Tips for Fatty Liver Patients : फॅटी लिव्हर हा खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि अस्वास्थ्यकर सवयींमुळे होणाऱ्या सामान्य आजारांपैकी एक आहे. या स्थितीत यकृताभोवती जास्त प्रमाणात चरबी जमा होते. सामान्यतः यकृताभोवती चरबी असते; परंतु जेव्हा त्याच्या पेशींमध्ये जास्त चरबी जमा होते तेव्हा फॅटी लिव्हर होतो. या स्थितीत यकृत फुगणे आणि आकुंचन पावणे सुरू होते. थकवा, वजन कमी होणे, पोटाच्या समस्या व अशक्तपणा फॅटी लिव्हरची ही सामान्य लक्षणेआहेत.
मधुमेह, उच्च रक्तदाब व लठ्ठपणा असलेल्या रुग्णांना जास्त धोका असतो. आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि खराब जीवनशैली यांमुळे फॅटी लिव्हरची समस्या लोकांमध्ये सामान्य झाली आहे. हा आजार यकृताच्या पेशींमध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा झाल्यामुळे होतो. त्यामुळे यकृताला सूज येणे, पोटदुखी, भूक न लागणे, थकवा येणे, वजन कमी होणे अशा समस्या उदभवू लागतात. त्यावर वेळीच उपचार न केल्यास लिव्हर सिरोसिस, यकृत खराब होणे आणि यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे
म्हणूनच आरोग्य तज्ज्ञ फॅटी लिव्हरच्या समस्या टाळण्यासाठी लोकांना प्रक्रिया न केलेली फळे आणि भाज्या खाण्यास प्रोत्साहित करतात. फॅटी लिव्हरवर उपचार करण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर आहेत ते पाहूया.
ताक: उन्हाळ्यात जवळजवळ सर्वांनाच ताक पिणे आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का की, ताकाचे सेवन केल्याने फॅटी लिव्हरच्या समस्यांवर नियंत्रण मिळू शकते? संशोधनातून असे दिसून आले आहे की, ताकातील घटक फॅटी लिव्हर कमी करण्यास मदत करू शकतात. त्यात उच्च प्रथिनेदेखील असतात , जे यकृत निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी आहेत. त्याशिवाय ताकाचा थंडावा पोट आणि आतड्यांना शांत करतो. तसेच यकृत आणि संपूर्ण शरीर निरोगी ठेवतो.
केळी: फॅटी लिव्हरच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना अनेकदा अन्न पचवण्यास त्रास होतो. अशा परिस्थितीत फळे खाणे फायदेशीर ठरू शकते. फळांमधील पोषक तत्त्वे यकृताला बळकटी देतात. या रुग्णांसाठी केळीदेखील फायदेशीर ठरू शकतात. कारण- दररोज एक केळे खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात. केळ्यामध्ये असलेले पोटॅशियम पचनक्रियेला मदत करते.
कोबी : हेपॅटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, कोबी आणि फुलकोबीमध्ये नैसर्गिक संयुगे असतात, जी फॅटी लिव्हरचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. संशोधकांचे म्हणणे आहे की, तुमच्या आहारात कोबीचा समावेश केल्याने इंडोलचे उत्पादन कमी होण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे या स्थितीचे परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते.

