scorecardresearch

बकरी ईद : काय आहे इतिहास आणि ईदचे महत्व! वाचा सविस्तर

इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचे महत्त्व आहे.

lifestyle
हजरत इब्राहिम यांच्या मुलाचे प्राण वाचले आणि बकर्‍याची कुर्बानी देण्यात आली. तेव्हापासून कुर्बानी देण्याची प्रथा सुरू झाली.

भारतात वेगवेगळ्या धर्माचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यातील एक मुस्लिम बांधवांचा सण म्हणजे बकरी ईद. इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचे महत्त्व आहे.

बकरी ईदचा इतिहास

बकरी ईद साजरी करण्यामागे एक इतिहास आहे. हजरत इब्राहीम अलैहि सलाम हे अल्लाहचे सेवक मानले जातात, ज्यांना इस्लामचे प्रत्येक अनुयायी हे अल्लाहचा दर्जा देत असतात. याच दिवशी खुदाच्या सांगण्यावरून हजरत इब्राहिम यांना पुत्र हजरत इस्माइलची कुर्बानी देण्यासाठी संगितले होते. तेव्हा हजरत इब्राहिम यांनी मुलाच्या प्रती असलेले प्रेम कुर्बानी देताना आड येऊ नये म्हणून डोळ्यांवर पट्टी बांधली. कुर्बानी दिल्यानंतर त्यांनी डोळ्यांवरील पट्टी हटवल्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा सुरक्षित दिसला. अल्‍लाहने चमत्‍कार केला आणि मुलाच्या जागी बकरा कुर्बान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.हजरत इब्राहिम यांच्या मुलाचे प्राण वाचले आणि बकर्‍याची कुर्बानी देण्यात आली. तेव्हापासून कुर्बानी देण्याची प्रथा सुरू झाली.

बकरी ईदचे महत्व

मुस्लिम समुदायाचे लोक रमजान संपल्यावर किमान ७० दिवसांनंतर बकरी ईदचा सण साजरा करतात. याला ईद-उल-जुहा देखील म्हणतात. ईद-उल-फितर (मिठी ईद) नंतर मुस्लिम समुदायाच्या सर्वात मोठ्या सणांमध्ये एक आहे तो म्हणजे बकरी ईद. या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घरी बकर्‍यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. कुर्बानी दिल्यानंतर मांस समान तीन हिश्श्यांमध्ये गोरगरीब व अनाथ, आप्त व नातेवाईक आणि स्वत: व शेजारी यांना वाटप केले जाते. सकाळच्या विशेष नमाज पठणानंतर ही कुर्बानी देण्यात येते. मुस्लिम बांधवांमध्ये चंद्र दर्शनाला अत्यंत महत्त्व असते, त्यामुळे चंद्र दर्शनानंतर ईद साजरी केली जाते. सध्या करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सावटाच्या भितीत बकरी ईदही शासकीय नियमांच्या अधीन राहूनच साजरी केली जाणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-07-2021 at 22:47 IST