Hinga health benefits: भारतीय स्वयंपाकात हिंग हा गरम मसाल्यातील एक महत्त्वाचा पदार्थ मानला जातो. डाळ, आमटी, सांबार, कढी, भाजी आणि फोडणीच्या विविध पदार्थांमध्ये हिंगाचा वापर चव आणि सुगंध वाढविण्यासाठी केला जातो. आयुर्वेदातही हिंगाला विशेष महत्त्व असून, तो पचनास मदत करणारा पदार्थ मानला जातो. गॅस, पोट फुगणे व अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळविण्यासाठी अनेक घरांमध्ये हिंगाचा वापर केला जातो. कमी प्रमाणात वापरूनही पदार्थाची चव खुलविणारा हिंग हा भारतीय आहारातील पारंपरिक आणि आरोग्यदायी मसाल्यांपैकी एक मानला जातो.

हिंगामध्ये विविध जैवसक्रिय (बायोअॅक्टिव्ह) संयुगे, अँटिऑक्सिडंट्स आणि अल्प प्रमाणात काही खनिजे आढळतात. त्यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस तसेच इतर सूक्ष्म खनिजांचे अंश असू शकतात. त्याशिवाय हिंगामध्ये राळ, गम आणि सल्फरयुक्त संयुगे असतात, ज्यामुळे त्याला विशिष्ट तीव्र सुगंध आणि चव मिळते. हिंगाचा वापर सामान्यतः अतिशय कमी प्रमाणात केला जात असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पोषक द्रव्ये मिळत नाहीत.

अन्नात हिंगाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास चव वाढण्याबरोबरच काही आरोग्यदायी फायदेही मिळू शकतात. त्यापैकी अनेक फायद्यांचे आयुर्वेदात पारंपरिक उपयोगासह वर्णन करण्यात आले आहे;लक्षात घेण्याजोगे काही मुद्दे खालीलप्रमाणे :

अन्नात हिंग घालण्याचे आरोग्यदायी फायदे

  • पचनक्रिया सुधारण्यास मदत हिंगाचा वापर केल्याने अन्नाचे पचन सुरळीत होण्यास मदत होऊ शकते.
  • गॅस आणि पोटफुगी कमी करण्यास उपयुक्त: डाळी, कडधान्ये आणि हरभऱ्यासारख्या पदार्थांमध्ये हिंग घातल्यास गॅसचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
  • अपचनाची समस्या कमी करण्यास सहायक: जेवणानंतर जडपणा किंवा अपचनाचा त्रास होत असल्यास हिंगयुक्त पदार्थ काही लोकांना आराम देऊ शकतात.
  • पदार्थ आकर्षक सुगंधासह चविष्ट करण्यास साह्यभूत: अगदी कमी प्रमाणात वापरूनही हिंग पदार्थाला वेगळी चव आणि आकर्षक सुगंध देतो.
  • आतड्यांच्या आरोग्यास मदत: पचनक्रिया सुधारल्यामुळे आतड्यांचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते.
  • अँटिऑक्सिडंट गुणधर्म: हिंगामध्ये काही अँटिऑक्सिडंट संयुगे असतात, जे पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण देण्यास मदत करू शकतात.
  • दाह कमी करण्यास मदत: काही संशोधनांनुसार हिंगातील जैवसक्रिय घटकांमध्ये दाहविरोधी गुणधर्म असू शकतात.
  • डाळी आणि कडधान्यांचे पचन सोपे होण्यास मदत: त्यामुळे भारतीय स्वयंपाकात फोडणीसाठी हिंगाचा पारंपरिकतेने वापर केला जातो. भूक सुधारण्यास साह्य काही लोकांमध्ये हिंगामुळे पाचक रसांचे स्रवण वाढण्यास मदत होऊ शकते.
  • आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान: आयुर्वेदानुसार हिंग वात कमी करण्यास आणि पचन सुधारण्यासाठी उपयुक्त मानला जातो.