहात का? ते लक्षात घ्या. आरोग्य तज्ज्ञांकडून तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, लाल मिरच्यांचे सेवन जपून केले पाहिजे. आयुर्वेदानुसारही लाल मिरच्या पोटासह संपूर्ण आरोग्यासाठी हानिकारक मानल्या जातात. कर्करोग तज्ज्ञ डॉ. तरंग कृष्णा यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये‌ शक्य असल्यास आपल्या आहारातून लाल मिरच्या पूर्णपणे काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, केवळ २१ दिवस लाल मिरच्यांचे सेवन टाळल्यास तुमच्या शरीरात लक्षणीय बदल घडून येतील. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

२१ दिवस लाल मिरची खाणे सोडल्यास काय होईल?

डॉ. तरंग कृष्णा म्हणतात की, जर तुम्हाला मसालेदार पदार्थ आवडत असतील, तर फक्त २१ दिवसांसाठी लाल मिरची खाणे सोडून द्या. तुमची रोगप्रतिकार शक्ती आपोआप सुधारू लागेल. खरं तर आज उपलब्ध असलेल्या बहुतेक लाल मिरच्यांमध्ये रंग मिसळलेला असतो. दररोज लाल मिरच्या खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती हळूहळू कमकुवत होऊ शकते.

लाल मिरचीऐवजी काय खावे?

डॉ. तरंग यांचा सल्ला आहे की, जर तुम्हाला खरंच मसालेदार पदार्थ आवडत असतील, तर तुम्ही लाल मिरच्यांऐवजी इतर पर्याय वापरून पाहू शकता. उदाहरणार्थ, ताज्या हिरव्या मिरच्या हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही गरम मसाला आणि काळी मिरी पूडदेखील वापरू शकता. त्यामुळे तुमच्या जेवणात तिखटपणा येतो; पण लाल मिरच्यांइतके शरीराचे नुकसान होत नाही. मात्र, त्यांचे सेवनही प्रमाणातच करावे.

या लहानशा बदलामुळे जादुई परिणाम

कर्करोग तज्ज्ञांच्या मते, केवळ २१ दिवसांसाठी तुमच्या आहारात हा छोटासा बदल केल्यास त्याचे जादुई परिणाम मिळू शकतात. याचा तुमच्या हार्मोन्सवर लक्षणीय सकारात्मक परिणाम होईल. तुमच्या आतड्यांच्या आरोग्यात आणि एकूण जीवनशैलीतही तुम्हाला महत्त्वपूर्ण बदल दिसून येतील. तुम्हाला पूर्वीपेक्षा हलके आणि निरोगी वाटू लागेल.

लाल मिरची हानिकारक का असते?

कर्करोग तज्ज्ञांच्या मते, लाल मिरची आतड्यांना त्रास देणारी सर्वांत सामान्य गोष्ट आहे. याचा अर्थ, त्यामुळे तुमच्या आतड्यांच्या आरोग्याला हानी पोहोचण्याची सर्वाधिक शक्यता असते. ज्या लोकांना वारंवार आम्लपित्त, छातीत जळजळ, पोटात जळजळ, अल्सर किंवा वारंवार पोटदुखीचा त्रास होतो, त्यांनी लाल मिरची खाणे टाळावे. त्याशिवाय ही मिरची तोंडाच्या आतील त्वचेला मोठ्या प्रमाणात त्रास देते आणि तोंडात अल्सर होण्याचे ते एक प्रमुख कारण आहे.