Hot Water Benefits: पाण्याशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. पाणी आपल्या आरोग्यासाठी आणि दैनंदिन जीवनातील वापरासाठी किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कशी करता, यावर तुमचा उर्वरित दिवस कसा जाईल हे अवलंबून असते. जर तुम्हाला दिवसभर उत्साही राहायचे असेल, पोटात हलकेपणा जाणवायचा असेल आणि अनेक गंभीर आजारांना दूर ठेवायचे असेल, काय करावे व काय करू नये? हे आपण अनेक आहार तज्ज्ञ आणि हल्लीच्या सोशल मीडियावरील आरोग्यासंबंधित व्हायरल रील्समधून पाहतोच.
सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी गरम पाणी प्यावे. गरम पाणी ही काही सामान्य गोष्ट नाही. ते शरीराला आतून स्वच्छ करते, रोगांपासून संरक्षण करते. हे केवळ आयुर्वेदातच नाही, तर आधुनिक विज्ञानानेही मान्य केले आहे. चला तर मग आज आपण सकाळी गरम पाणी पिण्याचे १२ आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया, जे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात.
उपाशी पोटी गरम पाणी पिण्याचे फायदे
१. शरीरातील अशुद्धी दूर करते
गरम पाण्यामुळे शरीरात साचलेले अशुद्ध घटक विरघळतात. ते पोट, आतडे आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडकलेले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. विशेषतः रिकाम्या पोटी सेवन केल्यास, त्याचा शुद्धीकरणाचा प्रभाव दुप्पट होतो.
२. बद्धकोष्ठतेपासून आराम
सकाळी उपाशी पोटी गरम पाणी प्यायल्याने आतडी सक्रिय होतात. त्यामुळे पोट स्वच्छ होऊन, शौचास नियमित होण्यास मदत होते. ज्यांना दररोज सकाळी शौचास होत नाही, त्यांनी ही पद्धत नक्कीच अवलंबली पाहिजे.
३. लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त
गरम पाणी हळूहळू चरबी विरघळवते. त्यात थोडे मध घातल्यास वजन कमी होण्यास गती मिळू शकते. गरम पाण्यामुळे चयापचय क्रिया वाढते, ज्यामुळे शरीराला अधिक उष्मांक जाळण्यास मदत होते.
४. कफ दूर करते
ज्यांना सर्दी, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होतो, त्यांच्यासाठी गरम पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. ते घशातील आणि छातीतील कफ हळुवारपणे काढून टाकते, ज्यामुळे श्वास घेण्यास आराम मिळतो.
५. संधिवात आणि सांधेदुखीपासून आराम
कोमट पाण्यामुळे शरीरातील सूज कमी होते. ज्यांना संधिवात, सांधेदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी सकाळी लवकर कोमट पाणी पिण्यास सुरुवात करावी. त्यामुळे शरीरातील अंतर्गत ताठरपणा हळूहळू कमी होतो.
६. मधाबरोबर मिसळल्यास फायदे वाढतात
कोमट पाण्यात थोडा शुद्ध मध मिसळल्यास ते पाणी अधिक प्रभावी ठरते. तथापि, मध उकळू नये किंवा अत्यंत गरम पाण्यात टाकू नये याची काळजी घ्या. जर मध घट्ट झाला असेल, तर तो कोमट पाण्यात टाकून हळूहळू वितळवा.
७. शारीरिक थकवा दूर करते
रात्रीच्या झोपेनंतर शरीर सुस्त होऊ शकते. कोमट पाणी प्यायल्याने ऊर्जेचा प्रवाह वाढण्यास मदत होते, थकवा आणि जडपणा दूर होऊन शरीर ताजेतवाने होते.
८. चेहरा उजळ करते
कोमट पाणी रक्त शुद्ध करते. रक्त शुद्ध झाल्यावर चेहरा आपोआप उजळतो. मुरमे, डाग आणि व्रणदेखील हळूहळू फिके पडतात.
९. थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम टाळते
लोक अनेकदा जास्त थंड पाणी पितात, ज्यामुळे पोटातील उष्णता कमी होते. त्यामुळे कफ वाढतो आणि पचनक्रिया बिघडते. गरम पाण्याचा याच्या उलट परिणाम होतो; ते शरीरातील उष्णता टिकवून ठेवते आणि आजारपण टाळते.
१०. मासिक पाळीच्या वेदना कमी होतात
तुमच्या आरोग्यासाठी, विशेषतः तुमच्या मासिक पाळीच्या आरोग्यासाठी हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. गरम पाणी प्यायल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत मिळते.
११. केसांचे आरोग्य सुधारते
गरम पाणी केसांची मुळं सक्रिय करते, ज्यामुळे केसांची वाढ सुधारते आणि ते अधिक मजबूत होतात.
१२. पचनक्रिया सुधारते
कोमट पाणी पोटातील उष्णता टिकवून ठेवते, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते. तसेच, यामुळे गॅस, अपचन आणि पोटात जडपणा जाणवतो. जेवणानंतर तुम्हाला कधी पोट जड वाटत असल्यास, कोमट पाणी प्यायल्याने त्वरित आराम मिळतो.
मध शरीरातील चरबी कमी करण्यास, रक्त शुद्ध करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतो. त्यामुळेच अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये मध घातला जातो.
गरम पाणी कसे आणि किती प्यावे?
- सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्या.
- पाणी इतके गरम असावे की, ते चहाप्रमाणे आरामात पिता येईल आणि घशात जळजळ होणार नाही.
- तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये थोडा मध घालू शकता.
- एकाच वेळी खूप जास्त पाणी पिऊ नका. एका ग्लासाने सुरुवात करा.
- पोट साफ झाल्यावर तुम्ही साधे पाणीसुद्धा पिऊ शकता.
‘या’ गोष्टींची काळजी घ्या
- खूप गरम पाणी पिऊ नका. त्यामुळे तुमच्या घशाला आणि आतड्यांना इजा होऊ शकते.
- जर तुम्हाला पित्ताचा (आम्लतेचा) त्रास असेल, तर खूप गरम पाणी पिणे टाळा. कोमट पाणी चालेतल.
- कामयस्वरूपीदेखील गरम पाणी पिणे टाळा, तुम्ही जर सलग १० दिवस गरम पाणी पीत असाल, तर त्यानंतर चार-पाच दिवस थांबा आणि पुन्हा प्या.
