भारत-चीनमध्ये सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चीनविरोधात संतापाची भावना आहे. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या काही कर्मचाऱ्यांनी कंपनीचे टी-शर्ट जाळले. झोमॅटोमधील चिनी कंपनीच्या गुंतवणूकीला विरोध करत कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

कोलकात्याच्या बेहला येथे झोमॅटोच्या काही कर्मचाऱ्यांनी चीनविरोधात निदर्शनं केली. कंपनीमध्ये चिनी कंपनीच्या गुंतवणूकीमुळे राजीनामा दिल्याचा दावाही अनेक जणांनी केला. तर, काही जणांनी झोमॅटोकडून अन्नपदार्थ मागविणे बंद करण्याचे आवाहन केले. ‘आपल्याकडून नफा कमावून ते आपल्याच सैनिकांवर हल्ला करु शकत नाही. ते आपल्या सीमेत येतायेत, हे आम्ही सहन करणार नाही. आमच्या कंपनीमध्ये चिनी गुंतवणूक आहे, त्यामुळे आम्ही या कंपनीमध्ये काम करणार नाही’, असे म्हणत निदर्शनकर्त्यांनी कंपनीचे अधिकृत टी-शर्ट जाळले.

चीनमधील आघाडीची कंपनी अलिबाबाची उपकंपनी असलेल्या अँट फायनान्शियलने 2018 मध्ये झोमॅटोत 21 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. या कंपनीचा झोमॅटोमध्ये 14.7 टक्के हिस्सा आहे. याशिवाय झोमॅटोने नुकताच अँट फायनान्शियलकडून 15 कोटी डॉलरचा निधी मिळविला आहे. दरम्यान, निदर्शनकर्त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लॉकडाउनचा परिणाम झाल्यानंतर मे महिन्यामध्ये झोमॅटोनो 520 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते. त्यामुळे निदर्शन करणारे कर्मचारी तेच होते का याबाबत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, झोमॅटोनेही यावर अद्याप काहीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.