Whom should not eat jackfruit: फणस फक्त खाण्यासाठीच चविष्ट नाही, तर आरोग्यासाठीही तो खूप फायदेशीर आहे. त्यात असलेली प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, मँगनीज, रिबोफ्लेविनसारखे पोषक घटक व्यक्तीची पचनसंस्था, हृदय आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि अनेक आश्चर्यकारक आरोग्य फायदे देतात. फणसात कॅलरीजचे प्रमाण जास्त असून, ते कोलेस्ट्रॉल किंवा संतृप्त चरबीपासून मुक्त होऊ शकते. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की काही व्यक्तींसाठी फणस खाणं धोक्याचं ठरू शकतं.

कोणत्या लोकांनी फणस खाऊ नये

अॅलर्जी

ज्या लोकांना लेटेक्सची अॅलर्जी आहे त्यांनी विशेषतः फणस खाणे टाळावे. फणस खाल्ल्याने अॅलर्जीची लक्षणे दिसू शकतात. अॅलर्जी श्वसनसंस्थेवर परिणाम करते आणि काही लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो किंवा श्वास घेणेदेखील बंद होऊ शकते.

मधुमेह

मधुमेहींनीही फणसाचे सेवन कमी प्रमाणात करावे. फणसातील मधुमेहविरोधी गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात. जर मधुमेहींनी दररोज मोठ्या प्रमाणात फणसाचे सेवन केले तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते, जी त्यांच्यासाठी हानिकारक असू शकते.

गर्भधारणा

गर्भवती महिलांनी गरोदरपणात फणस खाणे टाळावे. फणसात असलेले अघुलनशील फायबर आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्याला हानी पोहोचवू शकते. फणस खाल्ल्याने गर्भपाताचा धोकादेखील वाढू शकतो. शिवाय, स्तनपान करणाऱ्या महिलांनीदेखील फणस खाणे टाळावे. या महिलांनी ते खाण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

किडनी रोग

किडनीची समस्या असलेल्यांनीदेखील फणस खाऊ नये, कारण फणसातील पोटॅशियम किडनीसाठी गंभीर समस्या निर्माण करू शकते.

फणसासह ‘हे’ खाणं टाळा

फणसासह दुग्धजन्य पदार्थांचे सेवन

फणसासह दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने गॅस, अपचन व अॅसिडीटीची समस्या वाढू शकते. उन्हाळ्यात हे दोन पदार्थ एकत्र खाणे खूप हानिकारक ठरू शकते. त्याव्यतिरिक्त त्वचेच्याही अनेक प्रकारच्या समस्या वाढू शकतात.

फणसासह मासे

फणस आणि मासे एकत्र खाणे खूप हानिकारक असू शकते. ते एकत्र खाल्ल्यामुळे त्वचेच्या समस्या, अॅलर्जी व पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. खरं तर मासे आणि फणस हे दोन्ही पदार्थ उष्ण आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे एकत्र सेवन केल्याने शरीरात उष्णता वाढू शकते आणि पचनावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. या दोन्हींचे सेवन केल्याने अॅसिडिटी, गॅस किंवा पोटदुखीसारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात.

दारूचे सेवन

फणस खाल्ल्यानंतर वाइन किंवा बीअरसारखी अल्कोहोलिक पेये पिऊ नयेत. त्याचा प्रकृतीवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे पचनक्रियेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याशिवाय शरीरात विषारी पदार्थ जमा होण्याची शक्यता वाढते.