Coriander Health Benefits: भारतीय स्वयंपाकघरात कोथिंबीर केवळ सजावटीसाठीच नाही, तर चव आणि सुगंध वाढवण्यासाठीही वापरली जाते. डाळ असो, भाजी असो किंवा भात, त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर घातल्याने पदार्थाची चव दुप्पट होते. पण जर तुम्हाला वाटत असेल की, कोथिंबीर फक्त सजावटीपुरतीच मर्यादित आहे; तर असे नाही, हेल्थलाइन या आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या वेबसाईटच्या अहवालानुसार, दररोज कोथिंबीर खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि शरीराला इतर अनेक फायदे मिळतात.
हिरव्या कोथिंबिरीचे फायदे
पचनक्रिया निरोगी ठेवते
कोथिंबिरीमधील फायबर पचनक्रिया सुधारते. त्यामुळे गॅस, अपचन व पोट फुगणे यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला निरोगी पचनक्रिया टिकवून ठेवायची असेल, तर तुमच्या रोजच्या आहारात कोथिंबिरीचा समावेश करणे फायदेशीर ठरेल.
हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले
कोथिंबीर एक नैसर्गिक मूत्रवर्धक म्हणून काम करते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. अनेक अभ्यासांनुसार, नियमित सेवनाने हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतो.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर
कोथिंबीर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. त्यामध्ये असलेले काही विशिष्ट एंझाइम्स रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात, असे मानले जाते. त्याशिवाय त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे मधुमेहींसाठी हा एक चांगला पर्याय ठरतो. तुम्ही कोथिंबिरीचे पाणी बनवून त्याचे सेवनही करू शकता. फक्त पाण्यात काही पाने टाका आणि दिवसभर ते पाणी प्या.
रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते
कोथिंबिरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला संसर्ग आणि आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. त्याचे जीवाणूनाशक गुणधर्म शरीराची रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढवतात. नियमित सेवनाने वारंवार आजारी पडण्याचा धोका कमी होऊ शकतो. त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकते.
त्वचेसाठी फायदेशीर
प्रत्येकाला नितळ आणि चमकदार त्वचा हवी असते. शरीरातील वाढलेल्या आम्लतेमुळे त्वचेवर लालसरपणा, पुरळ व मुरमांसारख्या समस्या उदभवू शकतात. कोथिंबीर आम्लता कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
